
11/09/2025
बार्शी तालुक्यात रस्त्यांचे सीमांकन व अतिक्रमण हटवण्यासाठी तहसील कार्यालयाचा कृती आराखडा जाहीर
बार्शी (प्रतिनिधी) : बार्शी तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन, अतिक्रमण हटवणे आणि रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यासाठी तालुकास्तरीय कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश तहसीलदार एफ.आर. शेख यांनी ९ सप्टेंबर २०२५ रोजी काढले असून, १० ते २२ सप्टेंबर २०२५ दरम्यान टप्प्याटप्प्याने ही कार्यवाही होणार आहे.
महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक गावातील रस्त्यांची नोंद तपासून अद्ययावत केली जाणार आहे. ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील व महसूल सेवकांच्या मदतीने गाव नकाशावर नोंद असलेले व नसलेले रस्ते शोधून प्राथमिक यादी तयार केली जाईल. ती ग्रामसभेत मांडून मान्यता घेण्यात येईल. मंजूर यादी उपअधीक्षक भूमी अभिलेखांकडे पाठवून सीमांकन, मोजमाप व जिओ-रेफरन्सिंग केले जाईल.
सीमांकनादरम्यान अतिक्रमण आढळल्यास नोटिसा देऊन सुनावणी केली जाईल आणि निर्णय नोंदवले जातील. त्यानंतर अद्ययावत अभिलेख तयार करून रस्त्यांना क्रमांक देण्यात येतील. सर्व माहिती गाव दप्तरात व नमुना १फ मध्ये नोंदवली जाणार आहे. त्याचबरोबर तालुकास्तरीय समिती व ग्राम रस्ता आराखडा समितीच्या बैठकीत कामकाजाचा आढावा घेऊन अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.
बार्शी, सौंदरे, खांडवी, वैराग, पांगरी, उपळे दुमाला, गौडगाव, पानगाव, नारी, आगळगाव आणि सुडी या मंडळांमध्ये ही कार्यवाही होणार आहे. या ठिकाणी ग्रामसेवक, महसूल अधिकारी, पोलीस पाटील व भूमी अभिलेख अधिकारी यांना जबाबदारी देण्यात आली असून, अतिक्रमण हटवण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलिसांची मदत घेण्यात येईल.
तहसीलदारांनी सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. विलंब झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचे नोंदी व्यवस्थित होतील, अतिक्रमण हटेल आणि शेतकऱ्यांना शेतापर्यंत सहज जाता येईल. तसेच दळणवळण सुधारेल, अशी अपेक्षा आहे. तहसीलदार शेख यांनी यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
#रियल_न्युज