
23/12/2024
बाळकूममध्ये `अनधिकृत इमारती' बांधण्याचा मौसम पुन्हा सुरु
भूमाफिया सुसाट, सहाय्यक आयुक्तांचे मौन
ठाणे - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बाळकूम गांवात अनधिकृत इमारतींची पायाभरणी झाली. तर आता निवडणूक निकालानंतर अनधिकृत इमारतींचे इमले उभे राहू लागले आहेत. तक्रारी करुनही माजिवाडा-मानपाडा प्रभाग समितीचे प्रभारी सहाय्यक आयुक्त तोडक कारवाई करत नसल्याने त्यांच्यावर निक्रिय अधिकारी असल्याची आता टीका होऊ लागली आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील अनधिकृत इमारतींवर दोन वर्षांपूर्वी धडक कारवाईचा बडगा उगारल्यानंतर अनधिकृत बांधकामांची कामे थंडावली होती. मात्र लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकी दरम्यान पालिका हद्दीत पुन्हा अनधिकृत बांधकामे फोफावली आहेत. अनेक ठिकाणी याकाळात अनधिकृत इमारतींची पायाभरणी झाली. आचारसंहितेचे कारण देत कोणत्याही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास पालिका प्रशासनाने टाळाटाळ केली. मात्र आता निवडणूक निकालानंतर ठाणे महापालिका प्रशासन ठोस कारवाई करेल असे वाटत असतांना `अर्थपूर्ण'व्यवहार झाल्याने कारवाईस टाळाटाळ होत असल्याचे बोलले जात आहे.
बाळकूम गाव येथील पाडा नं. ३ मध्ये गेल्या तिन महिन्यांपूर्वी अनधिकृत इमारतीची पायाभरणी झाली. आचारसंहिता काळात चार मजले उभे राहिले. मात्र कोणतीच कारवाई केली गेली नाही. आता तर अनधिकृत बांधकामांबाबत माजिवाडा-मानपाडा प्रभाग समितीच्या प्रभारी सहाय्यक आयुक्तांनी मौन बाळगले आहे. अनधिकृत बांधकामांना जबाबदार धरुन सहाय्यक आयुक्तांवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव काय कारवाई करतात ? याकडे ठाणेकरांचे आता लक्ष लागले आहे.