08/10/2025
१९९० च्या सुरुवातीचा काळ होता. जपानमधला एक साधासुधा इंजिनियर नाव - मसाहिरो हारा. त्या वेळी बारकोड म्हणजे जरा किचकटच काम होतं. स्कॅन करायला वेळ लागायचा, माहिती थोडीच ठेवता यायची. पण गाड्यांची इंडस्ट्री मात्र झपाट्यानं पुढं जात होती. हारा यांच्या डोक्यात रोज हाच प्रश्न फिरायचा की “यासाठी काहीतरी जलद आणि सोपं उपाय नाही का?”
एक दिवस संध्याकाळी तो आणि याचे मित्र “गो” नावाचा खेळ खेळत बसले होते. काळे-पांढरे दगड चौकटीत ठेवताना त्यांच्या लक्षात आलं की, “अरे, माहिती असंच साठवता आली तर?”
आणि तिथंच जन्म झाला “QR Code” चा.
एक छोटा चौकोन ज्यामध्ये कोणत्याही कोनातून स्कॅन होणारा, थोडाफार खराब झाला तरी चालणारा, आणि बारकोडपेक्षा शंभरपट जास्त माहिती ठेवणारा.
हारा आणि त्यांची टीम (Denso Wave) यांनी हा शोध विकायला नाही किंवा स्वतःच्या नावावर पेटंट करून नाही घेतला.या उलट सगळ्यांसाठी फुकट ठेवला “जो वापरू इच्छितो, तो वापरा.”
आणि बघता बघता तो QR Code जगभर पसरला.
आज आपण सगळे त्याचाच वापर करतो आहे. जेवणाचा मेन्यू बघण्यासाठी, पेमेंट करण्यासाठी, दुकानात बिल स्कॅन करायला, इव्हेंटचं आमंत्रण उघडायला.
मसाहिरो हारा यांनी कधी प्रसिद्धी साठी काम केलं नाही पण त्यांनी केलेली ती शांत कल्पना आज आपल्या दैनंदिन जगण्याचा भाग बनली आहे. अगदी आपोआप वापरला जाणारा, पण सगळ्यांना जोडणारा.
सोप्या भाषेत ✍🏻