31/07/2026
एक पत्रकार... जनसंपर्क अधिकारी... ते ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त
संदीप माळवी : एका जिद्दी माणसाची विलक्षण यशोगाथा
एखाद्या व्यक्तीचा प्रवास हा केवळ पदांचा नसतो, तर तो जिद्द, मेहनत, प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा असतो. अशाच संघर्षातून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संदीप माळवी. एका दुर्गम खेड्यातून सुरू झालेला त्यांचा प्रवास पत्रकारिता, जनसंपर्क, प्रशासन आणि साहित्य अशा विविध क्षेत्रांत यशस्वी ठरला. पत्रकारितेच्या क्षेत्रातून प्रवास सुरू करून प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत हजारो लोकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला आणि व्यक्तिमत्त्वाला मनःपूर्वक सलाम.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वाळोली या दुर्गम गावात त्यांचा जन्म झाला. आजही ज्या गावात राज्य परिवहनची बस पोहोचत नाही, अशा गाव खेड्यात बालपण गेले. याच गाव खेड्यातून पुढे शिक्षणासाठी एक संघर्षमय प्रवास सुरू झाला. पोहाळे तर्फे बोरगाव या छोट्या गावातील आश्रम शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवत पुढे माध्यमिक शिक्षणासाठी कोल्हापूरच्या छत्रपती शहाजी कॉलेजच्या साई हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. आपल्या गुणवत्तेची चुणूक त्यांनी लहानपणापासूनच दाखवायला सुरुवात केली होती. पुढे कोल्हापूर महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण (केएमसी) कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी महाविद्यालय शिक्षणासाठी प्रवेश घेतला. महाविद्यालयात बीकॉम चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न धावता लिखाणाची तळमळ त्यांना स्वस्त बसू देत नव्हती म्हणूनच त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागामध्ये पत्रकारिता पदवी घेण्यासाठी प्रवेश घेतला, आपल्या गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी पत्रकारिता विषयात शिवाजी विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळवून शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमठवला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारितेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
पत्रकारिता हेच ‘पाहिलं प्रेम’
पत्रकार होवून सामान्य माणसाचा आवाज बनता येत.सामान्यच्या जगण्याचं दुःख,कष्ट आपल्या लेखणीच्या रूपाने प्रतिबिंबित करता येतात हा विचार कायमचा डोक्यात पक्का करून आपल्या धारदार लेखणीला सुरुवात केली. साप्ताहिक लोकप्रभा, महाराष्ट्र हेराल्ड, दैनिक तरुण भारत, दैनिक पुढारी अशा नामांकित वृत्तपत्रातून त्यांनी आपल्यातल्या संवेदनशील पत्रकारांची एक वेगळी छाप पाडली. त्याकाळी एका लेखाचे केवळ १५ रुपये मानधन मिळत असतानाही त्यांनी लेखणीवरील विश्वास कधीच सोडला नाही. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजजीवनाचा जवळून अभ्यास केला, सामान्य माणसाच्या समस्या जाणून घेतल्या आणि लोकांशी संवाद साधण्याची प्रभावी शैली विकसित केली. कारण पत्रकारिता हेच त्यांचे पहिले प्रेम राहिले आहे.
मुंबईच्या मायानगरीत नव्या संघर्षाला सुरुवात
कोल्हापूरच्या तांबड्या मातीतून मोठी स्वप्ने उराशी बाळगून त्यांनी मुंबईच्या मायानगरीत प्रवेश केला. सुरुवातीला बहिणीकडे चेंबूरच्या झोपडपट्टीत वास्तव्य केले. कोल्हापुरातून दोनच कपड्यावर मुंबईत येवून एका वेळच्या जेवणाची भ्रांत असताना करिअरच्या एका नव्या संघर्षाला सुरुवात केली. पत्रकार म्हणून काम करताना अनेक अडचणींचा सामना केला, पण मेहनत आणि सातत्य यांच्या जोरावर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. काही दिवसातच त्यांनी राज्य शासनाच्या एड्स नियंत्रण संस्थेत संचालक म्हणून पहिल्या शासकीय सेवेत प्रवेश केला.
जनसंपर्क क्षेत्रातील प्रभावी नेतृत्व
सन २०१६ साली त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य माहिती व जनसंपर्क अधिकारी म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी शासकीय सेवेत प्रवेश केला. याचवेळी त्यांनी आपल्या कार्यकाळात महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाला केवळ प्रसिद्धीपुरते मर्यादित न ठेवता, तो शासन आणि जनतेतील विश्वासाचा दुवा बनवला. विविध प्रकल्पांसाठी प्रभावी प्रसिद्धी साहित्याची निर्मिती, स्थानिक, राज्य व राष्ट्रीय माध्यमांशी समन्वय, पत्रकार परिषद व मुलाखतींचे नियोजन, मासिक प्रकाशन, माहितीपट व टीव्ही जाहिरातींची निर्मिती, तसेच विविध सामाजिक व पर्यावरण जनजागृती मोहिमांची यशस्वी अंमलबजावणी करून त्यांनी विभागाची वेगळी ओळख निर्माण केली. शासकीय विभागांशी सुसंवाद, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि प्रभावी जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक उपक्रम जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य अत्यंत समर्पणाने केले. त्यांच्या दूरदृष्टी, कर्तव्यनिष्ठा आणि कार्यक्षम नेतृत्वामुळे जनसंपर्क विभागाला नवी दिशा मिळाली. त्यांच्या संवादकौशल्यामुळे आणि लोकाभिमुख कामकाजामुळे ते सर्वांच्या पसंतीस उतरले.
प्रशासकीय कारकिर्दीचा सुवर्ण अध्याय
मुख्य माहिती व जनसंपर्क अधिकारी पदावर त्यांनी जबाबदारी, संवेदनशीलता आणि कार्यक्षमतेचा उत्कृष्ट नमुना सादर केल्यानंतर त्यांनी उप आयुक्त म्हणून पदोन्नती मिळाली. उप आयुक्त म्हणून मुख्यालय, जनसंपर्क, जाहिरात, क्रीडा विभाग अशा अनेक खात्यांचा पदभार त्यांच्याकडे आला. या प्रत्येक विभागाला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. उप आयुक्त (मुख्यालय) असताना ठाणे महानगरपालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा विषय अनेक वर्ष प्रलंबित होता हा विषय अत्यंत तत्परतेने त्यांनी हाती घेऊन अनेकांना पदोन्नतीचा मार्ग सुकर केला. पदोन्नती वेतनश्रेणी वाढ यासारखे अनेक महत्त्वपूर्ण विषय त्यांनी योग्यरीत्या हाताळले. जनसंपर्क विभागात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे ठाणे महानगरपालिकेच्या कार्याचा डंका महाराष्ट्रसह देशभरात गाजला आहे. क्रीडा विभागात देखील ठाणे मॅरेथॉन, महापौर चषक कबड्डीसह इतर सर्व क्रीडा स्पर्धेत त्यांनी त्यांच्या उत्तम नियोजन व कार्याचा ठसा उमटवला आहे. त्याच काळात ठाणे महानगरपालिका परिवहन विभागाचा व्यवस्थापक म्हणून देखील त्यांनी पदभार घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षाचा कायमस्वरूपीचा प्रश्न देखील त्यांनी मार्गी लावला. आपल्या कार्यतत्परतेने, प्रामाणिकपणाने आणि दूरदृष्टीने त्यांनी प्रशासनात स्वतंत्र ओळख निर्माण करत महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदापर्यंत मजली मारली. याच काळात अत्यंत ताकतीने व धडाडीने मजल मारत एक उत्तम प्रशासकीय अधिकारी म्हणून एक वेगळा आदर्श निर्माण केला. शहर विकास, लोकसहभाग आणि प्रशासनातील नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे त्यांनी ठाणे शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पाने राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला. "मोस्ट पब्लिक सीईओ ऑफ स्मार्ट सिटीज इन इंडिया" हा राष्ट्रीय सन्मान त्यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाचा आणि दूरदृष्टीचा गौरव करणारा ठरला.
संदीप माळवी यांची सामान्य नागरिकांप्रती असणारी आत्मीयता आणि प्रशासनातील चोख कारभारामुळे राज्याचे तत्कालीन लोकप्रिय मुख्यमंत्री व विद्यमान उप मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून देखील त्यांना काम करण्याची संधी मिळाली. याही संधीचे सोनं करत त्यांनी राज्यभरातून आलेल्या प्रत्येक सामान्य नागरिकाला न्याय देण्याचं काम त्यांनी केले आहे. मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी केलेले कार्यही उल्लेखनीय ठरले. झोपडपट्टी पुनर्वसनासारख्या संवेदनशील विषयात लोकांशी सातत्याने संवाद साधत त्यांनी प्रशासनाला मानवी चेहरा दिला. त्यांच्या कार्यशैलीमुळे अनेक विकासकामांना गती मिळाली आणि नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला.
गझलकार ' संदीप माळवी '
संदीप माळवी हे उत्तम प्रशासकीय अधिकारी जरी असले तरी त्या अधिकाऱ्यामागे एक हळवा गझलकार देखील दडलेला आहे. 1999 मध्ये गझलसागर प्रतिष्ठान मुंबई यांच्याद्वारे ‘’कारवा’’ हा पहिला गझल संग्रह त्यांचा प्रकाशित झाला. त्यानंतर ऋतू वेदनांचे हा दुसरा गजल संग्रह देखील त्यांनी प्रकाशित केला हे दोन्ही गझलसंग्रह रसिकांच्या पसंतीस उतरले. त्यांच्या अनेक गझलांना “ गझलनवाज भीमराव पांचाळ यांनी सूरबद्ध केले आहे. आईवर भरभरून प्रेम करणाऱ्या या अत्यंत हळव्या मनाच्या या कवीने 'आई'वर अनेक कविता शब्ध केल्या आहेत. त्यांनी आईवर शब्ध केलेली प्रत्येक कविता काळजाचा ठाव घेतल्या शिवाय राहत नाही. दूरदर्शन आणि आकाशवाणीवरही त्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. जेके फिल्स पुणे निर्मित “ नौकेला शोध किनारा” या मराठी टीव्ही मालिकेसाठी त्यांनी संवाद लेखन केले आहे. तर सह्याद्री वाहिनी मुंबई दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या एचआयव्ही एड्स वरील “दैव जाणिले कुणी” या मराठी मालिकेसाठी काही भाग लिहिले आहेत. त्यांच्या लेखनाला अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले. उत्कृष्ट पत्रकारितेसाठी सन्मान, २००९ चा महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार, पी. सावळाराम पुरस्कार, विठ्ठल उमप पुरस्कार तसेच एकता कल्चरल अकादमी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव झाला आहे.
अनाथांचा नाथ ‘ एकनाथ '
सामान्य कार्यकर्त्यापासून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंतचा एकनाथ शिंदे यांचा संघर्षमय, प्रेरणादायी आणि जनसेवेने समृद्ध प्रवास 'अनाथांचा नाथ एकनाथ' या लोकप्रिय गीतातून संदीप माळवी यांनी प्रभावीपणे उलगडला आहे. जनतेप्रती असलेली तळमळ, सामाजिक बांधिलकी, विकासाची दृष्टी आणि नेतृत्वाचे विविध पैलू या गीतातून भावपूर्ण शब्दांत व्यक्त झाले आहेत. गीतकार संदीप माळवी त्यांच्या समर्थ लेखणीतून एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा आणि जनमानसातील प्रतिमेचा प्रभावी शब्दरूपाने गौरव करण्यात आला आहे. हे गीत केवळ स्तुतिगीत नसून, एका सामान्य कार्यकर्त्याच्या असामान्य प्रवासाची संगीतमय कहाणी म्हणूनही ओळखले जाते.
"तू रणांगणातील वीर... सोडू नकोस तू धीर
कोरोना महामारीच्या कठीण काळात पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी संदीप माळवी यांनी "तू रणांगणातील वीर... सोडू नकोस तू धीर" हे प्रेरणादायी गीत लिहिले. या गीताला समाजमाध्यमांवर मोठा प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, राज्य शासनाने या गीताची दखल घेत अधिकृतपणे हे गीत प्रसारित केले. या स्फुर्तीदायी गीतामुळे कोव्हीड मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला एक वेगळी उर्जा,ताकद मिळाली. कोविड योद्ध्यांना सलाम करणाऱ्या या हृदयस्पर्शी गीतामुळे संदीप माळवी यांच्या संवेदनशील आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वाचा नवा पैलू सर्वांसमोर आला.
अधिकारी नव्हे, माणूस म्हणून मोठेपण
संदीप माळवी यांचे व्यक्तिमत्त्व केवळ एका यशस्वी प्रशासकाचे नाही, तर संवेदनशील लेखक, अभ्यासू पत्रकार, आणि सर्वसामान्य माणसाशी नाळ जपणाऱ्या लोकाभिमुख अधिकाऱ्याचे आहे. त्यांनी पदाचा अधिकार गाजवला नाही; तर जबाबदारी पार पाडली. त्यांनी फाईलपेक्षा माणसाला महत्त्व दिले आणि प्रशासनाला लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. सहकाऱ्यांना प्रेरणा देणे, नव्या कल्पनांना प्रोत्साहन देणे, पारदर्शक प्रशासनावर भर देणे आणि समाजहिताला प्राधान्य देणे ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये राहिली. संदीप माळवी यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा अफाट जनसंपर्क. राजकारण, प्रशासन, पत्रकारिता, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक आणि कला क्षेत्रात त्यांचे असंख्य जिव्हाळ्याचे संबंध आहेत. "माणसं जोडणं" ही त्यांची खरी ताकद ठरली. या जोरावरच त्यांनी विविध पदावर सक्षमपणे काम केले.
नव्या पर्वाची सुरुवात
त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास हा ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी शिक्षण, मेहनत, प्रामाणिकपणा आणि जिद्द यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचे ते जिवंत उदाहरण आहेत. आज त्यांच्या शासकीय सेवेतून निवृत्तीचा क्षण आला असला, तरी त्यांची ओळख केवळ निवृत्त अधिकारी म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील पत्रकार, कुशल जनसंपर्क अधिकारी, दूरदृष्टी असलेले प्रशासक, अभ्यासू लेखक, गझलकार आणि माणसं जोडणारा माणूस अशीच कायम राहील.
"सेवानिवृत्ती ही सेवेला पूर्णविराम नसून,
जीवनाच्या नव्या पर्वाची सुंदर सुरुवात आहे."
संदीप माळवी यांना निरोगी, आनंदी आणि सृजनशील निवृत्त जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या संघर्षमय प्रवासातून अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळत राहो, हीच सदिच्छा.
शब्दांकन
श्री. अभिजीत कोतोलीकर
जनसंपर्क अधिकारी
मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे