08/07/2025
"मीरा रोड मोर्चा, पोलिस कारवाई आणि राजकीय धडे"
मीरा रोड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आयोजित केलेल्या मराठी लोकांच्या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटना आणि त्यावर आलेली प्रशासकीय व राजकीय प्रतिक्रिया हे केवळ कायदा-सुव्यवस्थेचे प्रकरण नसून त्यामागे जनतेच्या भावना, राजकीय संदेश आणि प्रशासनाची जबाबदारी या सर्वांचा समन्वय दिसतो.
पोलिसांकडून मनसेच्या मोर्चाला सुरुवातीपासूनच परवानगी नाकारली गेली. त्यांना आपला रूट बदला असे सांगण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला व शेवटी पोलिसांना त्यांना हवा त्याचा रूट ने मोर्चा नेण्याची परवानगी द्यावी लागली.
त्यात मोर्च्या आधीच्या रात्री पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव यांना मध्यरात्री अटक करून घोडचूक केली. पोलिसांच्या मते त्यांनी अविनाश जाधव ना प्रतिबंधात्मक ताब्यात घेतले होते पण त्यामुळे जनभावनेत उलटा परिणाम झाला. लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली, आणि मनसेच्या भूमिकेला एकप्रकारे सहानुभूती मिळाली.
पोलिसांची कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी निश्चितच महत्त्वाची आहे. परंतु, राजकीय आंदोलनांचे स्वरूप लक्षात घेता आणि त्यामागे असलेल्या सामाजिक भावना समजून घेता, प्रशासनाने सामंजस्याने आणि संवादाने मार्ग काढणे अधिक शहाणपणाचे ठरले असते. मोर्चाला नियंत्रित स्वरूपात परवानगी देऊन, स्थानिक लोकांच्या भावना व्यक्त होऊ दिल्या असत्या, तर तीच ऊर्जा सौम्य मार्गाने व्यक्त झाली असती.
राजकीय पातळीवर पाहता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका गोंधळलेली वाटली. एकीकडे सुरुवातीला त्यांनी मनसैनिकांवर टीका केली, तर नंतर 'समस्या गंभीर आहे' असेही म्हणाले. अशा धरसोड भूमिकांमुळे त्यांच्या गृहमंत्री पदावर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. राज्यातील प्रशासनाला दिशा देण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे, आणि त्यामुळे अधिक स्पष्ट, ठाम आणि संतुलित भूमिका अपेक्षित असते.
मनसेचा मोर्चा, पोलिसांची कारवाई आणि सरकारची प्रतिक्रिया या साऱ्या घटनांतून राज्यकर्त्यांनी एक धडा घेणे आवश्यक आहे – लोकशाहीत लोकांच्या भावना दडपून टाकता येत नाहीत. त्यांना वाट मोकळी करून दिली पाहिजे, संवाद साधला पाहिजे आणि विरोधाचं रूप धारण करण्याआधी त्याचा हेतू समजून घेतला पाहिजे.
यातून प्रशासन आणि राजकीय नेतृत्व दोघांनीही संयम, संवाद आणि संवेदनशीलता यांची आवश्यकता समजून घ्यायला हवी. अन्यथा अशा घटना वारंवार घडत राहतील आणि लोकशाहीच्या मुळावर उठतील.
- दयानंद नेने
8/7/25