10/06/2025
अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध कत्तलखान्यांवर धाड: १७ जनावरे आणि ३०० किलो गोमांस जप्त
अहिल्यानगर - जिल्ह्यात अवैध कत्तलखान्यांविरोधात मोठी कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच ठिकाणी छापे टाकून तब्बल ७.६५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या कारवाईत १७ गोवंशीय जनावरे तसेच सुमारे ३०० किलो गोमांस जप्त करण्यात आले असून, १५ आरोपींविरुद्ध पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक मा. सोमनाथ घार्गे यांच्या आदेशावरून ही कारवाई पार पडली. पोनि दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या चार पथकांनी भिंगार कॅम्प, सोनई, लोणी, नेवासा व कर्जत येथे छापे टाकले.
या कारवाई दरम्यान कॅम्प पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ३४३/२०२५ अंतर्गत १५० किलो गोमांसासह इरफान कुरेशी व इतर तिघांना अटक करण्यात आली. इतर चार गुन्ह्यांत अनेक आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.
सोनई, लोणी, नेवासा व कर्जत परिसरात विविध ठिकाणी जनावरे निर्दयतेने डांबून ठेवून त्यांची कत्तल करण्याच्या उद्देशाने व्यवस्था केली जात असल्याचे उघडकीस आले आहेत.
या सर्व कारवाया पोलिस अधीक्षक घार्गे, अपर अधीक्षक प्रशांत खैरे व वैभव कलुबर्मे, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, कॉन्स्टेबल संदीप पवार, संदीप दरंदले, रोहित येमुल, अरुण गांगुर्डे, इतर पोलीस अंमलदारांच्या चार पथकांनी केली आहे.
पोलीस प्रशासनाने या प्रकारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अवैध कत्तलखान्यांच्या विरोधातील ही कारवाई जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे.