12/08/2025
मीरा भाईंदरमध्ये मराठी विरुद्ध परप्रांतिय वाद पुन्हा पेटला आहे. नवघर येथील चंदन पार्क सोसायटीत राहणाऱ्या कादंबरी खांडेकर या महाराष्ट्रीयन महिलेवर, परप्रांतिय महिला उमा पांडे हिने जातीवाचक शिवीगाळ करत चप्पलेने मारहाण केल्याचा आरोप आहे. “महाराष्ट्रीय लोगों में चरबी बहोत होती है, तुम गंदगी में रहने वाले लोग हो” असे वादग्रस्त विधान करून, उमा पांडे हिने सार्वजनिक ठिकाणी अपमान केला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, बार गर्ल म्हणून काम करणारी आणि ओळखीच्या जोरावर गुंडगिरी करणारी ही महिला, वारंवार भटकी कुत्री सोसायटीत आणते, रहिवाश्यांना धमकावते, आणि विरोध करणाऱ्यांना मारहाण करते.
या घटनेनंतर कादंबरी खांडेकर यांनी त्याच दिवशी नवघर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. मात्र पोलिसांनी गंभीर गुन्हा नोंदवण्याऐवजी अदखलपात्र गुन्हा दाखल करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. उलट, उमा पांडे हिने खोटी तक्रार देत खांडेकर यांच्या पतीवर दारू पिऊन त्रास दिल्याचे आरोप करताच, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आणि बॉन्ड लिहून घेण्याचा दबाव टाकला. खांडेकर दाम्पत्याने दारूचे सेवनच केले नसल्याचे सांगत सही करण्यास नकार दिला असता, पोलिसांनी २५ हजार रुपये भरण्याची धमकी दिली.
३१ जुलै रोजी घडलेल्या या घटनेत, पोलिसांनी खोटी तक्रार तपासण्याची तसदी घेतली नाही. सुनिल खांडेकर यांची वैद्यकीय तपासणी केली असती, तर तक्रार बनावट असल्याचे उघड झाले असते, असे स्थानिकांचे मत आहे. उलट, पोलिसांनी परप्रांतिय महिलेच्या दबावाखाली खोटे गुन्हे नोंदवून, मराठी दाम्पत्याला मानसिक त्रास दिल्याचा आरोप होत आहे. सोसायटीतील रहिवाश्यांनी पोलिस प्रशासनाच्या असक्षमतेवर आणि पक्षपाती वर्तनावर सवाल उपस्थित केला आहे.
या प्रकरणाची तक्रार आता ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्याकडे देण्यात आली असून, खांडेकर दाम्पत्याने न्याय मिळवण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे.