24/04/2025
श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (जि. पुणे) येथील अतुल पाचुंदकर यांनी बाजारपेठेत भावणारा लाल आकर्षक, वजनदार व अधिक काळ टिकणाऱ्या दर्जेदार कांदा उत्पादनात तज्ज्ञ शेतकरी (मास्टर) असे नाव तयार केले आहे.
Agriculture Success Story : पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील पाचुंदकर यांच्या एकत्रित कुटुंबाची १०० एकर शेती आहे. सध्या कुटुंबातील ३६ वर्षे वयाचे युवा शेतकरी अतुल कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने शेतीची मुख्य जबाबदारी सांभाळतात. एकूण शेतीपैकी ३० एकर शेती ओलिताखाली आणली आहे. उर्वरित शेती बागायती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कांदा हे कुटुंबाचे मुख्य पीक असून त्यासह, ऊस, चिकू, सीताफळ आदी पिके घेतील जातात.
कांदा पिकात हातखंडा
अतुल यांनी कांदा शेतीत हातखंडा तयार केला आहे. दरवर्षी तीन ते चार एकरांत त्यांचे हे पीक असते. पूर्वी पारंपरिक पद्धतीने ते कांदा उत्पादन घेत. मात्र त्यातून हवे तसे उत्पादन व उत्पन्न मिळत नव्हते. बऱ्याच वेळा बाजारात भेटणारे बियाणे निकृष्ट किंवा कमी प्रतीचे असल्याने उत्पादनावर परिणाम व्हायचा. अखेर स्वतःच कांदा बियाणे निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाच- सहा गुंठे क्षेत्रावर दरवर्षी नोव्हेंबरमध्ये बीजोत्पादन प्लॉट घेतला जातो. बियाणे निर्मितीसाठी त्यांनी सखोल अभ्यासही केला. त्यानुसार पुढीलप्रमाणे वाण व बियाणे निवड होते.
-गावरान वाणाची निवड. रोगप्रतिकारक शक्ती अधिक असलेले बियाणे. त्यावर करपा आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव कमी जाणवतो.
-सिंगल रिंग, ओलसरपणा कमी. जो फुटत नाही. साधारण सहा महिने या बियाण्याचा कांदा वखारीत टिकतो.
-सुमारे १२० दिवसांत वाण काढणीला येते.
-आकर्षक लाल रंग, चवीला चांगला. ग्राहकांना तो आपल्याकडे आकर्षित करतो.
-अतुल सांगतात, की फुटीचा, दुबाळ, डेंगळे असलेला कांदा बीज निर्मितीसाठी वापरू नये. हा कांदा दीर्घकाळ टिकण्यास योग्य नसतो. त्यात ओलसरपणा अधिक असतो. यामुळे लवकर खराब होतो.
जमिनीची प्रतही चांगली हवी. परिसरातील भागात कीटकनाशकांचा वापर फार नसावा. म्हणजे मधमाश्यांना परागीभवन करण्यासाठी सोपे होऊन जाते. तसेच आसपास त्याच जातीचे बीजोत्पादन शेतकरी घेत असतील तर कांदा बियाण्यात भेसळ वा ते दूषित होण्याचा धोका कमी असतो.
कांदा शेतीतील व्यवस्थापन-
-नोव्हेंबरच्या दरम्यान चांगल्या जागेची निवड करून नांगरट व पाळ्या घालून शेत तयार केले जाते.
-त्यामध्ये शेणखत एकरी दोन ट्रेलर व लागवडीनंतर जमिनीतून
कीटकनाशक व बुरशीनाशक यांचा वापर. जेणे करून मातीतील किडी-रोगांना अटकाव व्हावा.
-वाफे तयार करून व खड्डे करून त्यामध्ये मोठ्या आकाराच्या कांद्याची लागवड. सुरुवातीला पाटपाण्याद्वारे पाणी. त्यानंतर ठिबक सिंचन. सुमारे आठ ते दहा दिवसांनी कांदे उगवून येतात.
-त्यानंतर सुमारे पंधरा दिवसांनंतर खुरपणी केली जाते. बियाण्यांचे गोठ काढणीपर्यंत किमान सहा ते सात खुरपण्या. त्यामुळे तणही चांगल्या पद्धतीने निघते व तणनाशक वापरण्याची गरज पडत नाही.
-चार महिन्यात गोठ तयार होतात. पुढे झोडपणी, खराब बियाणे बाजूला करण्यासाठी प्रतवारी, उफणणी, व चांगल्या दर्जाचे बियाणे तयार होते.
-डिसेंबरमध्ये कांद्याची लागवड असते. त्यासाठी या बियाण्याचा वापर होतो. सुरवातीला नर्सरी तयार केली जाते. त्यामध्येही शेणखताचा वापर होतो. दोन ते तीन टप्प्यांत रोपे तयार केली जातात. त्यामुळे सर्व लागवड एकाचवेळी येत नाही. टप्प्याटप्प्याने व दीर्घकाळ कांदा बाजारात विक्रीस उपलब्ध होतो.
-रोपे ५५ ते ६० दिवसांची पाणी सोडून वाफे भरल्यानंतर रोपांची पुनर्लागवड होते.
-दोन रोपांत पाच ते सहा इंच अंतर ठेवले जाते. त्यामुळे हवा खेळती राहून कांदा पोसण्यास मदत होते.
आंतरमशागत सोयीची होते. कांद्याचा कार वाढण्यास मदत होते.
-अतुल रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करण्यावर भर देतात. त्यात गोमूत्र, शेणखत, जिवामृत, जैविक खते आदींचा वापर करतात.
उत्कृष्ट व्यवस्थापनातून एकरी ९ ते १२ ते १५ टनांपर्यंत कांद्याचे उत्पादन अतुल यांनी साध्य केले आहे. कांद्याचे ५०० ग्रॅमपर्यंत वजनही त्यांनी साध्य केले आहे. त्यांच्या आकर्षक लाल, दर्जेदार कांद्याची व्यापाऱ्यांकडून बांधावरच खरेदी होते. अतुल सांगतात, की महाशिवरात्रीपर्यंत कांद्याला चांगले म्हणजे किलोला २४ रुपयांपर्यंत दर मिळतात. त्यानंतर बाजारात आवक वाढेल तशी त्यात घट येऊ लागते. त्यावेळी किलोला १४ रुपयांपर्यंत दर मिळतो.
मशागतीपासून ते काढणी मजुरीपर्यंत एकरी एक ते सव्वा लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. आपल्याकडून खरेदी केलेल्या कांद्याची व्यापारी पुढे काही महिने साठवणूक करतात, कांदा टिकतोही दीर्घ काळ असे अतुल सांगतात. यंदा सव्वा एकरात १४ टनांपर्यंत कांद्याची काढणी झाली आहे. यंदा ज्यावेळी बाजारात किलोला ९ ते १० रुपये दर सुरू होते त्यावेळी केवळ गुणवत्तेमुळे व्यापाऱ्यांनी १४ रुपये दराने आपला कांदा खरेदी केल्याचे अतुल सांगतात.
साधारण यंदाच्या फेब्रुवारीच्या दरम्यानची घटना. राज्याचे माजी साखर आयुक्त व यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड गावी जात असताना त्यांना वाटेतील अतुल यांचे कांदा पीक पाहण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी या शेताला भेट देऊन सर्व माहिती घेतली व कुटुंबाच्या प्रयत्नांची, कामांची प्रसंशाही केली.
अतुल यांचे वडील दिलीप, आई शकुंतला व चुलतबंधू सागर यांची शेतीत मदत होते. पत्नी प्रगती या बीएस्सी ॲग्री असून त्याही पतीच्या खांद्याला खांदा लावून शेती करतात. या दांपत्याला विश्वतेज व रुद्रनील अशी गोंडस मुलेही आहेत. अतुल चांगले ऊस उत्पादकही आहेत. ते एकरी सुमारे ८० टन उत्पादन साध्य करतात. अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करतात.
अतुल पाचुंदकर, ९७६५१११४००