09/09/2025
खरी मैत्री कशी असावी तर अशी...
१० मार्च. तो दिवस अजूनही डोळ्यासमोर उभा आहे. माझा सहकारी प्रज्वल गीते - जो रोज हसतमुखाने जगाला सामोरा जायचा, त्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त भगवा झेंडा लावत असताना अचानक विजेच्या तारेला धडकला. क्षणभरात त्याच्या संपूर्ण शरीराला ठिणग्या लागल्या, संपूर्ण अंग भाजलं, आणि जीवन-मृत्यूच्या दरम्यान त्याची लढाई सुरु झाली.
सुरभी हॉस्पिटलमध्ये जवळपास तीन महिने उपचार, चार ते पाच मोठ्या शस्त्रक्रिया, रात्री-दिवस डॉक्टर, औषधं, वेदना, रक्त आणि घाम... पण तरीही त्याच्या जखमा आजही शांत झालेल्या नाहीत. डॉक्टरांनी तर हात कापावे लागतील असंही सांगितलं होतं. म्हणजे कल्पना करा- ज्याचे हात कामासाठी, जगण्यासाठी, जगण्याचा हक्क मिळवण्यासाठी आहेत, तेच हात हरवण्याची वेळ त्याच्यावर येतेय.
या सगळ्या संकटाच्या वादळात त्याच्या घरी एकटं आधार आहे - वृद्ध वडील. आईचं आधीच निधन झालेलं. घरात ना बहीण, ना भाऊ, ना कोणी सांभाळणारं.
खरी मैत्री म्हणजे काय?
इथेच येतो एक नाव सार्थक आडेप. हा तरुण स्वतः नोकरी करतो, स्वतःचं आयुष्य सांभाळतो. पण गेल्या सहा महिन्यांपासून त्याने आयुष्याचं ध्येय ठरवलंय आपला मित्र प्रज्वल वाचवायचा.
दोन वेळा रोज, कामाच्या ताणातून वेळ काढून, तो स्वतःच्या हाताने प्रज्वलला जेवायला घालतो. मी जेवणाची व्यवस्था करतो, पण प्रज्वलचे हात जखमी असल्यामुळे तो स्वतः खाऊ शकत नाही. तेव्हा सार्थक स्वतःच्या हाताने घास घास प्रेमाने खाऊ घालतो. सहा महिन्यांत एकही दिवस त्याने हा नियम मोडलेला नाही. प्रज्वलच्या अजून दोन शस्त्रक्रिया होणे बाकी आहे त्याची पायाची बोटेही उपचारादरम्यान कापण्यात आली आहे.
प्रश्न पडतो - कुणी एवढं करेल का?
सुखात सगळे सोबती, दुःखात जो उभा... तोच मित्र सुखात पार्टी, फिरायला जाणं, फोटो, सेल्फी, हशा-टवाळक्या हे सगळेच करतात. पण खरी कसोटी तेव्हा असते, जेव्हा एखाद्या मित्राच्या आयुष्यावर संकट येतं, दुःख त्याचं दार ठोठावतं. तेव्हा कितीजण धावून येतात? बहुतांश लोक दूर सरकतात, कारण वेळ, पैसा, जबाबदारी, आणि त्रास कोणाला घ्यायचा असतो? पण सार्थकने दाखवून दिलं-खरी मैत्री म्हणजे हसण्यात साथ देणं नव्हे, तर वेदनेत हात धरून उभं राहणं.
सार्थक आडेप - एक जिवंत आदर्श
सार्थकने जे केलंय, ते पुस्तकात वाचायला मिळेल असं नाही. ही खरी कहाणी आहे, जी आजच्या समाजाला आरसा दाखवते. त्याच्या निःस्वार्थ सेवेला, त्याच्या जिद्दीला, आणि त्याच्या खऱ्या मैत्रीला माझा मनापासून सलाम.
मा.श्री.निखिल बाबासाहेब वारे
९८५००००८५२