
27/05/2025
कळलेले एवढे शेवटी असते
व्यक्त व्हायची सवय घातकी असते
फरक पडू शकणार जिच्या भरण्याने
ती घागर नेमकी पालथी असते
काही नाती काही काळा पुरती
(ती जन्माची कुठे बेगमी असते?)
आपण लहान होउन शोधत नाही
कुठे कुठे चतकोर सावली असते
हे कळल्याने सगळी उमेद सरली
सुटका म्हणजे नवी कोठडी असते
शिखरावरही अपयश येऊ शकते
कुणी म्हणो पहिलीच पायरी असते!
झाड पिकवते पानांना घाईने
रांगेमध्ये नवी पालवी असते!
हट्ट जिचा टाळणे जिवावर येते
ती इच्छा सर्वात लाडकी असते!
उगाच नाही तोल डळमळत माझा!
तुझी हाकही तशी वादळी असते!
ना फडफडता शांतपणे विझणारी
एखादी वेगळी वातही असते!
दरवाजा नेमका आढळत नाही!
जेव्हा इच्छा निघुन जायची असते!
कसेही जगा त्याचा आदर होतो!
मेल्यानंतर छान पालखी असते!
---©प्रसाद
#दत्तप्रसाद #गझल