
04/08/2025
नवीन मोबाईल न दिल्याच्या कारणावरून १६ वर्षीय मुलाची आत्महत्या; खवड्या डोंगरावरून उडी
मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर – आई नवीन मोबाईल घेऊन देत नसल्याने रागाच्या भरात १६ वर्षीय मुलाने थेट १०० फूट उंच खवड्या डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवारी ३ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास तिसगाव शिवारातील वाळूज एमआयडीसी परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अथर्व गोपाल तायडे (वय १६, रा. गल्ली क्र. ४, स्वस्तिक सिटी, तिसगाव, वाळूज एमआयडीसी, मूळ रा. रामदेवनगर, जळगाव जामोद, जि. बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अथर्व ११ वीत शिक्षण घेत होता. पोलीस भरतीसाठीही तो सराव करत होता.
अथर्वकडे जुना मोबाईल होता, पण तो वारंवार आईकडे नवीन मोबाईल घेऊन देण्यासाठी आग्रह करत होता. मात्र, आर्थिक अडचणीमुळे आईने नकार दिला. रागाच्या भरात अथर्वने घर सोडले आणि थेट तिसगाव शिवारातील खवड्या डोंगर गाठला. त्याच्या मागे धावतच आईदेखील घराबाहेर पडली, मात्र डोंगरावर पोहचताच अथर्वने जवळपास १०० फूट उंचीवरून स्वतःला खाली झोकून दिले. हे दृश्य आईने पाहताच ती थरकापून गेली.
घटनेनंतर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून अथर्वला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेने तायडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आईचा फोडलेला हंबरडा उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. पोलीस अधिक तपास करीत आहेत..................................................
मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU