07/01/2026
मकरसंक्रांतीनिमित्त ‘तरुण तुर्क, म्हातारे अर्क’चा महिलांसाठी विशेष सवलतीच्या दरात खास प्रयोग
मकर संक्रांतीनिमित्त घरोघरी सुवासिनी महिलांना बोलावून हळदी-कुंकू समारंभ साजरा करण्याची परंपरा आहे. याच पारंपरिक भावनेला सांस्कृतिक रंग देत, लोकप्रिय विनोदी नाटक ‘तरुण तुर्क, म्हातारे अर्क’च्या पाच महिला निर्मात्यांनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिलांसाठी खास नाट्यप्रयोग आयोजित केला आहे.
नुकतेच व्यावसायिक रंगभूमीवर सादर झालेले हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून, या विशेष प्रयोगाला फक्त महिला प्रेक्षकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. बुधवार, १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी दुपारी ४ वाजता विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा विशेष प्रयोग रंगणार आहे.
या प्रयोगानिमित्त महिला प्रेक्षकांसाठी भेट म्हणून तिकीट दरात १०० रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे नेहमीचे ५००, ४०० आणि ३०० रुपयांचे तिकीट दर अनुक्रमे ४००, ३०० आणि २०० रुपये असे असणार आहेत. महिलांनी या सवलतीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन निर्मात्यांकडून करण्यात आले आहे.
महिलांनीच निर्मिती केलेल्या या नाटकाचा महिलांसाठी खास प्रयोग ही संकल्पना स्तुत्य असून, मकर संक्रांतीचा आनंद हास्य आणि मनोरंजनाच्या माध्यमातून साजरा करण्याची अनोखी संधी या उपक्रमातून मिळणार आहे.
[Marathi Natak, Show, Theatre, Play, Drama, Myrangabhoomi, Marathi, Natak, Stage, Tarun Turk Mhatare Ark]