09/10/2020
दिनांक ८ ऑक्टोबर २०२० रोजी वाडा येथे 'हाथरस मधील जातीय द्वेषातून एका तरुणीचा बलात्कार केल्याच्या घटनेचा निषेध' करण्यासाठी अनेक नागरिक एकवटले होते. वाड्यातील खंडेश्वरी नाका येथे जमून आयोजकांनी निषेध सभेचे उद्दिष्ट सर्व सहभागी नागरिकांना सांगितले. रॅली काढण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांकडून परवानगी नसल्याने रॅली न काढताच तहसील कार्यालय वाडा येथे जमण्याचे ठरवण्यात आले. तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन, वाडा येथे हाथरस प्रकरणी न्याय व्हावा यासाठी उपस्थित नागरिकांच्या सह्या असलेले निवेदन सादर करण्यात आले. त्यापूर्वी अनेक नागरिकांनी कार्यालयासमोर आपल्या प्रतिक्रिया देत तीव्र शब्दात आपला निषेध नोंदवला.
स्त्रियांवरील अन्याय, अत्याचाराच्या घटना देशात कुठे ना कुठे नेहमीच घडत असतात. महिला सुरक्षेच्या बाबतीत भारताचा जगात खूप खालचा नंबर लागतो. प्रत्येक वीस मिनिटाला स्त्रियांवर अत्याचार होत असतो. सामाजिक विषमता ही महिलांवरील अत्याचार आणि त्यांच्या अधिकारांचे दमन करून टिकवली जाते. हाथरस या घटनेचा जगभरातून निषेध नोंदवला जात आहे. स्थानिक पातळीवर सुद्धा या घटनेची दखल घेणे खूप गरजेचे आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांनी सुचविलेल्या मार्गाने आणि संविधान मार्गाने आपण स्त्रिया, दलित, बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी लढणे आपले कर्तव्य आहे.
कोरोनाच्या काळातसुद्धा ग्रामीण भागातील महिला व नागरिकांनी उपस्थित राहून या घटनेचा तीव्र निषेध केला आणि अत्याचाराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली.
- तनुजा हरड, (एम. ए. वुमेन्स स्टडीज)