
13/07/2025
🌽 भारत सरकारचा सन्मान 🌽
"इंडिया मका समिट 2025" मध्ये सोलापूरच्या शेतकऱ्याचा राष्ट्रीय सन्मान!
सोलापूर/ प्रतिनिधी - दिनांक 7 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली येथील FICCI संकुलात पार पडलेल्या ११व्या भारतीय मका परिषदे दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील शिवणी गावाचे प्रगतशील शेतकरी श्री. रुकमांगत गुंड यांना देशाचे केंद्रीय कृषिमंत्री मा. श्री. शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
श्री. गुंड यांनी ICAR - Indian Institute of Maize Research (IIMR) यांच्या कॅचमेंट एरिया प्रकल्पाअंतर्गत रब्बी हंगाम 2024 मध्ये घेतलेल्या प्रात्यक्षिकामध्ये DHM-117 या वाणाचे मका बियाणे व एक लिटर मायक्रो न्यूट्रिएंट्स मिळवून, ते ऊस + मका आंतरपीक पद्धतीने अत्यंत प्रभावीपणे राबवले.
या प्रणालीमध्ये त्यांनी:
ठिबक सिंचन (Drip Irrigation)
एकात्मिक कीड व रोग नियंत्रण (IPM)
फर्टिगेशनवर आधारित पोषण व्यवस्थापन
यासारख्या आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला.
त्यामुळे श्री. गुंड यांनी मका पिकातून एकरी तब्बल 26 क्विंटलचे देशात सर्वाधिक उत्पादन घेतले, व 2450 रुपये प्रति क्विंटल या दराने विक्री करून अधिक उत्पन्न मिळवले. त्यामुळे ऊस पिकाचा खर्चही भरून निघाला.
त्यांच्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबर 2025 मध्ये ऊसातून 70 ते 75 टन एकरी उत्पादनाची अपेक्षा आहे, जे या मॉडेलचे यश अधिक ठळक करते.
श्री. गुंड हे श्री गणेश शेतकरी गट शिवणी तसेच HortiMax Farmer Producer Company चे सक्रिय सदस्य असून, ICAR-IIMR व महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी लाभले.
या पुरस्कारामुळे "ऊस-मका आंतरपीक प्रणाली" चे एक यशस्वी व शाश्वत मॉडेल देशासमोर आले आहे.
श्री. गुंड हे ग्रामीण भारतातील कृषी परिवर्तनाचे एक प्रेरणादायी उदाहरण बनले आहेत.