04/01/2023
७५ वे म्हणजे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असणार्या प्रसाद प्रकाशनाने भारतीय संस्कृतीची नव्याने ओळख हे सूत्र धरून कार्यरत राहिले आहे. या कालावधीत धार्मिक, सांस्कृतिक विषयात वैविध्यपूर्ण काम करत असताना व ते भारतात परदेशात सर्वत्र पोचवीत असताना अजून एक कालानुरूप अभिनव अश्या प्लॅटफॉर्मशी आपण आजपासून जोडले जात आहोत. ePrasaran internet radio हे या प्लॅटफॉर्मचे नाव. श्री. अतुल वैद्य व सौ. विद्या वैद्य यांच्या या अभिनव उपक्रमाने आज आकाशात भरारी घेतली आहे.
गेली साडेसोळा वर्षे परदेशातील मराठी बांधवांची मराठीतील विविध विषयांशी जोडली जाण्याची तहान भागविण्याचे मोठे कार्य करीत असताना हा रेडीओ आज तब्बल १६० देशात सुमारे २ मिलियन मराठी बांधव नित्यश: हा रेडीओ ऐकत असतात.
अशा या रेडीओवर आजपासून आपले इंडिक रूट्स हे चॅनेल सुरु होत असून अध्यात्म, धर्म, इंडॉलॉजी, पुरातत्व अशा आपल्या प्राचीन संस्कृतीशी जोडून देणारे कार्यक्रम त्या त्या क्षेत्रातील सखोल अभ्यासकांच्या द्वारे अतिशय सोप्या रसाळ शैलीत आपल्याला ऐकायला मिळतील.
आजच्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत, डॉ. श्रीकांत बहुलकर यांना. संस्कृत, बौद्ध, जैन साहित्य, याबरोबरच अनेकानेक विषयांचा अभ्यास असणारे सर आज आपल्याला संस्कृत भाषेचा इतिहास सांगणार आहेत. देशविदेशात आपल्या कामाने प्रसिद्ध असणाऱ्या, भांडारकर इन्स्टिट्यूट, पुणे विद्यापीठ, डेक्कन कॉलेज अशा सर्व ठिकाणांशी जवळचा संबंध असणाऱ्या सरांकडून तो ऐकायची संधी कोणीच दवडणार नाही अशी माझी खात्री आहे.
डॉ. गो. बं. देगलूरकर सरांनी आपल्या या उपक्रमास दिलेले शुभाशीर्वाद आपण सुरुवातीला ऐकणार आहोत व काही कालावधीत त्यांना भेटणार आहोतच.
प्रसादच्या सर्व उपक्रमांना वाचकांची भरभरून साथ मिळत असतेच. ती याही उपक्रमाला आपण द्याल अशी माझी खात्री आहे.
डॉ. उमा बोडस,
संपादक व संचालक,
प्रसाद मासिक व प्रकाशन
कार्यक्रम ऐकण्या साठी www.eprasaran.com या लिंक वर Indic Roots सिलेक्ट करा.