23/09/2025
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याची व्यथा : तो रडत नव्हता, काळिज फाटलं होतं...
-------------
त्याच्याकडे पाहवत नव्हतं. आभाळ फाटून जमिनीवर कोसळत होतं आणि इथं बांधावर बसून त्याचं काळीज फाटत होतं. रापलेल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमधून अश्रूंचे पाट वाहत होते. पण ते अश्रू नव्हते; ते तर चिखलात मिसळून वाहून गेलेलं त्याचं भविष्य होतं. त्याचा तो हुंदका... एखाद्या जखमी जनावराने टाहो फोडावा, तसा काळजात चर्रर्र करून जाणारा होता. तो बळीराजा होता, जगाचा पोशिंदा, पण आज तो स्वतःच निराधार, हताश होऊन धाय मोकलून रडत होता.
चार महिन्यांपूर्वी याच मातीत त्याने स्वप्नं पेरली होती. लेकीच्या लग्नाची, मुलाच्या शिक्षणाची, डोक्यावरचं कर्ज फिटण्याची... प्रत्येक दाण्यासोबत एक आशा अंकुरत होती. हिरवीगार रोपं वाऱ्यावर डोलू लागली की त्याचा ऊर अभिमानाने भरून यायचा. त्याने रक्ताचं पाणी करून, घाम गाळून त्या पिकाला लेकरासारखं जपलं होतं. पण ज्या आभाळाकडे तो आशेने पाहत होता, त्याच आभाळाने घात केला. पाऊस आला, पण तो अमृतधारा घेऊन नाही, तर प्रलय घेऊन आला.
आज त्याच्या डोळ्यांसमोर शेत नव्हतं, तर एक चिखलाचा अथांग सागर होता. ज्या सोयाबीनच्या शेंगांनी त्याचं घर भरणार होतं, त्या आज पाण्याखाली सडून गेल्या होत्या. ज्या जमिनीला तो 'काळी आई' म्हणायचा, तीच आई आज त्याच्या डोळ्यादेखत वाहून गेली होती. त्याने चिखल झालेली मूठभर माती हातात उचलली, पण ती बोटांच्या फटीतून निसटून गेली... अगदी त्याच्या नशिबासारखी!
तो कुणाशी बोलत होता? त्या कोसळणाऱ्या पावसाशी? त्या निर्दयी आभाळाशी? की स्वतःच्याच फुटलेल्या नशिबाशी?
"काय चुकलं रं माझं?" त्याचा आवाज हुंदक्यात विरून जात होता. "थेंबासाठी जीव टाकत होतो तवा रुसला... अन् आता नको म्हणतोय तर सगळं घरदारच वाहून घेऊन चाललायस! अरे, पीक नेलंस, जमीन नेलीस... आता माझा जीवच घेऊन जा. कशाला ठेवलंयस हे मढं जगायला?"
त्याच्या त्या प्रत्येक शब्दात वर्षांनुवर्षांची मेहनत, अपमान, निराशा आणि पराभव दाटला होता. सावकाराच्या कर्जाचे आकडे त्याच्या डोळ्यासमोर नाचत होते. मुलाबाळांचे भुकेले चेहरे त्याला दिसत होते. आता उद्या जगायचं कसं? या एकाच प्रश्नाने त्याचा जीव व्याकूळ झाला होता.
तो कणखर कणा असलेला शेतकरी आज मोडून पडला होता. त्याचे खांदे झुकले होते. त्याची नजर शून्य झाली होती. तो फक्त रडत होता... बापजाद्यांपासून जपलेली जमीन निसटून गेल्याचं दुःख, डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी झाल्याची वेदना आणि भविष्याच्या अंधाराची भीती... हे सगळं त्याच्या अश्रूवाटे बाहेर पडत होतं.
तो एकटा नव्हता रडत. त्याच्या रूपात, आज नियतीने आणि व्यवस्थेने मिळून झोडपलेला प्रत्येक शेतकरी आक्रोश करत होता. तो रडत नव्हता, तर बळीराजाच्या नशिबी आलेला संपूर्ण काळाकुट्ट वर्तमानकाळच हुंदके देत होता. आणि त्याचा तो आवाज ऐकायला तिथे कोणीच नव्हतं... फक्त कोसळणारा पाऊस आणि चिखलाचा समुद्र!
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह