08/08/2025
‘नशामुक्त गाव अभियान’ची बार्शीत प्रभावी सुरूवात – अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, जनजागृतीला चालना....
बार्शी (ता. ८ ऑगस्ट):
‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत बार्शी तालुक्यातील गावांना व्यसनमुक्त करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, यासाठी ‘नशामुक्त गाव अभियान’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. बार्शी तहसील कार्यालय आणि आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र, जामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात ही कार्यशाळा पार पडली.
या कार्यक्रमात महसूल विभागाचे अधिकारी, पोलिस पाटील तसेच गावपातळीवरील महत्वाच्या घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कोडेतवार, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, तहसीलदार एफ.आर. शेख, माढा तहसीलदार संजय भोसले, आयुष केंद्राचे संचालक डॉ. संदीप तांबारे, निवासीनायब तहसीलदार सुभाष बदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. कोडेतवार म्हणाले, “नशामुक्त गाव अभियान हे नशामुक्त भारताकडे जाणारे अत्यंत आवश्यक व प्रभावी पाऊल आहे. बार्शी तालुक्याने या अभियानात नक्कीच उदाहरणात्मक कामगिरी करावी.”
डॉ. संदीप तांबारे यांनी उपस्थितांना अभियानाची विस्तृत माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी नशाविरोधी स्पर्धा, महिलांसाठी जागर मेळावे, नशाविरोधी रॅली, ग्रामसभा ठराव, उपचार व पुनर्वसन सुविधा अशा विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमात बोलताना तहसीलदार एफ.आर. शेख म्हणाले, “१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण तालुका नशामुक्त करण्याची ही सुवर्णसंधी आहे. यासाठी महसूल, पोलीस, आरोग्य, ग्रामपंचायत इत्यादी सर्व विभागांनी एकत्रितपणे पुढाकार घेणे गरजेचे आहे.”
बार्शी व माढा तालुक्यातील नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी, महसूल कर्मचारी, पोलिस पाटील अशा सुमारे २०० जणांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना नशामुक्त भारताची शपथ देण्यात आली तसेच तणावमुक्ती व नैतिक पुनर्रचना तंत्रांची प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वप्नील जाधव, अश्विनी कुंभार, मनीषा शिंदे, सूरज पवार, सोहेल शेख, मृदुल हजारिका, सुजित ढेकळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमातून गावपातळीवर नशाविरोधी जनजागृतीला गती मिळणार असून, गावकऱ्यांच्या सक्रिय सहभागातून नशामुक्त बार्शी तालुका घडवण्याचा निर्धार यावेळी घेण्यात आली.
Sanwad News1
संपादक, प्रदीप माळी
9689264436
#तालुका #वैराग #बार्शी