15/11/2025
*अहिल्यानगरच्या ग्रामीण भागात बिबट्याची दहशत.*
*अहिल्यानगर (हेमंत साठे) :- तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. नगर पुणे महामार्गावर कामरगाव येथे मंगळवार (दि ११) अज्ञात वाहनांच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी साठेवाडी शिवारात रात्री शेतात शेतकऱ्यांना दुसऱ्या बिबट्याचे दर्शन झाले. ही घटना ताजी असताना बुधवारी (दि.१२) सायंकाळी साडे सहा वाजता खारे कर्जुने ) शिवारात घरच्यांसमोर बिबट्याने पाच वर्षाची मुलगी रियांका सुनील पवार हिला उचलून नेले. मिळालेल्या माहितीनुसार,
खारेकर्जुने येथे शेतात काही कुटुंबे शेतमजूर म्हणून काम करत आहेत. शेतावर वस्ती असल्याने कुटुंबातील काही सदस्य सायंकाळी साडेसहा वाजता थंडी वाढल्याने शेकोटी करून शेकत बसले होते. त्यावेळी रियांका सुनील पवार ही पाच वर्षांची मुलगी जवळच खेळत होती. त्याचवेळी शेजारील तुरीच्या शेतातून अचानक बिबट्या आला आणि घरच्या लोकांच्या समोर रियांकाला उचलून नेले. या घटनेने संपूर्ण कुटुंब हादरून गेले.
कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरड आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण काहीही हाती लागले नाही. गावातील लोकांना ही बातमी समजताच गावातील लोकांनी शोधमोहीम हाती घेतली, पण रियांका सापडली नाही. पोलिस आणि वनविभागाचे अधिकारी तातडीने दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.परंतु यश आले नाही.
दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना शेताजवळ चिमुकली मृतावस्थेत सापडली. या घटनेने गावात खळबळ उडाली. ही घटना ताजी असतानाच निंबळक इसळक गावच्या शिवारात कोतकर वस्तीवरील शेतामधे आठ वर्षाच्या राजवीर रामकिसन कोतकर या लहान मुलावर वडिलांसमोरच बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने तात्काळ अहिल्यानगर येथील खासगी हॉस्पीटलला उपचारासाठी नेल्याने मुलाचा जीव वाचला असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर नगर कल्याण महामार्गावर दुचाकीस्वारावर देखील बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
एकामागोमाग एक ग्रामीण भागात बिबट्याच्या हल्ल्याच्या तसेच बिबट्याचा वावर असल्याच्या घटना घडत असल्याने
बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभाग व प्रशासनाने बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामीण भागातील नागरीकांमधून होत आहे.
आपल्या फेसबुक पेजला follow करा...
youtube न्यूज चॅनलला जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा ...
#बिबट्या