13/06/2024
जुन्या मीटरची जागा महावितरणचं नवं प्रीपेड स्मार्ट मीटर घेणार
अहमदनगरः महावितरणचे सध्याचे विद्यूत मीटर कालबाह्य होणार आहेत. जुन्या पारंपारिक मीटरची जागा प्रीपेड स्मार्ट मीटर घेणार आहे. राज्यभरात २ कोटी ४१ लाख ग्राहकांचे, तर अहमदनगर जिल्ह्यातील ६ लाख ३६ हजार १९२ ग्राहकांचे विद्युत मीटर बदलणार आहेत. येत्या तीन-चार महिन्यांत जिल्ह्यातील मीटर बदलण्याची मोहीम सुरू होईल.
जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्यासाठी ७९७.३८ कोटींच्या खर्चाची निविदा प्रक्रिया होऊन नागार्जुन कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांना ७ ऑगस्ट २०२३ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. कामाचा कालावधी २७ महिन्यांचा आहे.
शेतीचे वीजग्राहक वगळता घरगुती, व्यापारी, औद्योगिक वीजग्राहकांसह फीडर व रोहित्रांवर सुध्दा स्मार्ट मीटर बसविले जाणार आहेत. त्यादृष्टीने ठेकेदाराने फीडर व रोहित्रांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. स्मार्ट मीटर बसविल्यावर वीजग्राहकांना मोबाईल फोनप्रमाने विजेसाठी पैसे भरावे लागतील. किती वीज वापरली, किती रक्कम शिल्लक आहे. याची माहिती ग्राहकांना मोबाईलवर मिळेल, त्यामुळे आर्थिक नियोजनानुसार वीज वापर करायचा हे सुद्धा ग्राहकांना समजणार आहे. सध्याच्या पध्दतीत मीटर रिडिंग घेऊन मोठे बिल आल्यावर ग्राहकांचे गणित बिघडते.
स्मार्ट मीटरमुळे वीज वापरावर ग्राहकांना नियंत्रण ठेवणे सोपे होणार आहे. ग्राहकांना घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाईन स्मार्ट मीटरवर पैसे भरण्याची सुविधा आहे. पैसे संपत आल्यावर दोन दिवस अगोदर मोबाईलवर संदेश मिळणार आहे.
पैसे संपले तर सायंकाळी सहा ते सकाळी दहापर्यंत वीज पुरवठा चालू राहिल. त्यामुळे मध्यरात्री अचानक वीज बंद होण्याचा धोका नाही. संबंधित ग्राहकाने सकाळी दहापर्यंत पैसे भरून वीज पुरवठा चालू ठेवायचा आहे.
त्यातून पैसे संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होणार आहेत. स्मार्ट मीटरचे नियंत्रण महावितरणच्या नजीकच्या कक्ष कार्यालयात असणार आहे. त्यामुळे मीटरमध्ये छेडछाड करणे ग्राहकांना शक्य होणार आहे.
फिडर व रोहित्र यांच्यावरही स्मार्ट मीटर बसविले जाणार आहेत. त्यामुळे वीज गळतीचा प्रश्न निकाली निघणार आहे. आकडे टाकून वीजचोरी बंद होणार आहे. ग्राहकांना नवे प्रीपेड मीटर मोफत मिळणार आहे.
मीटरचा खर्च केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून व महावितरणतर्फे केला जाणार आहे.
जिल्ह्यात स्मार्ट मीटरची संख्या
६,३६,१९२ ग्राहकांना स्मार्ट मीटर
२७,०४४ वितरण रोहित्रांना
१,७९९ फिडरला
६,६५,०३५ एकूण स्मार्ट मीटर
त्यामुळे रिडिंग घेणे, बिल तयार करून ग्राहकांना पोहोचविणे, थकीत वीजबिल वसुली करणे अशी कामे कमी होणार आहेत. मनुष्यबळाचा वापर ग्राहकांना जलद व चांगली सुविधा देण्यासाठी होईल.