16/08/2025
खाऊचे पैसे माऊली चरणी अर्पण – विद्यार्थ्याची अनोखी भक्ति
आळंदी:
श्री क्षेत्र आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात नुकत्याच झालेल्या सुवर्ण कलशारोहण सोहळ्यात एक हृदयस्पर्शी घटना घडली. लहान विद्यार्थी श्रीमंत दादासाहेब करांडे यांनी आपल्या खाऊसाठी साठवून ठेवलेले पैसे थेट माऊलीच्या चरणी अर्पण करून भक्तीचे सुंदर उदाहरण सर्वांसमोर ठेवले.
मुलांमध्ये खाऊ, खेळणी, वस्तू खरेदी करण्याची उत्सुकता असते; मात्र खाऊवरील खर्च टाळून, त्यातून वाचवलेली रक्कम ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी अर्पण केली. ही कृती पाहून मंदिर परिसरात उपस्थित भाविकांचे डोळे पाणावले.
कलशारोहणाच्या पवित्र क्षणी लहान मुलाने दाखविलेली ही श्रद्धा केवळ भक्तीचा आदर्शच नाही, तर नवीन पिढीमध्ये संस्कारांची जोपासना किती सुंदरपणे होत आहे याचा दाखला आहे. उपस्थित मान्यवरांनी आणि भाविकांनी या कृतीचे मनःपूर्वक कौतुक केले.
अनेकांना आश्चर्य वाटले की एवढ्या लहान वयात मुलाने देवासाठी खाऊचे पैसे साठवले, हे खरे भक्तीभावाचे द्योतक आहे. भविष्यात अशा श्रद्धावान पिढीमुळे वारकरी संप्रदाय व समाजात भक्तीचा दीप अधिक प्रखरतेने तेजाळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.