20/03/2024
मी रिपब्लिकन..... ONLY R.P.I.
विपरीत परिस्थितीत सामाजिक समतेचा आग्रह करणारे आंदोलन म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. यांच्या आंदोलनाचा कालखंड 1907 ते 1956 निश्चित करावा लागेल. 1907 साली मॅट्रिक उत्तीर्ण झाले म्हणून सत्कार समारंभ संपन्न झाला. या सत्कार समारंभात कृष्णाजी अर्जुन केळूसकर गुरुजींनी बाबासाहेबांना स्वलिखित "बुद्ध चरित्र" भेट दिले. बुद्ध चरित्र भेट देण्यायोग्य व्यक्तिमत्वाचे वेगळेपण, प्रगल्भतेची झलक व 1907 चे बुद्ध चरित्र ते 1956 चा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ याचे भारतात संसदीय लोकशाही पुनर्जीवन या बाबत व्यापक विश्लेषण झाले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर तथागत गौतम बुद्धांच्या लोकशाही विचारांचा प्रभाव, यातून पवित्र जनकल्याणकारी ध्येय निश्चिती, या ध्येयपूर्ती संघर्षावर दृष्टिक्षेप टाकला पाहिजे. यासाठी उच्चविद्याविभूषित होऊन स्वातंत्र्यपूर्व, स्वतंत्र व प्रजासत्ताक भारतातील त्यांचे योगदान हे राष्ट्रभक्तीचे आहे हे मान्यच करावे लागेल.
याच राष्ट्रभक्तीने भारतात जन्मलेली, भारतातून विश्वभर प्रचारित- प्रसारित झालेली. परंतु भारतात लुप्त पावलेली तथागत गौतम बुद्धांची संसदीय लोकशाही पुनरुत्जीवित करण्यासाठी ब्रिटिश भारतात मजूर- ऊर्जा- बांधकाम मंत्री म्हणून, मुंबई विधानसभा सदस्य व विरोधी पक्ष नेते म्हणून, ब्रिटिशांद्वारे भारतात आलेल्या सर्व कमिशन व गोलमेज परिषदांद्वारे भारतीयांच्या वतीने योगदान व संविधान सभेतील अमूल्य योगदानाद्वारे भारतीय संविधान निर्मिती ही विशाल ध्येयपूर्ती त्यांनी केली. यासाठी शंखलाबद्ध पद्धतीने पत्रकारितेच्या क्षेत्रात मूकनायक, बहिष्कृत भारत प्रकाशन संस्था, बहिष्कृत भारत, समता, जनता, पीपल्स हेरॉल्ड व प्रबुद्ध भारत या मुखपत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. तर शैक्षणिक- सामाजिक- सांस्कृतिक- राजकीय- जनआंदोलनासाठी बहिष्कृत हितकारणी सभा, समता सैनिक दल, समता समाज संघ, स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन, पीपल्स एज्युकेशन सोसायटी,द बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राजकारण प्रवेश पूर्व प्रशिक्षण विद्यालय, इ. संस्था- संघटनाद्वारे योगदान दिले.
लोकशाहीची जननी, विश्व मार्गदर्शक भारत देशाचा अभिमान बाळगून मोहेंजोदडो- हडप्पा संस्कृती, महाजनपद, शाक्य संघ, बौद्ध भिक्खू संघ हे मानबिंदू निश्चित करून भारतीय संसद उभारणीचे स्वप्न उराशी बाळगून साकारही केले. संसदीय लोकशाही बाबत अभिमान व निष्ठा नसलेला वर्ग संसदीय लोकशाही विसंगत, संदर्भहीन बाबींमध्ये मशगुल आहे. अशा सन्माननीय रिपब्लिकन भारतीयांमध्ये पर्शियन आक्रमण, अलेक्झांडर आक्रमण, सम्राट अशोक कालखंड, भारतात इस्लाम, अरब आक्रमण, तुर्की आक्रमण, मोघल आक्रमण, बाहमणी राज्य, मराठा स्वराज्य, ब्रिटिश- पोर्तुगीज- डच- डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून साम्राज्यवाद, फ्रेंच राज्यक्रांती, साम्राज्यवादातून स्वातंत्र्य मिळालेल्या देशांना लोकशाही आकर्षण, स्वतंत्र भारत, भारतातील संस्थाने खालसा करून प्रजासत्ताक भारत, बौद्ध भिक्खू संघातून संसदीय लोकशाही संविधान, भारतीय संसद प्रस्थापना या संदर्भात प्रबोधनाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर संसदीय लोकशाही इतिहासात पुष्यमित्र शृंगाद्वारे बृहदत्ताचा खून करून, बौद्ध भिक्खूंच्या कत्तली करून प्रगल्भ- मार्गदर्शक वर्ग नष्ट केला होता. त्या वर्गाची पुनर्निर्मिती करण्यासाठी मुके ते प्रबुद्ध असा विकसित नीतिमान लोकशाही समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला. हा समाज त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी रिपब्लिकन भारतास अर्पण केला, हा प्रजासत्ताक भारताचा आदर्श समाज आहे. या समाजाला खलनायक ठरवून निवडणुका साजऱ्या केल्या जातात.
काँग्रेस- 1985, मुस्लिम लीग- 1906, हिंदू महासभा- 1915, RSS- 1925, कम्युनिस्ट- 1925, MIM- 1927, जनसंघ- 1952 यांच्या समकालीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंदोलन होते. राजकीय-सामाजिक समता व संसदीय लोकशाहीशी कटिबद्ध बाबासाहेबांचे आंदोलन असल्यामुळे ते इतरांपेक्षा सरस राष्ट्रभक्तीचे होते व प्रमुख विरोधी होते. या समकालीनामध्ये आघाडीवर असलेल्या काँग्रेसला स्वातंत्र्य पूर्व भारतात, स्वतंत्र भारतात व संविधानिक भारतात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्युल कास्ट फेडरेशन व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर RPI चा धाक होता. कारण आजचा विरोधी पक्ष उद्याचा सत्ताधारी होऊ शकतो याची भीती होती.
3 ऑक्टोबर 1957 रोजी नागपूर येथे शेड्युल कास्ट फेडरेशनचे जनप्रतिनिधी, नेते, कार्यकर्ते व विराट जनसागराच्या साक्षीने RPI स्थापन झाली. RPI स्थापने बरोबरच तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसने RPI, नेतृत्व व जनाधार क्रश करण्यासाठी मोहीम हाती घेतली. RPI नेतृत्वावर वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करून त्यांच्यात बेबनाव निर्माण केला. संविधानिक राष्ट्र नेतृत्वाच्या या आंदोलनाची व्याप्ती RPI जनाधार अर्थात नीतीमान लोकशाही समाजास माहीत असल्यामुळे काँग्रेसचे षडयंत्र व RPI नेतृत्वाची कोंडी यामुळे समाजात असंतोष निर्माण झाला. असंतोषाची संधी साधून काँग्रेसने जनाधारावर अमानुष अन्याय- अत्याचार सुरू केले. इतकेच नाही तर या आदर्श समाजाने राष्ट्रीय आचारसंहिता भारतीय संविधान पूरक सामाजिक आचारसंहिता बुद्धांचा धम्म स्वीकारल्यामुळे हे हिंदू धर्माचे विरोधक आहेत असा संविधान निरक्षरात अपप्रचार केला. आज सत्ताधारी भाजपाद्वारे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाले. परंतु विभाजित घटकांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सत्ता सहभाग दिला. परंतु तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसने RPI वर क्रूर हल्ला केला. संसदीय लोकशाही संविधानिक भारतात संसदे इतकेच संसदेत RPI चे महत्त्व असताना RPI क्रश करणारी काँग्रेस आज संविधान धोक्यात आले आहे असे म्हणून संविधान विरोधी कृती कार्यक्रमाद्वारे फोफावलेल्या व कालांतराने विभाजित झालेल्या संविधान द्रोही पार्ट्यांना सोबत घेऊन गळा काढत आहे.
1970 च्या दशकात RPI नेतृत्वाबाबत निर्माण झालेली चीड व तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पुरस्कृत अन्याय अत्याचाराच्या मुकाबल्यासाठी 29 मे 1972 रोजी मा. राजाभाऊ ढाले, मा. नामदेवजी ढसाळ, मा. ज.वी. पवार, मा. अविनाशजी महातेकर, इ. मान्यवरांच्या पुढाकाराने दलित पॅंथरची स्थापना झाली. दलित पॅंथरचा झंझावात, दिग्गजांचे योगदान, साहित्यिकांचे योगदान, वैचारिक घुसळण, जन आंदोलने, आक्रमक नेते- कार्यकर्ते निर्मिती स्मरणात राहिलीच पाहिजेत. परंतु सत्ताधारी मीडियाद्वारे बेकीला खतपाणी घालून व दलित पॅंथर केवळ अन्याय अत्याचाराच्या मुकाबल्यासाठी की संविधानिक भारतात RPI पुनर्बांधणीसाठी या दूर दृष्टीकोण अभावातून मा. राजाभाऊ ढालेंनी दलित पॅंथर बरखास्त केली. या बरखास्ती मुळे 10 एप्रिल 1977 रोजी भारतीय दलित पॅंथरची स्थापना करण्यात आली. भारतीय दलित पॅंथरचे नेतृत्व डॉ. रामदासजी आठवले यांच्याकडे आल्यानंतर दलित पॅंथर व भारतीय दलित पॅंथरच्या दिग्गजांना जे जमले नाही असे "RPI पुनर्बांधणीसाठी भारतीय दलित पॅंथरचे RPI मध्ये विलनीकरण" हे संविधानिक कार्य डॉ. रामदासजी आठवले यांनी केले हे अधोरेखित केले पाहिजे.
1970 च्या दशकात दलित पॅंथर, भारतीय दलित पॅंथर सोबतच 18 मार्च 1956 (आग्रा उ. प्र.) शेड्युल कास्ट फेडरेशन ची विराट "रिपब्लिकन राजकारण निर्धार सभा" संपन्न झाली. परंतु मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया या खोट्या संदेशाद्वारे व असंविधानिक जातीग्रस्त बहुजन संकल्पनेच्या आधारावर 6 डिसेंबर 1978 रोजी- बामसेफ, 6 डिसेंबर 1981 रोजी- DS4 व 14 एप्रिल 1984 रोजी- BSP ची काशीराम व कर्मचारी या RPI द्वेष्टांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आली. रिपब्लिकन राजकारण निर्धार सभेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल कास्ट फेडरेशन कार्यकर्त्यांना जातीय राजकारण त्यागुण रिपब्लिकन राजकारणाचा स्पष्ट संदेश दिला व RPI स्थापनेचा निर्णय घेतला. यानुसार BSP म्हणजे बाबासाहेबांनी त्यागलेले अनुसूचीबद्ध जातीय राजकारण त्याचे नेतृत्व काशीराम व त्यांची बहीण मायावती करीत आहेत. यांचा बंदोबस्त डॉ. रामदासजी आठवलेंनी 2014 मध्येच केला. परंतु आज महाराष्ट्रात काशीरामवाद्यांच्या नाकात वारे शिरले आहे. तर RPI म्हणजे बाबासाहेबांना अपेक्षित संविधानिक राजकारण ज्याचे नेतृत्व मा. एन. शिवराज, मा. दादासाहेब गायकवाड, मा. रा.सू. गवई व आज डॉ. रामदासजी आठवले करत आहेत. जात- धर्म त्यागून, 22 प्रतिज्ञांनी कटिबद्ध, धम्म दीक्षित नीतिमान लोकशाही समाज या जातीय राजकारण व्याधीने ग्रस्तलेल्या जातीग्रस्त बहुजनवाद्यांना महार म्हणजे जातच वाटते कारण हे जातीत सडत आहेत. म्हणून हे तू बुद्ध आहेस की महार, RPI एका जातीचा पक्ष अशी विकृती ओकत असतात. या बांधवांच्या प्रबोधनपूरक कृती कार्यक्रम आखण्याची जिम्मेदारी RPI कार्यकर्त्यांची आहे.
RPI विरोधी कटकारस्थानांचा हिशोब चुकता झाला पाहिजे यासाठी डॉ. रामदासजी आठवले सतर्क आहेत व संघर्षरत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने निर्माण झालेली संविधानिक ताकद ही रिपब्लिकन भारतात प्रमुख विरोधक नव्हे प्रमुख पर्याय आहे. राजकारणात RPI ची भूमिका निर्णायक असली पाहिजे, सत्तेत मोठा सहभाग, सत्तेचा मोठा वाटा, सत्तांतरामध्ये RPI चे स्थान, संसद, विधानसभा व तत्सम सभागृहात RPI चे पर्याप्त जनप्रतिनिधित्व यावर ते सातत्याने गांभीर असतात. भारतीय दलित पॅंथर-RPI विलनीकरणातून RPI ला बळ देऊन 04 खासदार निवडून येणे, RPI ला प्रादेशिक पक्षाची मान्यता मिळवणे इ. बाबत डॉ. रामदासजी आठवले यांनी मुत्सद्दीपणे योगदान दिले. आजही ते रिपब्लिकन ऐक्याच्या बाजूनेच आहेत. गरज पडली तर मंत्रिपद सोडण्यासाठी ते तयार आहेत. परंतु त्यांच्या RPI प्रेमाला डिवचणारे RPI द्वेष्टे यात खोळंबा करत असतात. परंतु RPI कार्यकर्त्यांना त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे की RPI प्रबळ होणार .
डॉ. रामदासजी आठवले हे RPI चे सक्षम नेतृत्व, विपरीत परिस्थितीत युत्या-आघाड्यांचा अनुभव असलेले नेतृत्व, शिर्डी लोकसभा मतदार संघातील पराभवानंतर सत्ताधाऱ्यांनी दिल्लीतील सामान बाहेर काढल्यानंतर नव्या जोमाने उभारी घेणारे नेतृत्व, काँग्रेस- राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष तर बीजेपी- शिवसेना जातीवादी या धारणेवर घाव घालून महाराष्ट्रात महायुती व देशपातळीवर NDA ला बळ देणारे नेतृत्व, 2014 ला केंद्र राज्यसत्ता परिवर्तनक्षम RPI राजकीय पटलावर प्रस्थापित करणारे नेतृत्व, इंदू मिल- डॉ बाबासाहेबांचे आंतराष्ट्रीय स्मारक प्रकरण निकाली काढणारे नेतृत्व, 1957 ची आठवण म्हणून काँग्रेसला सत्ता भ्रष्ट करणारे नेतृत्व, बाबासाहेबांचे नाव घेऊन असंविधानिक जातीग्रस्त बहुजन हे प्रदूषण पसरवणाऱ्या BSP ला नेस्तनाभूत करणारे नेतृत्व, अशा या सक्षम नेतृत्वाला 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आत बदनाम करण्यासाठी RPI डॅमेज करण्यासाठी संविधान निरक्षर 250 संघटनाच्या सामर्थ्यावर भीमा कोरेगाव प्रकरणाचा दुरुपयोग केला तरी न डगमगणारे नेतृत्व आहे. या नेतृत्वाच्या पाठीशी भीमसैनिक खंबीरपणे उभे आहेत. डॉ. रामदासजी आठवले यांची कोंडी कोणीच करू शकत नाहीत. ते नव्या उमेदीने आव्हानावर मात करतात यावर आमचा विश्वास आहे.
संसदीय लोकशाही ही सर्वोत्तम जनकल्याणकारी प्रणाली आहे यावर निष्ठा असलेल्यांचा पक्ष म्हणजे RPI. यानुसार पक्षाचे कृती कार्यक्रम निश्चित झाले पाहिजेत. कार्यकर्ते प्रशिक्षित झाले पाहिजेत. युती-आघाड्यांचे पर्व संपवून या पवित्र संसदीय लोकशाहीत एन्जॉय करणाऱ्या संविधान निरक्षर पार्ट्यांना एकमेव पर्याय RPI आहे या दिशेने आम्हाला मार्गक्रमन करावे लागेल. RPI जोडण्यासाठी आहे- तोडण्यासाठी नव्हे, त्याचबरोबर नेतृत्वासाठी आहे हे पक्षातील विसावलेल्या बांधवांना सांगावे लागेल. आज देशात संविधान समर्थनार्थ वातावरण आहे. सत्ताधारी व विरोधक संविधानाचा जप करत आहेत. या परिस्थितीत संविधानीक संस्कार देण्याची जबाबदारी RPI ची आहे. देशपातळीवर किमान 50 खासदार व 50 खासदारावर प्रधानमंत्री पद भूषवण्याची RPI मध्ये धमक आहे. परंतु डॉ. रामदासजी आठवलेंना साथ देऊन हे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने विचार करण्याची गरज आहे. दर 05 वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला हे समजणार नसेल तर अमूल्य वेळ वाया घालवण्याचाच हा प्रकार ठरेल.
आज महाराष्ट्रात RPI ला प्रादेशिक पक्षाची मान्यता मिळवण्यासाठी दोन खासदार निवडून येणे आवश्यक आहे. हा टप्पा पूर्ण करण्यासाठी आपले नेतृत्व संघर्ष करत आहे. या खडतर मार्गातील आव्हानांचे त्यांना भान आहे. RPI कार्यकर्त्यांनी तथागत गौतम बुद्ध, विश्ववंदनीय बौद्ध भिक्खू संघ, सम्राट अशोक व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक विचाराशी कटिबद्ध राहून या प्रखर रिपब्लिकन राष्ट्रवादी आंदोलनास राष्ट्रव्यापी- विश्वव्यापी बनवण्यासाठी आपले सर्वोत्तम योगदान द्यावे. संविधान निरक्षर बंधव आपणास युत्या आघाड्यात गुंतवू इच्छितात, बाबासाहेबांचे नाव घेऊन RPI चे लचके तोडू इच्छितात. यावर विचार करून सामर्थ्यशाली RPI निर्मितीसाठी कार्य करू. धन्यवाद.
मी रिपब्लिकन... ONLY RPI.
सप्रेम शुभेच्छा.
“संविधानिक भारत”
गर्वसे कहो - मै रिपब्लिकन.
सप्रेम जय भीम,
जय रिपब्लिकन भारत,
जय रिपब्लिकन राष्ट्रवाद.
महेंद्र निकाळजे, नेता- RPI.