10/10/2025
वडील अचानकपणे दगावले, तेव्हा ओमचा दहावीचा शेवटचा पेपर होता. घरात सगळीकडे आक्रोश सुरू होता. काय चाललंय, हेही त्याला कळत नव्हतं. तरी, शेजारच्या एका गुरुजींनी सांगितलं आणि त्यानं पूर्ण परीक्षा दिली. तो पासही झाला, पण त्यानंतर काय करायचं?
मुळात, वडलांचं हातावरचं पोट. सायकलवर फिरून, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वडील सोडा विकायचे. असंच त्या-त्या हंगामातलं काहीतरी विकत राहायचे. त्यातून संसार चालायचा. घरी खाणारी तोंडं बरीच. वडील कष्ट करून खाणारे. प्रामाणिक. स्वभावही मनमिळावू. एकदा तयार झालेले गिऱ्हाईक तुटायचे नाही. अचानकपणे वडील गेले.
दहावीची परीक्षा दिल्यानंतर ओमची खरी परीक्षा सुरू झाली. आता पुढे काय? वडिलांची कमाई कमी होती, पण किमान रोज ताटामध्ये भाकरी येईल, एवढी तरी व्यवस्था होत होती. आता काय करायचं? आई चार घरी काम करत होतीच, पण ती एकटी काय काय करणार?
ओमनं आता शिकू नये आणि कुठेतरी नोकरी करावी, असं अनेकांनी सांगितलं. बांधकामाच्या साइटवर एका मिस्त्रीच्या हाताखाली तुला काम लावून देतो, असंही एका नातेवाईकांनी सांगून बघितलं. मात्र, ओमला शिकायचं होतं. वाटेल ते झालं तरी, शिक्षण पूर्ण करायचं होतं.
दरवर्षी चौदा एप्रिलला त्याचे वडील घर सणासारखे सजवायचे. पोराला घेऊन रेल्वे स्टेशनवर जायचे. तिथे पुतळ्याला हार चढवायचे आणि त्या पुतळ्याकडे बोट दाखवून पोराला सांगायचे, “बाकी काही करू नकोस, पण एक काम कर. या बाबासाहेबांसारखं तुला शिकायचं आहे. शिकलास तर पुढे गेलास. नाहीतर, असाच फूटपाथवर मरून जाशील.” काही झालं तरी शिकायचं हे ओमनं पक्क केलं.
त्याला एक मार्ग सुचला. त्याचे वडील जिथे गाडी लावायचे, त्याच्याच अवतीभवती काही चांगले कॉफी शॉप आहेत. जवळच आयएलएस लॉ कॉलेज आहे. एफटीआयआय आहे. लॉ कॉलेज रस्ता हा पुण्यातला रसरशीत आणि प्रेक्षणीय रस्ता! इथली तरूण मुलं पौष्टिक डाएटबद्दल आग्रही असतात. मात्र, तसं खायला काही मिळत नाही. चवही आहे आणि पौष्टिकही आहे, असं काहीतरी आपण दिलं तर ते चालेल, असं त्याला वाटलं. आधी तो मक्याचं भाजलेलं कणीस विकायचा. त्याच्या जोडीला उकडलेले कॉर्न, शेंगदाणे, हरभरे, फ्राय केलेला लसूण असे काही पौष्टिक पण चटपटीत पदार्थ विकायला ओमने सुरुवात केली.
सुरुवातीला लोकांचं फार लक्ष गेलं नाही. पण एक वेगळीच गंमत झाली. तिथेच बाजूला वाईन शॉप आहे. इतरांना कळालं नसेल, पण वाईन शॉपच्या ग्राहकांना मात्र या पौष्टिक चखन्याचं महत्त्व लक्षात आलं! पिताना काहीतरी भयंकर खाऊन ॲसिडिटी वाढवण्यापेक्षा हे असलं खाल्लेलं कधीही चांगलं. थोडं महाग आहे, पण तेलकट वेफर्स आणि फरसाणा, शेवपेक्षा हे कधीही छान.
हळूहळू ओमकडे गर्दी वाढू लागली. सुरुवातीला त्याला उरलेलं साहित्य परत घेऊन जावं लागायचं. आता मात्र तासभर अगोदरच त्याच्याकडचे साहित्य संपलेले असते. वीकेंडला तर विचारूच नका!
सायकलवरची ही गाडी ओम लावतो सायंकाळी. त्यापूर्वी कॉलेजला जातो. चांगला अभ्यास करतो. नोट्स वगैरे काढतो आणि मग इकडे कामावर येतो. आता यंदा त्याची बारावी होईल. कॉलेजसाठी त्याला पैसे मिळतात. पुस्तकांसाठी कोणापुढे हात पसरावे लागत नाहीत. शिवाय घरीही तो पैसे देऊ शकतो. मुख्य म्हणजे, त्याच्या धाकट्या बहिणीला तो शाळा शिकवू शकतो. तिचे लाड पुरवू शकतो.
माझ्या कार्यालयाशेजारीच ओमचे हे ‘स्टार्टअप’ आहे. त्यानं मला परवा विचारलं, “साहेब, तुम्हाला आत्तापर्यंत आवडलेली सगळ्यात भारी बातमी कुठली?” मी त्याला म्हटलं, “मला आवडलेली बातमी मी अजून दिलेली नाही. पण मला एक बातमी द्यायची आहे, ओम!”
तो म्हटला, “कुठली बातमी?”
मी म्हटलं, “आमचा ओम सुपेकर जेव्हा खूप मोठा होईल, तेव्हा त्याची मुलाखत माझ्या अंकात छापून येईल. ती असेल सगळ्यात बेस्ट बातमी!”
ओम हसला, तेव्हा त्याच्या डोळ्यात चमक होती!
- संजय आवटे