15/10/2025
आ.संजय खोडके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले संघटन महासचिव नियुक्त
ना.अजितदादा पवार यांचे संघटनात्मक पुनर्रचनेच्या दिशेने निर्णायक पाऊल
पक्षात जनरल सेक्रेटरी ऑर्गनायजेशन हे पद निर्माण करून आ. संजय खोडके यांना नियुक्ती
नव्या घडामोडी आणि संघटन बळकटीकरणाच्या प्रयत्नांचा हा महत्त्वाचा टप्पा
‘राष्ट्रवादी कनेक्ट’ मोबाईल अँप लॉन्च, संवाद आणि समन्वय अधिक सुलभ होणार
मुंबई anchor : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज संघटनात्मक पुनर्रचनेच्या दिशेने आणखी एक निर्णायक पाऊल उचलत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषद सदस्य संजय खोडके यांची ‘संघटन महासचिव’ म्हणून नियुक्ती केली. पक्षात नव्याने जनरल सेक्रेटरी ऑर्गनायजेशन हे पद निर्माण करून आ. संजय खोडके यांना पहिल्यांचा नियुक्ती करण्यात आल्याने राष्ट्रवादीत सुरू असलेल्या नव्या घडामोडी आणि संघटन बळकटीकरणाच्या प्रयत्नांचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘राष्ट्रवादी चिंतन शिबिर’ आणि ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ सारख्या उपक्रमांद्वारे पक्षातील संवाद आणि तळागाळातील संपर्क वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात आता ‘संघटन महासचिव’ या नव्या पदनिर्मितीमुळे संघटनेतील अडथळे कमी करून संवाद अधिक परिणामकारक करण्यास मदत होणार आहे. संजय खोडके यांची या पदावर नियुक्ती झाल्याने कार्यकर्त्यांना त्यांच्या अडचणी आणि सूचना थेट पक्ष संघटनेपर्यंत पोहोचविण्याचे एक निश्चित माध्यम मिळणार आहे.
एनएससीआय, वरळी येथे आज झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक तयारीचा रोडमॅप ठरविण्यावर चर्चा झाली. ‘राष्ट्रवादी कनेक्ट’ या नव्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून एकसंध संवादयंत्रणा आणि कार्यकर्त्यांमधील समन्वय अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा पातळीवर नियमित ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा आराखडा देखील आज झालेल्या बैठकीत मांडण्यात आला. तसेच प्रत्येक बूथ स्तरावर संघटन मजबूत करणे, आमदार व जिल्हाध्यक्ष यांच्यातील संवाद सुलभ करणे आणि सर्व स्तरावर निवडणूक नियोजन समन्वयपूर्वक राबविण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
बैठकीदरम्यान शिस्त, संघभावना आणि जबाबदारी ही प्रत्येक कार्यकर्त्याची मूलभूत मूल्ये राहतील, हा पक्ष नेतृत्वाचा संदेश पुन्हा एकदा ठळकपणे देण्यात आला. या सत्रात राज्य व जिल्हास्तरीय यंत्रणेतील समन्वय वाढविणे, संघटनात्मक उपक्रमांचे मूल्यमापन करणे आणि पुढील काही महिन्यांसाठी संवाद व जनसंपर्काचे स्पष्ट उद्दिष्ट निश्चित करणे यावर सविस्तर विचारमंथन झाले.