31/07/2024
उजाड मातीचे मनोगत...
:
आम्ही तुला मागणार नाही तुझ्या अकाउंटमधला हिशेब
आम्ही तुला मागणार नाही तुझ्या बंगल्याच्या ले-आऊटचा नकाशा
आम्ही तुला सांगणार नाही आमच्या आरक्षणाच्या अडचणी
आम्ही तुला सांगणार नाही आमच्यावरील अत्याचाराची गाऱ्हाणी पण
बापु रे! आम्ही फक्त एकच मागतो मनापासून तुला
काल गावच्या जत्रेत गोंधळ झाला
आणि बहूजनाच्या गदारोळात
बाबासाहेबांचा फोटो हरवला रे
येतांना तेवढा फोटो सोबत घेऊन ये..!
जसा असशील तसा ये!
-केतन पिंपळापुरे
परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्ने उराशी घेऊन असंख्य तरूण आंबेडकरी चळवळीच्या रणभूमिवर आपले सर्वस्व अर्पण करीत आहेत. आम्हीही समता सैनिक दल या मातृसंघटनेला भारतभर उभे करण्याकरीता अहोरात्र परिश्रम करीत आहोत. त्याच जथ्यातील अग्रणी योद्धा स्मृतिशेष मार्शल केतन पिंपळापुरे!
साहित्याची निर्मिती ही चळवळीला गतिमान करण्याकरीता, दिशा देण्याकरीता आणि तत्वज्ञानाला जनामानसामध्ये रूजविण्याकरीताच व्हावी! साहित्य हा चळवळीचा आधार झाला तर क्रांतीची दिशाच स्पष्ट होऊ शकते. मॅक्झीम गॉर्कीचा सत्कार करतांना त्यांच्या 'आई' या कादंबरीने रशियन क्रांती मध्ये कार्य करताना ऊर्जा प्रदान केली होती. त्याबद्दल गॉर्की धन्यवादास पात्र आहेत, असे उदगार लेनीनने काढले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यातील क्रांतीची स्पष्टता न समजल्यामूळे आंबेडकरी साहित्याची निर्मिती करतांना चळवळ बाजूला पड़ते हे आजचे चित्र आहे. केतन असा जगत नव्हता. त्यांच्या साहित्याची निर्मिती आंबेडकरी चळवळीला क्रांतीच्या दिशेने अग्रेसर करीत होती हे केतनचे निराळेपन कुणालाही नाकारता येत नाही! म्हणून त्यांची काव्य निर्मिती हे एक वेगळेच रसायन आहे 'नोबल टूथ' पर्यंतचा त्यांचा प्रवास हा क्रांतीकरीता राबणाऱ्या कार्यकर्त्याच्या समर्पनाची गाथा आहे हे आपण समजून घेऊ का!
कुवैतमधील एका अॅबेसीवर मोहम्मद पैगंबरांचा फोटो लावल्यामूळे निदर्शने करणाऱ्या मुस्लीमांचे म्हणणे होते की, पैगंबरांच्या डोळ्यातील तेज इतके ज्वाजल्य होते की कुणीही त्यांच्याकडे नजर रोखून पाहू शकत नव्हते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यातील तेज आम्हाला समजले का!
या जगाची निर्मिती करण्याकरिता त्या तेजाला समजून घेणे गरजेचे आहे. केतन पिंपळापुरे यांच्या कविताही त्याच दिशेला बोट दाखविते. आंबेडकरी साहित्य, संस्कृती व कलासृष्टीला समृद्ध करण्यात मोलाचे योगदान देणारा आंबेडकरी चळवळीला त्याग व समर्पनाचे नवचैतन्य देणारा केतन पिंपळापुरेच्या कविता आहेत. स्मृतिशेष केतन पिंपळापुरे यांच्या या स्मृतिस विनम्र आदरांजली....
-समता सैनिक दल
मार्शल अॅड.विमलसुर्य चिमणकर सर