03/12/2021
खासगी शिकवणीत ‘तो’ करायचा
अश्लील स्पर्श, संदेशही पाठवायचा
--
-मैत्रिणीने धीर दिल्यानंतर पालकांनी घेतली दामिनीकडे धाव
-दामिनीने छावणी पोलिसांच्या मदतीने ठोकल्या बेड्या
-----
औरंगाबाद ः पडेगाव परिसरातील दहावीच्या १६ वर्षीय विद्यार्थिनीशी खासगी शिकवणी चालविणाऱ्या शिक्षकाने अश्लील चाळे करत तिला अश्लील संदेशही पाठविले. हा प्रकार बुधवारी (ता.१) समोर आला. याप्रकरणी दामिनी पथकाने छावणी पोलिसांच्या मदतीने संशयित शिक्षकाला अटक केली असून त्याच्याविरोधात छावणी पोलिसांत गुन्हा दाखल केला. अमोल रावसाहेब गवळी (रा. ३३, रा. पडेगाव) असे संशयित शिक्षकाचे नाव आहे.
मुलगी खासगी शिकवणीला जात होती. शिकवणीतील शिक्षक गवळी याने पीडित मुलीशी अश्लील चाळे केले, त्यानंतर मुलीने घाबरून कोणाला सांगितले नव्हते. दरम्यान शिक्षक विद्यार्थिनीच्या मोबाइलवरही अश्लील संदेश पाठवत असे. त्याचे हे कृत्य वाढतच असल्याने पीडित विद्यार्थिनीने तिच्या मैत्रिणीला सांगितले. मैत्रिणीने धीर दिला खरा पण ही बाब आईवडिलांना सांगण्याची हिम्मत पीडितेला होईना, म्हणून पीडितेने मैत्रिणीच्या माध्यमातून पीडितेच्या बहिणीला सांगितले. बहिणीने गांभीर्य ओळखून ही बाब आईवडिलांच्या कानावर घातली. आईवडिलांनी सर्व अश्लील संदेश जतन करून ठेवत दामिनी पथकाला संपर्क केला.
-----
असे घेतले ताब्यात
--
दामिनी पथकाच्या इन्चार्ज तथा उपनिरीक्षक सुवर्णा उमाप यांनी पथकातील आशा गायकवाड, निर्मला निंभोरे, लता जाधव, गिरिजा आंधळे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पीडित मुलीच्या आईवडिलांकडून अगोदर परिस्थिती समजून घेतली. तोवर संशयित शिक्षकाला पोलिस आल्याची कानोकानी खबर लागणार नाही याचीही काळजी घेण्यात आली होती. उपनिरीक्षक उमाप यांनी पीडितेच्या आईवडिलांशी चर्चा करून पीडितेशी संवाद साधला, तिला धीर देत बोलते केले. प्रकरण समजून घेऊन शहानिशा करण्यासाठी छावणी पोलिस ठाण्याच्या डायल ११२ ची मदत घेतली आणि उपनिरीक्षक उमाप यांनी सिव्हिल ड्रेसवर जाऊन संशयित गवळीची खात्री केली. तोच असल्याचे समोर येताच डायल ११२ च्या दोन कर्मचाऱ्यांसह दामिनीने गवळीला ताब्यात घेतले. दरम्यान सहायक निरीक्षक मनीषा हिवराळे यांनी पीडितेचा जबाब नोंदविला.
----
संबंधित शिक्षकाला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. आरोपी गवळी याला न्यायालयाने शनिवारपर्यंत (४ डिसेंम्बर) पोलिस कोठडी सुनावली असून तपास सुरू आहे.
- शरद इंगळे, पोलिस निरीक्षक, छावणी.
----
पीडित मुलीला धीर देऊन बोलते केल्यानंतर शहानिशा करून संशयित शिक्षकाला अटक केली. मुलींना अशाप्रकारे किंवा या ना त्या माध्यमातून कोणी त्रास देत असेल तर दामिनीशी किंवा नियंत्रण कक्षाशी अथवा जवळच्या पोलिस ठाण्याची बिनधास्त संपर्क करावा.
- सुवर्णा उमाप, उपनिरीक्षक तथा इन्चार्ज दामिनी पथक