
23/07/2024
एकटा ओबीसीच लढतो आहे-
दलित+आदिवासींचे आरक्षण व ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी
ओबीसी-मराठा संघर्षाचे सातवे पर्वः लेखांक-10
ओबीसीनामा-31. लेखकः-प्रा.श्रावण देवरे
जरांगेचं भोकांड (प्रकरण-3)
मराठा जातीच्या आरक्षणाची वांझोटी वाट कुठे कुठे अडली व कितीदा अडली हे आपण यापूर्वी अनेक लेखांमधून पाहिले आहे. अनेक संवैधानिक मार्गाने प्रयत्न करूनही जर एखाद्या जातीला आरक्षण मिळतच नसेल तर ती जात नंतरच्या काळात आरक्षणाचा विषय सोडून देते व आपल्या विकासाचे इतर मार्ग शोधून पुढच्या कामाला लागते. जाट, पटेल, गुज्जर अशा काही क्षत्रिय म्हणविणार्या जमीनदार-सत्ताधारी जातींनी आरक्षणासाठी देशभर धिंगाणा घातला. एक-एक महिना रेल्वे रोको, रस्ता रोको, मोर्चे, धरणे असे सर्व प्रयत्न करूनही त्यांना आरक्षण मिळत नाही, असे लक्षात आल्यावर जाट, पटेल, गुज्जर या जाती नंतरच्या काळात 10 टक्के EWS आरक्षणावर समाधान मानून गुण्या गोविंदाने व शांततेचे जीवन जगत आहेत.
परंतू देशातील मराठा ही अशी एकमेव जात आहे की जी आरक्षणासाठी पिसाळल्यासारखी सतत चेकाळात असते व वारंवार ओबीसींच्या ताटात तोंड घालून भाकरी पळविण्याचा प्रयत्न करीत असते. 10 राज्य मागास आयोगांनी व सुप्रिम कोर्टानेही अनेक वेळा ‘हाड् हाड्’ करूनही हे पिसाळलेपण थांबता थांबत नाही.
एका घरात एक लाडावलेलं बाळ असतं. शेजारच्या घरातील बाळाकडे एखादं नवं खेळणं बघीतल्यावर ते चेकाळतं आणी आपल्या घरी जाऊन ‘तेच खेळणे’ पाहिजे म्हणून हट्ट धरतं. लाडावलेल्या बाळाला दुसरे एखादे खेळणं देऊन शांत करण्याचा प्रयत्न घरातील जबाबदार पालक करीत असतो. परंतू शेजारच्या घरातीलच खेळणे पाहिजे असा हट्ट धरीत लाडावलेल्या कार्ट्याचा रडण्याचा आवाज वाढतच जातो. 'वाह्यात हट्टापायी जमीनीवर बसून जोरजोराने हातपाय आपटून मोठ-मोठ्याने रडणे-केकाटणे व आख्खा गाव गोळा करणे' याला खान्देशी भाषेत ‘भोकांड’ पसरविणे असे म्हणतात. ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, असं भोकांड पसरविणार्या जरांगेला केंद्र सरकारने 10 टक्के ‘EWS’ आरक्षण दिलं तरी त्याचं भोकांड थांबत नाही. राज्य सरकारने 10 टक्के वेगळं SEBC आरक्षण दिलं, तरी त्याच्या भोकांडाचा आवाज कमी होत नाही.
लहानपणी आम्हीही असंच भोकांड पसरवत होतो. ‘पाहिजे म्हणजे पाहिजेच’ असा हट्ट धरला होता व त्यासाठी आम्ही भोकांड पसरवलं होतं. आमच्या भोकांडाचा आवाज ऐकूण गल्लीतले पोरं येऊन टिंगल-टवाळी करीत असत. पण आमचं भोकांड सूरूच! सहनशक्तीच्या पलीकडे गेलं की आमचे वडिल जवळ यायचे व माझ्या कानाखाली जोरदार आवाज काढायचे. क्षणात भोकांड बंद होत असे. वडिल घरी नसतांना एकदा आईने दोन्ही हात बांधून खूंटीला टांगून ठेवलं होते. पालक जर जबाबदार असतील तर ते लाडावलेल्या कार्ट्याला एका क्षणात वठणीवर कसं आणतात, हे या उदाहरणावरून स्पष्ट होते.
पालकाच्या भुमीकेत असलेले राज्य सरकार जरांगेच्या भोकांडाला एका क्षणात बंद करू शकते. परंतू पालकच बेजबाबदार असतील व जातीसाठी माती खाणारे असतील तर ते जरांगेच्या भोकांडाला डी.जे.चा भोंगा लावून आख्या महाराष्ट्रात भेंडी बाजार भरवणार. जरांगेच्या भोकांडाने आख्खा महाराष्ट्र भेंडी बाजार बनवला गेला आहे. कारण त्याच्या पाठीशी सर्व पक्षीय सत्ताधारी मराठा जात आहे. जरांगेचं भोकांड ओबीसीच बंद करू शकतो, कारण ओबीसी वगळता इतर सर्व जाती जरांगेच्या दहशतीपुढे शरण गेलेल्या आहेत.
सत्ताधारी जातींविरोधात लढण्याची परंपरा फुले-आंबेडकर शिकवितात, पण फुले-आंबेडकरांचे आजचे वारसदार जरांगेच्या पायाशी लोळण घेत आहेत. सत्ताधारी शोषक वर्गांविरोधात 'वर्ग-युद्ध' लढण्याची शिकवण मार्क्स देतो, परंतू आजचे कम्युनिस्ट वारसदार जरांगेला पाठींबा देऊन पांढरे निशाण फडकावीत आहेत. सत्यशोधक कम्युनिस्टवाले म्हणतातः ‘मराठ्यांना आरक्षण दिल्यामुळे बौद्धक्रांती, फुलेआंबेडकरवादी-क्रांती, मार्क्सवादीक्रांती अशा सर्व जागतिक क्रांत्या एका रात्रीतून घडणार आहेत’. समाजवादी तर मुळातच भीत्री-भागूबाई! त्यांच्याबद्दल न बोललेच बरे!
महाराष्ट्रातील सर्व दिग्गज पुरोगामी नेते, फुलेआंबेडकरवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष मराठा दहशतीला घाबरुन बिळात लपून बसलेले आहेत. अशा हिंसक जीवघेण्या संघर्षात एकटा ओबीसी समाज सीना तानके सत्ताधारी शोषक मराठा जातीविरुद्ध लढतो आहे.
ओबीसी समाज केवळ ओबीसी आरक्षणासाठी लढत नाही, तर तो दलित+आदिवासींचं आरक्षण वाचविण्यासाठीही लढतो आहे आहे. सगे-सोयरे शब्दामुळे सर्वच दलित+आदिवासी+ओबीसींचं आरक्षण धोक्यात आहे. पण एक पळपुटा दलित नेता सरकारला सांगतो- ‘‘सगे-सोयरेमधून आमच्या जातीला वगळा व एकट्या ओबीसींना फासावर लटकवा’’, अशी विनंती करून स्वतःची मान वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न हा दलित नेता करीत आहे. याला आंबेडकरवादाशी गद्दारी म्हणतात. ओबीसी विनंती करीत नाहीत, गद्दारीही करीत नाहीत व केविलवाणेही होत नाहीत, ओबीसी केवळ आक्रमक आंदोलन करून दलित+आदिवासी+ओबीसींचं आरक्षण वाचविण्यासाठी लढतो आहे.
ब्रिटीश भारतात राजकीय आरक्षण मिळविण्यासाठी दुसऱ्या गोलमेज परिषदेत राष्ट्रीय मुस्लिम नेते बॅरिस्टर जीना व तत्कालीन अस्पृश्यांचे नेतृत्व करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची युती झाली होती. महात्मा गांधींनी बॅरिस्टर जीना यांना 'बाबासाहेबांशी युती करु नका, आम्ही तुम्हाला तुमच्या मागण्यांसाठी पाठिंबा देऊ', असे अमिष दाखविले. परंतू कोणत्याही अमिषाला बळी न पडता बॅरिस्टर जीना यांनी बाबासाहेबांशी केलेली दोस्ती सोडली नाही. बाबासाहेबांना साथ देणारे बॅरिस्टर जीना, बेघर झालेल्या तात्यासाहेब महात्मा फुलेंना घर देणारे उस्मान शेख व 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांशी युती करणारे MIM चे बॅरिस्टर ओवेशी! खरंच वैचारिक प्रमाणिकता व मित्रांशी एकनिष्ठता शिकावी ती फक्त मुसलमानांकडूनच! बाकी आपले सगळे नेते म्हणजे विश्वासघातकीच! स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शेजाऱ्याला कधी फांसी देऊन मोकळे होतील, याचा भरवसा नाही'!
सत्ताधारी शोषक मराठा जातीविरोधात लढण्याचे सर्व लोकशाहीवादी मार्ग ओबीसींनी वापरलेत, परंतू तरीही अ-लोकशाही मार्गाने सत्ता बळकावणार्या मराठा समाजाचे भोकांड थांबता थांबत नाही. हे भोकांड थांबवायचे असेल व महाराष्ट्रात कायमस्वरूपी शांतता निर्माण करायची असेल तर हे काम फक्त आणी फक्त ओबीसीच करू शकतो. परंतू त्यासाठी केवळ रस्त्यावरची आंदोलने करून चालणार नाही. सभा, महासभा, धरणे आंदोलने, रोड शो वगैरे करून भागणार नाही. केवळ धरणे आंदोलन केलं आणी जरांगेने 57 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे मिळवू दिलीत, हे सत्य नाही. जरांगेची जात सत्ताधारी आहे म्हणून ‘तो जे मागतो, ते त्याला लगेच मिळते.’
ओबीसींनाही आपले आरक्षण वाचवायचे असेल तर ओबीसींचा पक्ष स्थापन करून स्वतंत्र बाण्याचे आक्रमक व वैचारिक लेव्हल असलेले आमदार तुम्हाला निवडून आणावे लागतील. कॉंग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी कॉग्रेस, भाजपा व दोन्ही शिवसेना या प्रस्थापित पक्षातील ओबीसी आमदार-मंत्री तुमचे ओबीसी आरक्षण वाचवू शकत नाहीत. कारण हे प्रस्थापित पक्ष एकतर मराठा जातीच्या मालकीचे आहेत, किंवा ब्राह्मण जातीच्या मालकीचे आहेत. जे पक्ष फुलेआंबेडकरवादी असल्याचा दावा करतात, ते पक्षही भाजपची B-Team म्हणून काम करीत आहेत, हे त्यांनीच ‘सगे-सोयरे’ शब्दावर घेतलेल्या भुमिकेवरून त्यांनीच सिद्ध केलेले आहे. त्यामुळे भाजपाची बी टीम बनलेले फुले आंबेडकरवादी पक्ष ओबीसींना केव्हा दगा देतील याचा भरोसा नाही.
ओबीसी मतांसाठी काही पक्ष नवटंकी करीत आहेत. जरांगेला पाठींबा देणारे नेते अचानक ओबीसी उपोषणालाही भेट देतात. सगे सोयरे शब्द फक्त ओबीसींनाच लागू करा व ओबीसी आरक्षण नष्ट करा, असे सांगणारे नेते अचानक दुसर्या दिवशी ओबीसी यात्रा काढतात. अशा नवटंकीला ओबीसींनी भुलू नये! ओबीसींची दिशाभूल करण्यात काही ओबीसी विद्वानही प्रयत्न करीत आहेत. केवळ एखाद्या फुलेआंबेडकरवादी पक्षाचे तिकीट मिळावे, एवढ्या एका क्षुल्लक स्वार्थापोटी हे विद्वान आपल्याच ओबीसी चळवळीसोबत गद्दारी करतात. ओबीसींशी गद्दारी केल्यावरही त्यांना हे फुलेआंबेडकरवादी पक्ष तिकीट देतात का?
महाराष्ट्रात एका फुलेआंबेडकरवादी पक्षाने मतदारसंघनिहाय रेटबोर्ड तयार केलेला आहे. आमचा एक ओबीसी विद्वान गोंदिया-भंडारा मतदारसंघाचे तिकीट मागायला गेला, तेव्हा त्याला पक्षाचे रेटकार्ड दाखविण्यात आले. या रेटकार्डप्रमाणे गोंदिया-भंडारा मतदारसंघाच्या तिकीटाचा दर दोन कोटी रूपये होता. अशा पक्षांना तुम्ही फुलेआंबेडकरवादी पक्ष म्हणत असाल तर तुम्हाला खड्ड्यात घालण्यासाठी मराठा-ब्राह्मणांची गरजच नाही. एक नकली फुलेआंबेडकरवादी (B-Team) नेता तुम्हा ओबीसींना खड्ड्यात घालण्यासाठी पुरेसा आहे!
केवळ मराठा-ब्राह्मणांच्या मालकीचेच पक्ष तुमचे शत्रू नाहीत तर, स्वतःला फुलेआंबेडकरवादी म्हणविणारे नेते व त्यांच्या खाजगी मालकीचे पक्षही ओबीसींचे वाटोळे करायला निघालेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात- ‘दुसर्यांच्या महालापेक्षा आपली झोपडी केव्हाही चांगली!’ ओबीसींना स्वाभिमानी राजकारण करायचे असेल तर तामीळनाडूप्रमाणे आपला स्वतःचा ओबीसी पक्ष स्थापन करावा लागेल. दुसर्यांच्या पक्षात तुम्हाला काडीईतकीही किंमत नाही, हे बळीराम सिरसकर, मखराम पवार, उपरे काका, भदे, खडसे, भुजबळ, मुंडे आदी असंख्य ओबीसी नेत्यांच्या उदाहरणांवरून सिद्ध झालेले आहे.
स्वतंत्र ओबीसी पक्ष, स्वाभिमानी राजकारण व संवैधानिक मार्गाने सत्ताप्राप्ती हे तीन मूलमंत्र लक्षात घेऊन ओबीसींना काम करावे लागणार आहे. आजच्या घडीला ओबीसींसमोर दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्या पर्यायांची चर्चा आपण पुढील आठव्या पर्वात करू या! तो पर्यंत जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!!!
-प्रा. श्रावण देवरे, संस्थापक-अध्यक्ष,
ओबीसी राजकीय आघाडी,
संपर्कः 88301 27270
ईमेलः [email protected]
*महत्वाची सूचनाः 1) ओबीसी-मराठा संघर्षाचे हे सातवे पर्व, प्रकरण-3 लेखांक-10, दैनिक बहुजन सौरभच्या 23 जुलै 2024 च्या अंकात प्रकाशित झाला आहे.
*2) ओबीसी-मराठा संघर्षाचे हे सातवे पर्व, लेखांक-10, या लेखाची pdf file ची लिंक पुढीलप्रमाणे- https://drive.google.com/file/d/1ekVtpynL2_k11t25UudVw69wdWdH7GdK/view?usp=drive_link