10/08/2025
"आज त्यांना जाऊन दहा दिवस झाले.
त्यांनी देहदान केले....
त्यांनी क्रियाकर्म करायचे नाहीत असेही सांगितले.
त्यांनी स्वतःचा फोटो लावायचा नाही,शोकसभा घ्यायची नाही असेही लिहून ठेवले .......किती अवघड आहे हे .....
अशा
√√वं.प्रमिलताई मेढे यांच्या वरील सा.विवेक नव्या आवृत्तीत ( online व प्रिँटेड कॉपी) प्रकाशित माझा लेख -
ॐ
"तव स्मरण,संतत स्फुरणदायी आम्हा घडो...."
"पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे |शब्दा पाठी अवतरे, कृपा आधी "
ज्ञानेश्वर माऊलींच्या या वर्णनाचा साक्षात अनुभव अहिल्या मंदिरात जाणाऱ्या लहान मोठ्या प्रत्येकाने थोडी थोडकी नव्हे तर गेली ६० / ६५ वर्षे सतत घेतलाय !
स्नेह मूर्ति ,उत्साह मूर्ति,आनंद मूर्ति ,चैतन्य मूर्ति प्रमिलताई व त्यांच्या जोडीने चित्रा ताई जोशी हेच त्याचे मुख्य कारण ! पार बाळासाहेब देवरस, दत्तोपंत ठेंगडी ,सुदर्शन जी ,मोहनजी भागवत ,भैय्या जी,दत्ताजी, नितीन गडकरी,रवीशंकर प्रसाद ,देवेंद्र फडणवीस,विजया राजे सिंधीया ,साध्वी ऋतंभरा,सुमित्रा महाजन ,सुषमा स्वराज,निर्मला सीतारामन अशा कैक श्रेष्ठी जनां पासून चिल्या - पिल्या सेविकां पर्यंत अक्षरशः शेकडो जण या स्नेह वर्षावात भिजले आहेत ! कार्यालयात सदैव वर्दळ,भेदभावनेला थारा नाही! तेथे चालणाऱ्या छात्रा वासातील कन्यकां बरोबर खेळताना, त्यातल्या लहान मुलीचे पाय चेपताना मी स्वतः पाहिलय ,अनेकदा !
माझ्या सारख्या अधून- मधून जाणार्या व्यक्तीचे किती कोडकौतुक होत असेल याची कल्पना सहज करता येईल.माझे पती भा.म.संघाचे कार्यकर्ते . त्यांनी आयोजित केलेली एक बैठक अहिल्या मंदिरात ठरली होती. प्रमिला ताईंचे हे जावई ! अर्थात जावयासह सर्वांची बडदास्त त्यांनी जातीने सांभाळली .शिवाय कार्यकर्त्यांसाठी संस्मरणीय बौध्दिक ही दिले ! अशा घटना सर्वच कार्यकर्त्यांच्या मनात चिरंजीव राहतील यात शंका नाही.
प्रमिलताईं बरोबरची माझी शेवटची भेट सुद्धा अशीच आयुष्यभर आठवणीत राहणारी आहे.
नागपूरातील रेशिमबागेतच १८ ते २० जुलै अशी राष्ट्र सेविका समितीची बैठक चालू होती .बैठकीतून मी प्रमिलताई मेढे यांना भेटायला देवी अहिल्या मंदिरात गेले .माझे नव प्रकाशित " देवालय - एक शोध परिक्रमा " हे पुस्तक त्यांना द्यायला ! प्रमिलताईंना या गोष्टीचा खूप आनंद होईल याची मला खात्री होती .झालेही तसेच ! प्रकृती नाजूक तरी मन ,बुध्दी तरूण - तल्लख -तेजस्वी !
हात थरथरत होता ,श्वास घ्यायला अतोनात त्रास होत होता तरी पुस्तकातला विषय जाणून घेत होत्या ....डोळ्यात चमक ..आनंद चेहर्यावर विलसत होता ....मला म्हणाल्या " तू सर्वे भवन्तु सुखिन: साठीच हे काम केले आहेस ,असेच काम करत रहा ..." मायेने डोक्यावर हात फिरवला ...हातात हात घेऊन बोलत राहिल्या ....त्यांना दम लागत असल्याने मला तेथे थांबणे अशक्य झाले मी दूर गेले.
एवढ्या नाजूक स्थितीतही त्यांनी मला परत बोलावले हातावर बेसनाचा लाडू ठेवला . म्हणाल्या " हार्ट,हेड आणि हॅण्ड व्यवस्थितच पहिजे आता फक्त हेड ठिक आहे पण हार्ट कधी बंद पडेल सा़गता येत नाही...."
कितीही थांबावेसे वाटले तरी मला निघणे भागच होते .मी त्यांना तसे सांगितले.
आयुष्यात पहिल्यांदाच त्यांनी त्यांच्या हातात घेतलेला माझा हात झटकन सोडला ...माझे मन चरकले ,
त्या शांत ,समाधानी ,पूर्ण ......
मी ८/९ वीत असल्यापासून तयार झालेले आमचे नाते. जिव्हाळ्याने भरलेले , त्यांच्या उदंड आशीर्वादाने बहरलेले ....यात मायेची ममता होती , धाक होता ,चर्चा होती ,संवाद होता ,परस्पर प्रतीक्षा होती ,हसणे होते ,रूसणे होते .....
प्रेम तर असीम होते जे संपवण्याची ताकद कुणा मृत्यु मध्ये असेल असे वाटत नाही !!
तसे पाहिले तर प्रमिलाताई फार मोठ्या पदाधिकारी. राष्ट्रसेविका समितीच्या चतुर्थ प्रमुख संचालिका (कार्यकाल २००६ ते १२ ) त्याआधी २५ वर्षे समितीच्या प्रमुख कार्यवाहीका ,३ वर्षे सह प्रमुख संचालिका या दायित्वाने संघटनेचे विविध प्रकाराने नेतृत्व केले. हा झाला त्यांचा तांत्रिक परिचय. परंतु या सर्वांपेक्षा त्या देशभरातील शेकडो कार्यकर्त्यांच्या फार फार जवळच्या ,अत्यंत आदरणीय, प्रेमळ मावशी होत्या हा झाला त्यांचा खरा परिचय !!
नऊवारी साडी ,केसांचा अंबाडा बांधलेला ,ठसठशीत कुंकू, काळसर वर्ण, किडकिडीत शरीरयष्टी स्टेजवर बसलेल्या त्यांना पाहिले तर फार तर शुभाशीर्वाद देतील असे नवख्याला वाटू शकेल परंतु इंग्रजी, हिंदी ,मराठी अशा विविध भाषांमधून त्या बोलू लागल्या की चकीत होण्याची पाळी ऐकण्यार्यावर येत असे ! उत्तम वक्तृत्व, प्रकांड पांडित्य, संवाद साधण्याची विलक्षण हातोटी अशा गुणांमुळे विद्वत सभांमध्ये त्या आकर्षणाचे केंद्र बनत असत.
प्रमिला ताई मेढे राष्ट्र सेविका समितीच्या प्रथम फळीतीलच परंतु काहीशा उशिराने दाखल झालेल्या कार्यकर्त्या ! जन्म ८जून १९२९ नंदूरबारचा. फार लहानपणीच समितीशी संबंध आला. भावंडांच्या जबाबदारीमुळे नोकरी सुरू केली. त्याचवेळी समितीच्या ही संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडत राहिल्या . तळागाळातल्या सामाजिक परिस्थितीची जाण येत गेली. वर्तमानाचे भान यामुळेच सतत जोपासले गेले. घरच्या जबाबदाऱ्यांमधून थोडी मोकळीक मिळताच १९६५ पासून अहिल्या मंदिरात म्हणजेच समितीच्या मुख्यालयात राहायला आल्या. तेव्हापासून समितीचे कार्य हेच "एकमेव जीवन ध्येय" ठरवून स्वतःला घडवत राहिल्या, इतरांना प्रेरणा देत राहिल्या, झपाटल्यागत काम करत राहिल्या ते थेट ३१ जुलै सकाळी ९ वाजून ५ मिनीटे पर्यंत !
होय हे अगदी खरे आहे .२६ जुलै कारगिल विजय दिवस. त्यानिमित्त तयार केलेल्या पोस्टरवर आम्ही सैनिकांना "सलाम "असे लिहिले होते. त्यांनी ते दुरुस्त करून " नमन" लिहावे असे कळवले! भारत "विमर्श "सदैव जागा होता तो हा असा !!
आणीबाणी येईल तो समितीच्या कार्याचा विस्तार तसा मर्यादित होता .त्यानंतर काहीसा अनुकूल काळ तयार झाला. ७८ साली प्रमुख कार्यवाहीका पद स्वीकारल्या नंतर देशाच्या कानाकोपऱ्यात समितीचा कार्य विस्तार करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली . दीर्घ पल्ल्याचा प्रवास सुरू केला. स्टेशनवर दहा पंधरा मिनिटे जरी गाडी थांबणार असेल तरी तेवढ्यात तेथील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून सहज गप्पा करीत. कार्याला गती देण्याचा प्रयत्न सतत चालू ठेवत . त्याकाळी विमान प्रवास जवळजवळ नव्हताच. मुख्यत्वे रेल्वेतून प्रवास होई.आरक्षण झालेले असे असेही नव्हते. मग मिळेल त्या जागी कधी कागद पसरून, कधी पथारी अंथरून हा प्रवास होत असे .रेल्वे, बस,व्हॅन, टांगा ,रिक्षा,प्रसंगी पदयात्रा कशाचेही वावडे त्यांना कधीच नव्हते. आज समितीचे कार्य देशभरात सर्वत्र पोहोचले आहे त्याचे फार मोठे श्रेय प्रमिलताई यांच्या अखंड प्रवासाला जाते यात कसलाच संशय नाही .ऋतू कोणताही असो वर्ग,बैठका,अन्य कार्यक्रम त्यांनी उसंत घेतली नाही.
त्या प्रमुख संचालिका झाल्यानंतर रामायण प्रदर्शनी निमित्त त्यांनी केलेला प्रवास अक्षरशः थक्क करणारा आहे .त्यावेळी त्यांचे वय ७५ पूर्ण झालेले होते तरी साध्या मोटार गाडीने पार कन्याकुमारी पासून नेपाळ पर्यंत आणि जुनागड पासून इंफाळ पर्यंत उभा आडवा प्रवास करीत देश अक्षरशः पिंजून काढला .२६६ दिवसांचा सलग प्रवास ,२८ हजार किलोमीटरची यात्रा, १०७ स्थानी कार्यक्रम झाले. त्यात शैक्षणिक परिसंवाद, प्रबुद्ध महिला भेटी, सार्वजनिक भाषणे अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. एका सामाजिक कार्यकर्तीने केलेल्या अशा प्रवासाचे बहुदा हे एकमेव उदाहरण असावे.
समिती कार्याची वृद्धी हे जरी त्यांच्या समोरचे मुख्य लक्ष होते त्याचप्रमाणे संवेदनशील राज्यांशी सतत संपर्क ठेवून तेथील परिस्थिती समजून घेणे , कार्यकर्त्यांना धैर्य देणे, धोकादायक ठिकाणी स्वतः पोहोचणे अशी असाधारण कामे त्यांनी केली आहेत.विषय ३७० चा असो की रामजन्मभूमीचा त्या त्या वेळेस च्या निर्णायक भूमिकेत त्यात उतरल्या आहेत. महिलांना योग्य दिशा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
स्त्री जीवनातील विविध टप्पे, एकूणच असुरक्षित सामाजिक वातावरण यामुळे समितीच्या प्रारंभिक काळात प्रचारिका निघण्यासाठी फारशी अनुकूलता नव्हती .हळूहळू अविवाहित राहून आपलेच आयुष्य समाजासाठी देण्याचा निश्चय करून कार्यरत झालेल्या सेविका पुढे येऊ लागल्या. अशा सेविकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून विस्तारिका, प्रचारिका समाजकार्यासाठी घराबाहेर पडतील यासाठी प्रयत्न करणाऱ्यात प्रमिलाताई अग्रणी आहेत.
१९९३ च्या सुमारास संघ विचार विश्वातील विभिन्न संघटनांमध्ये कार्य करणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन काही कार्य उभे करावे अशी चर्चा सुरू झाली. त्यातूनच महिला चेतना परिषद यशस्वीरित्या पार पडली. याचाच पुढचा टप्पा म्हणून दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राची स्थापना झाली, महिला समन्वयाचा उपक्रम आकार घेऊ लागला. त्या सर्व वेळी गध्दे पंचविशी नुकतीच ओलांडलेली मी निर्णय प्रक्रियेतील एक घटक होते. समितीचे कार्य पुष्कळ जुने. काही जणी कार्यात अगदीच नव्या. काही वेळी संघटनात्मक निती- रिती वरुन अभिनिवेश उसळी मारत असे. अशावेळी प्रमिलताई माझ्यासारख्या संघटनेतील कार्यकर्त्यांना सर्वार्थाने सांभाळून घेत नव्याने कार्य करु पाहणार्यांशी संवाद करीत ज्या प्रकारे उत्तम संतुलन साधत असत ,त्यातून महिला समन्वयाची वाटचाल सुकर होण्यात फार मोठा हातभार लागला आहे असे मला प्रकर्षाने वाटते . महिला समन्वयात एकत्र कसे चालायचे आणि समितीचे कार्य स्वतंत्रपणे कसे राखायचे याचे प्रशिक्षण त्यांच्यामुळेच आम्हाला मिळाले. दृष्टी केन्द्र आणि महिला समन्वय यांना त्यांचे विपुल मार्गदर्शन लाभले आहे.सर्वच संघटनांमधील कार्यकर्त्यांना त्यांनी जवळ केले आहे.पूर्णकालिकांना पाठबळ दिले आहे.
कार्य विस्तार करण्यासाठी विदेशातही त्यांनी इंग्लंड, अमेरिका ,केनिया ,श्रीलंका अशा अनेक देशांचा प्रवास केला आहे .न्यू जर्सी तील महापौरांकडून प्रमिलताईंना मानद नागरिकत्व बहाल करण्यात आले होते. तेथील सेविकांच्या सतत संपर्कात राहून त्यांचे कार्य जाणून घेत असताना त्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम वार्धक्याच्या या टप्प्यावर सुद्धा त्या करत असत.
२०२० मध्ये एसएनडीटी विद्यापीठाने त्यांना डिलीट पदवी दिली. प्रमिताईंचा लोकसंग्रह व ग्रंथसंग्रह अफाट होता. आपल्या आयुष्यात त्यांनी कितीतरी पुस्तके वाचली आहेत. त्याच्यातील नोंदी स्वतः लिहून काढल्या आहेत. त्याचा उपयोग आपल्या बौद्धिकांमधून केला आहे. संस्कृत तज्ञ असणाऱ्या प्रमिल ताई सर्वार्थाने पंडिता होत्या.
त्यांचा दिवस भल्या पहाटे सुरू होई .आंघोळ, स्वतःचे कपडे स्वतः धुवून एकही सुरकुती पडणार नाही अशा पद्धतीने वाळत घालून मग प्रांत: शाखेत उपस्थित असत. संपूर्ण दिनचर्या आखीवरेखीव .कर्मठ तरी फारच सहज
कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वे शब्दांमध्ये सामावणे तसे कठीणच असते .कितीही लिहिले तरी बरेच लिहायचे राहून गेले असे वाटत राहते प्रमिलताईचे कर्तृत्व तशा श्रेणीचे आहे .
सदैव सजग असणाऱ्या प्रमिलताईंनी मृत्यूची समीपता पूर्णपणे ओळखली होती.देहदान केले.कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारी पत्रे लिहिली.थोडा वेळ आभासी पध्दतीने बैठकीत जोडून घेऊन कार्यरत राहण्यासाठी संदेश दिला .
याच सुमारास झालेल्या प्रत्यक्ष भेटी वेळी त्यांच्या अवस्थेकडे पाहून मला विदुषी दुर्गाबाई भागवत यांची मरणाला आवाहन करणारी कविता आठवत होती .त्यात त्या म्हणतात -
"आयुष्याची झाली रात | मनी तेवे अंतर्ज्योत |
भय गेले मरणाचे | कोंभ फुटले सुखाचे ||
अवयवांचे बळ गेले| काय कुणाचे अडले |
फुटले जीवनाला डोळे| सुख वेडे त्यात लोळे ||
मरणा तुझ्या स्वागतास | आत्मा माझा आहे सज्ज |
पाय घडी देहाची ती| घालून मी वाट पाही |
सुख वेडी मी जाहले| देहोपनिषद सिद्ध झाले ||
@सुनीला सोवनी
(पत्रकार,लेखक,अ.भा.प्रचार प्रमुख, राष्ट्र सेविका समिती)
://www.facebook.com/share/p/1BSf4f2bHL/https://www.facebook.com/share/p/1BSf4f2bHL/