
28/04/2025
📌 सूर्यकुमार यादवची धडाकेबाज कामगिरी; ऑरेंज कॅप आणि ऐतिहासिक विक्रमाची बरोबरी
आयपीएल २०२५ मध्ये सूर्यकुमार यादवची बॅट जणू आग ओकतेय...! मुंबई इंडियन्सचा हा स्टार फलंदाज आपल्या तुफानी खेळीने फक्त चाहत्यांची मने जिंकत नाहीये, तर रॉबिन उथप्पाच्या ऐतिहासिक विक्रमाशीही खांद्याला खांदा लावत आहे. सलग १० डावांमध्ये २५ किंवा त्याहून अधिक धावा करत सूर्यकुमारने २०१४ मध्ये उथप्पाने केलेल्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
📌 सूर्यकुमार यादवचा दबदबा
या मोसमात सूर्यकुमारने १० सामन्यांत ६१ च्या सरासरीने ४२७ धावा फटकावल्या आहेत. त्याच्या बॅटमधून ३८ चौकार आणि १९ जबरदस्त षटकार पाहायला मिळाले आहेत. त्याच्या ३६० डिग्री खेळाने गोलंदाजांची पुरती दाणादाण उडाली आहे. कोणत्याही दिशेला शॉट मारण्याची त्याची क्षमता मुंबई इंडियन्ससाठी मोठी ताकद ठरली आहे.
📌 ऑरेंज कॅपवर सूर्याचं नाव
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला मिळणारी 'ऑरेंज कॅप' सूर्यकुमार यादवच्या शिरपेचात आली आहे. कॅप मिळाल्यानंतर सूर्यानं आपल्या भावना व्यक्त करत सांगितलं, "हे माझ्यासाठी खूप खास आहे. खूप दिवसांनी ऑरेंज कॅप घालण्याचा आनंद मिळतोय. टॉस हरल्याने थोडीफार चिंता होती कारण बाहेर प्रचंड उष्णता आहे, पण २०० पेक्षा जास्त धावा करणं हे मोठं कामगिरीचं लक्षण आहे. विकेट स्लो होती, त्यामुळे दुसऱ्या संघासाठी फलंदाजी करणं कठीण होणार आहे."
सूर्यकुमारच्या शब्दांतून त्याचा आत्मविश्वास आणि खेळावरील निस्सीम प्रेम झळकतं. मैदानावरची त्याची आक्रमकता आणि मैदानाबाहेरची साधेपणा, ह्यामुळेच तो लाखो चाहत्यांचा लाडका बनलाय.