Aditya Prakashan

Aditya Prakashan Aditya Prakashan , Aboli Appartment , Flat Number - 32 , third floor,New Osmanpura ,Near Citycare Ho

23/02/2025
यशवंत संस्कृती : कर्तृत्व आणि नेतृत्वयशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तित्वाचा बहुआयामी वेध! © डॉ. सतीश बडवेमहाराष्ट्राच्या ...
12/03/2024

यशवंत संस्कृती : कर्तृत्व आणि नेतृत्व
यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तित्वाचा बहुआयामी वेध!

© डॉ. सतीश बडवे
महाराष्ट्राच्या जडणघडणीत स्वत:च्या कर्तृत्वाने भर घालणाऱ्या अग्रगण्य व्यक्तींमध्ये यशवंतराव चव्हाण या दूरदृष्टीच्या नेत्याचा समावेश केला जातो. राजकारणाच्या क्षेत्रातील सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होतेच; तथापि स्वत:च्या कृती-उक्तीचा आदर्श त्यांनी उभा करून दिला. मूल्यांवर विश्वास ठेवणारा, जनतेची नस ओळखणारा, वैचारिक उंची असलेला, साहित्याविषयी आस्था बाळगणारा, राज्याच्या व देशाच्या कल्याणाची स्वप्ने बघणारा धुरंधर नेता अशी त्यांची प्रतिमा सर्वत्र उभी राहिली. महाराष्ट्राला लाभलेले आधुनिकतेचे रूप, कृषी संस्कृतीचा विकास, भेदभावरहित जनकल्याणाचा विचार, सहकार चळवळीचा पुरस्कार अशा दिशेने प्रयत्नशील राहिलेला लोकनेता म्हणून यशवंतरावांची प्रतिमा आजही महाराष्ट्राने जतन करून ठेवली आहे. अशा या यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देणारा ‘यशवंत संस्कृती : नेतृत्व आणि कर्तृत्व’ हा ग्रंथ विलास फुटाणे यांनी आदित्य प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित केला आहे.
या ग्रंथाचे संपादन श्री. विलास फुटाणे यांनी विशिष्ट भूमिका ठेवून केले आहे. ‘‘राजकीय क्षेत्रात येणाऱ्या नव्या चेहऱ्याना यशवंतरावांच्या कार्यचेहऱ्याची ओळख व्हावी, त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी,’’ या हेतूने हे संपादन सिद्धीस गेले आहे. या दोनशे पानी ग्रंथात २७ मान्यवरांचे लेख असून यशवंतराव चव्हाण यांच्या बहुमिती व्यक्तिमत्त्वाला प्रकट करणारे हे लेखन आहे. हे लेखन करणाऱ्यामध्ये विचारवंत, लेखक, तत्त्वज्ञ, मुख्यमंत्री अशी बहुविध क्षेत्रातील मंडळी आहेत. त्यामुळेच या हिऱ्याचे विविध पैलू एकत्रितपणे वाचण्याची संधी वाचकाला आपोआपच मिळते. महाराष्ट्र शासनाच्या लोकप्रिय असणाऱ्या ‘लोकराज्य’ मासिकातून हे सारे लेख यापूर्वीच प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे ते सुट्या सुट्या स्वरूपात आलेले होते. या सर्वांचे एकत्रीकरण करून ते या संपादित ग्रंथात एकत्रपणे वाचता येणार असल्याने यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच आनंददायी ठरेल अशी ही घटना आहे. यशवंतराव हे अवघ्या महाराष्ट्राचे नेते होते. त्यांचे राजकीय विरोधकही त्यांच्या वैचारिक दृष्टीची मुक्तकंठाने प्रशंसा करीत. महाराष्ट्राच्या खेड्यातल्या एका मुलाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावे किंवा देशाचे संरक्षण मंत्रीपद सांभाळावे ही सामान्य गोष्ट निश्चितच नाही. यशवंतरावांशी ज्यांचे अतिशय जवळून संबंध आले, अशा व्यक्तींनी त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा वेध या ग्रंथात घेतला असल्याने त्याचे वेगळेपण आपोआपच नजरेत भरते.
यशवंतराव चव्हाण यांच्या कौटुंबिक जीवनापासून ते त्यांच्या राजकीय क्षेत्रातील देदीप्यमान कारकीर्दीपर्यंतचा आलेख या ग्रंथात उमटलेला दिसतो. काही दाखले या संदर्भात देता येतील. डॉ. सरोजिनी बाबर यांनी यशवंतरावांच्या अनेक आठवणी जागवून साहेब म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता कशी आहे याची मांडणी केली आहे. श्री. गोविंद तळवलकर यांनी यशवंतरावांच्या स्वभावावर प्रकाश टाकून त्यांच्या मनाची मशागत कशी झाली होती आणि प्रशासक हा शिस्तीचा व हृदयशून्य कसा असतो याचे उदाहरण घालून दिल्याच्या आठवणी जागवल्या आहेत. शंकरराव साळवी यांनी कबड्डी, खो-खो या खेळांचे त्राता म्हणून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेतली आहे. यशवंतरावांचे असेच वेगळे रूप बाळ कोल्हटकरांच्या लेखात सापडते. नाटकांवर आणि कलावंतांवर जीवापाड प्रेम करणारा एक रसिक त्यातून उभा राहतो. रणजित देसाई यांनी साहित्यप्रेमी यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व आपल्या लेखनातून उलगडलेले आहे. साहित्यिक आणि त्यांचे साहित्य यावर मनापासून प्रेम करणाऱ्या यशवंतरावांचा एक पैलू त्यातून लक्षात येतो. कला-क्रीडा आणि साहित्य यांच्याशी निकटचा संबंध ठेवणारे एक सर्वस्पर्शी अष्टपैलू नेतृत्व या लेखांमधून प्रकट होते.
या संपादनातील पहिलाच लेख माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा असून त्यात यशवंतरावांच्या नेतृत्वाचा वेध अनेकांगांनी घेतलेला आढळतो. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या सवलतींचा निर्णय याबाबत त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागली. जिल्हा परिषदांची निर्मिती, सत्तेच्या विवेंâद्रीकरणाचा विचार, लष्कराचे आधुनिकीकरण या संदर्भातल्या त्यांच्या कार्याची नोंद या लेखात आली आहे. शरदचंद्र पवार यांनी त्यांच्याशी आलेला संबंध, यशवंतरावांची एकजिनसी समाजाची कल्पना, लोकशाही समाजवादाची त्यांची संकल्पना, त्यांचे संसदपटुत्व यावर प्रकाश टाकला आहे. ‘आदर्शाचा दीपस्तंभ’ या दृष्टीने त्यांनी केलेले हे भाषण या ग्रंथात लेखस्वरूपाने साकारले आहे. वसंतराव नाईक यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील यशवंतरावांची कामगिरी नोंदवून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण राष्ट्रीय व तात्त्विक विचारसरणीतून कशी झाली, मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांचा पगडा असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रगत विचारांचे कसे आहे हे आपल्या लेखातून उलगडलेले आहे. मा. सो. कन्नमवार यांच्या लेखात सहप्रवासी या दृष्टीने आलेली अनेक निरीक्षणे बघण्यास मिळतात. त्यात जसा वेणूताई चव्हाणांच्या आठवणींचा संदर्भ येतो तसाच संघर्षाच्या प्रसंगी कठोर निर्णय घेऊन काँग्रेसच्या सच्चा कार्यकर्त्याचेही दर्शन घडते. सर्वांना सांभाळून घेणारे, सर्वांना कामात स्वातंत्र्य देणारे, इतरांच्या पोटात शिरून त्यांचा विश्वास संपादणारे यशवंतराव हे विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र यांच्यात पूल उभारणारे ‘कल्पक इंजिनिअर’ कसे होते हे सोदाहरण मांडले आहे.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी यशवंतरावांच्या बालपणापासूनची जडणघडण आपल्या लेखात मांडली असून भारतीय राष्ट्रवाद त्यांच्या जीवनाचा मार्गदर्शक बनला, विविध विचारवंतांचा व्यासंग त्यांनी कसा वाढवला, स्वातंत्र्यप्राप्तीच्या आंदोलनात सहभाग कसा घेतला याचे वर्णन केले आहे. यशवंतरावांच्या अनेकविध पैलूंवर या लेखातून प्रकाश पडतो. होमगार्ड संघटनेची निर्मिती, द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्रीपद, स्वराज्य संस्थांच्या निर्मितीचा कायदा, कृषी औद्योगिक अर्थव्यवस्था, चीन आक्रमणाच्या वेळी सांभाळलेले संरक्षण मंत्रीपद या विषयीची बारीकसारीक माहिती त्यात मिळते; पण घरच्या पातळीवरील दु:खाचे क्षणही ते आपल्या लेखनातून जिवंत करताना आढळतात. अशाच प्रकारच्या आठवणी जागवून मोहन धारिया यांनीही त्यांच्यातले अष्टपैलुत्व मांडलेले आहे. एका बाजूला राजकीय वाटचाल, तर दुसऱ्या बाजूला व्यक्तिमत्त्वाचे विविधरंगी पैलू यामुळे यशवंतराव हे अनेकांचे स्नेही बनले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील ‘माणूस’ शोधण्याचा प्रयत्नही रामभाऊ जोशी, एस. एम. जोशी यांनी आपल्या लेखातून केला आहे. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांनी ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ अशा अचूक शब्दात त्यांचे वर्णन केले आहे. २७ लेखांमधून सत्तावीस नक्षत्रांसारखे अनेकविध चमचमणारे गुण या ग्रंथातून लक्षात येतात. यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्याचा हा प्रयत्न आहे. गोविंद तळवलकर, आचार्य अत्रे, नरुभाऊ लिमये, य. दि. फडके यांसारख्या दिग्गजांच्या शब्दांमधूनही यशवंतरावांचे रूप साकारले जाते. प्रशासक आणि राज्यकर्ता म्हणून त्यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय श्री. रा. सोहनी यांनी नोंदवलेले आहेत. आधुनिक महाराष्ट्राचे रूप अधिकाधिक मनोहार्य बनविण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्याशी निगडित असणाऱ्या सर्वांनीच आपली लेखणी झिजवली आहे. यातून यशवंतरावांची बहुआयामी व्यक्तिरेखा जिवंत होते. कुण्याही मराठी माणसाला अभिमान वाटावा असे यशवंतराव समजून घेण्यासाठी यशवंत संस्कृती हा संपादित ग्रंथ उपयुक्त ठरणार आहे.

यशवंत संस्कृती : नेतृत्व आणि कर्तृत्व
लेखन / संपादन : विलास फुटाणे
आदित्य प्रकाशन, अबोली अपार्टमेंट, ३२, तिसरा मजला,
न्यू उस्मानपूरा, छत्रपती संभाजीनगर.
पृ.सं.१६८ कि. २००
संपर्क. नंबर:8446796557

Address

32, Aboli Appartment , Near City Care Hospital , New Osmanpura
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aditya Prakashan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aditya Prakashan:

Share