19/10/2025
एआय तंत्रज्ञान, गुन्हे तपासातील गती आणि सणांतील सुरक्षा — मा. विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे स्पष्ट निर्देश!
मा. वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे गुन्हे आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील प्रलंबित गुन्हे, तपासातील गती, सायबर जनजागृती, एआय तंत्रज्ञानाचा वापर, व दिवाळी सणातील सुरक्षा व्यवस्थापन या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीदरम्यान मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी जिल्ह्यातील प्रलंबित गुन्ह्यांचा सखोल आढावा घेत, पोलीसांच्या दैनंदिन कामकाजात एआय (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, “गुन्हेगारीचा ट्रेंड, डेटा अॅनालिसिस आणि तपास प्रक्रियेत एआयचा वापर केल्यास तपास अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि जलद होईल.”
🔹 गुन्हे तपासात गती — वाहनचोरी व मालाविरुद्ध गुन्ह्यांवर लक्ष..
नागरिकांच्या चोरी झालेल्या मालाचा तपास जलद गतीने पूर्ण व्हावा, यासाठी वाहनचोरी व मालाविरुद्ध गुन्ह्यांचा तपास हा पोलीस ठाण्यातील एकाच अधिकाऱ्याकडे सोपविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
त्याचबरोबर चोरी गेलेला मुद्देमाल सचोटीने हस्तगत करून तो फिर्यादींना तात्काळ परत देण्याच्या बाबतीत विशेष भर देण्यात आला.
🔹 सायबर अवेअरनेस मास - 2025 अनुषंगाने जनजागृती मोहीम..
सायबर गुन्ह्यांवरील नियंत्रणासाठी आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सायबर अवेअरनेस मास - 2025 अंतर्गत विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या.
🔹 ई-प्रशासन सुधारणा कार्यक्रमाचे आढावा. .
मुख्यमंत्री महोदयांच्या 250 दिवसांच्या ई-प्रशासन सुधारणा कार्यक्रमाच्या अनुषंगाने, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाची वेबसाईट, ‘आपले सरकार’, ई-ऑफिस, डॅशबोर्ड आणि नविन वेब अॅप्लिकेशन यांचे लाईव्ह डेमो पाहून सखोल मार्गदर्शन केले.
🔹 24 पोलीस ठाण्यांचा सविस्तर आढावा
जिल्ह्यातील 24 पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा आणि वाहतूक शाखेच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर देण्यात आला —
1. अवैध व्यवसायांवर कारवाई (दारूबंदी, जुगार, आर्म्स अॅक्ट, एन.डी.पी.एस., वाळू चोरी, पिटा)
2. प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण कमी करणे
3. फरार आरोपींना अटक आणि कन्व्हिक्शन दर वाढविणे
4. समन्स व वॉरंट बजावणीतील प्रगती
5. मालमत्ता विषयक गुन्हे व मुद्देमाल निर्गती
6. मोटार वाहन कायदा अंमलबजावणी
7. वरिष्ठांकडे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढणे
मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना “प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, तपासात वेग आणावा आणि नागरिकांचा विश्वास वाढवावा” असे स्पष्ट निर्देश दिले.
🔹 दिवाळी सणात सतर्कता — ई-बिट प्रणालीद्वारे सुरक्षा मजबूत
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिक घर कुलूप लावून बाहेरगावी जात असल्याने, ई-बिट प्रणाली अंतर्गत सतर्क पेट्रोलिंग व प्रभावी नाईट पेट्रोलिंग ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
“सण, उत्सव हे शांततेत, उत्साहाने आणि निर्विघ्न वातावरणात पार पडले पाहिजेत, यासाठी प्रत्येक अधिकारी व अंमलदार हे कटिबद्ध असला पाहिजे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
🔹 कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव
बैठकीदरम्यान मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांना प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये खालील निकषांवर कामगिरीचा गौरव करण्यात आला —
• गंभीर आणि क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास करून आरोपी निष्पन्न करणे
• जबरी चोरी, वाहनचोरी, चैन स्नॅचिंग प्रकरणे उघडकीस आणणे
• अंमली पदार्थविरोधी कारवाई, अवैध शस्त्रांवरील प्रतिबंध
• नागरिकांना डायल-112 द्वारे जलद प्रतिसाद
• तक्रारी आणि अर्ज निकाली काढणे
• समन्स व वॉरंट बजावणीतील प्रगती.
या बैठकीस सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, शाखा अधिकारी व सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.