24/07/2025
पिकविमा व #कर्जमुक्ती तात्काळ द्या; बार्शीत शेतकरी संघटनेचा रस्ता रोको
Vijetatimes :-बार्शी/सोलापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिखर्डे येथे बार्शी-धाराशिव रस्त्यावर शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मागील थकीत पिकविमा तात्काळ देऊन, पीक विम्याचे राज्य प्रमुख विनय आवटे यांच्या संपत्तीची तसेच सर्व कंपन्यांची त्यांचे स्थापनेपासून न्यायालयीन चौकशी करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, लातूर येथे आंदोलकाला मारहाण केलेल्या गुन्हेगारांवर तसेच मंत्री सुनील तटकरे व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे सी.डी.आर. तपासून त्यांचेवरही गुन्हे नोंदवा, समान काम समान वेतन कायद्याची अंमलबजावणी करा, दिव्यांग व विधवांच्या मानधनात वाढ करा, जनसुरक्षा विधेयक तत्काळ रद्द करा, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर न झाल्यास जिल्हा व राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची कार्यालये, पिकविमा कंपन्या, संबंधित मंत्र्यांच्या घरासमोर तसेच मंत्रालयावर आंदोलन करणार, असा इशारा शंकर गायकवाड (राज्याध्यक्ष,शेतकरी संघटना) यांनी दिला. आंदोलनात तालुकाध्यक्ष शरद भालेकर, उपाध्यक्ष प्रशांत काळदाते, दिगंबर रणखांब, रामभाऊ काटे, काकासाहेब गलांडे, अभिजीत शिंदे, पप्पू कोंढारे, गजानन शाखापुरे, नितीन कोंढारे, यशवंत मोरे, ज्ञानदेव कोंढरे, रघुनाथ कोंढारे, प्रकाश उकिरडे, महेंद्र गलांडे, रामहरी पेजगुडे, सुनील अडसूळ, राहुल कोंढारे, संभाजी भोसले, मामासाहेब ढवळे, बालाजी निंबाळकर आदींसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी व महिला उपस्थित होत्या.
मागण्यांचे निवेदन तहसीलच्या प्रतिनिधी, नारीच्या मंडळाधिकारी एम.व्ही. राजपूत यांना देण्यात आले तर या आंदोलनाचा चोख पोलीस बंदोबस्त पांगरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यावलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठेवला होता.