07/08/2026
गोरगरिबांच्या तोंडचा घास लुटणाऱ्यांवर बार्शी तालुका पोलिस, महसूल व पुरवठा विभागाचा घणाघात!
रेशनच्या काळाबाजाराचा 31.15 लाखांचा पर्दाफाश; शेकडो पोते माल जप्त तर चौघे जेरबंद
Vijeta Times : बार्शी,
गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाकडून मोफत वितरित करण्यात येणाऱ्या सार्वजनिक वितरण प्रणालीतील (रेशन) अन्नधान्याचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर बार्शी तालुका पोलिसांनी महसूल व पुरवठा प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत मोठा घाव घातला आहे. फपाळवाडी (ता. बार्शी) येथील पत्राशेडवर टाकलेल्या धाडीत गहू, तांदूळ, उडीद डाळ ( 19300 किलो ) यामध्ये गहू - 213 पोते, तांदूळ - 169 पोते, उडीद - 4 पोते तसेच वाहनांसह तब्बल 31 लाख 15 हजार 981 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि तहसीलदार बार्शी यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, फपाळवाडी गावच्या शिवारात रेल्वे स्टेशनसमोरील अरणगाव रस्त्यालगत असलेल्या मांगडे यांच्या शेतातील पत्राशेडमध्ये शासनाच्या रेशनचा मोठा साठा करून तो ट्रक व पिकअपमधून विक्रीसाठी बाहेर पाठविण्याची तयारी सुरू आहे. या माहितीच्या आधारे तहसीलदारांच्या आदेशानुसार बार्शी तालुका पोलीस, पुरवठा विभाग आणि महसूल प्रशासनाच्या पथकाने संयुक्त छापा टाकला. घटनास्थळी काही व्यक्ती पोत्यांमधील अन्नधान्य ट्रक व पिकअपमध्ये भरत असल्याचे निदर्शनास आले. पंचनामा करून तपासणी केली असता पोत्यांमध्ये शासनाकडून लाभार्थ्यांना मोफत देण्यात येणारा गहू, तांदूळ आणि उडीद डाळ मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आल्याचे उघड झाले.
कारवाईदरम्यान अन्नधान्यासह ट्रक, पिकअप आदींसह एकूण 31 लाख 15 हजार 981 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक ज्ञानेश कुंटलवाड (तहसील कार्यालय, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जीवनावश्यक वस्तू अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई मध्ये धनाजी अर्जुन मांगडे, गजेंद्र अर्जुन मांगडे, चांगदेव पिराजी दळवी, गणेश श्रीहरी कदम या चारही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करीत आहेत.
प्राथमिक तपासात या काळाबाजाराच्या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पोलीस त्यादृष्टीने सखोल तपास करत आहेत. गोरगरिबांच्या हक्काचे अन्नधान्य काळ्या बाजारात विकून अवैध नफा कमावणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप आणि तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, युवराज गायकवाड, सिद्धेश्वर लोंढे, गोविंद बचूटे तसेच पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.
गोरगरिबांच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्यांविरोधातील ही धडक कारवाई बार्शी तालुक्यात चर्चेचा विषय ठरली असून, अवैध धंद्यांवर सुरू असलेल्या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे स्वागत केले आहे.