02/09/2026
PSI अमोल गंगलवाड यांच्या आत्महत्येची उच्चस्तरीय चौकशी करा – किरण घोंगडे
पोलीस बांधवांवरील मानसिक ताण कमी करण्यासाठी संवेदनशील यंत्रणा उभारण्याची मागणी
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील तरुण पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड यांनी रेल्वेखाली केलेली आत्महत्या अत्यंत दुर्दैवी व मन हेलावून टाकणारी घटना आहे. या घटनेमागील नेमकी कारणे काय होती, त्यांच्यावर कोणत्या प्रकारचा प्रशासकीय अथवा मानसिक ताण होता का, याची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष किरण घोंगडे यांनी केली आहे.
या मागणीसंदर्भातील निवेदन दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात देण्यात आले.
अमोल गंगलवाड यांच्या आत्महत्येची चौकशी करताना त्यांचे कॉल डिटेल्स, मोबाईल मेसेज, बदली व नियुक्तीचे आदेश तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेला पत्रव्यवहार तपासण्यात यावा. त्यांच्या कामकाजाशी संबंधित अधिकाऱ्यांची भूमिकाही चौकशीच्या कक्षेत आणावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
“पोलीस अधिकारी-कर्मचारी हे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र सेवा देणारे आपले बांधव आहेत. शिस्त आवश्यक आहे; मात्र शिस्तीच्या नावाखाली कोणत्याही कर्मचाऱ्यावर अनावश्यक मानसिक दबाव निर्माण होऊ नये. अमोल गंगलवाड यांच्या आत्महत्येसारखी घटना पुन्हा घडू नये, हीच आमची भूमिका आहे,” असे किरण घोंगडे यांनी सांगितले.
पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी गोपनीय तक्रार निवारण, नियमित समुपदेशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवादाची प्रभावी व्यवस्था निर्माण करावी. तसेच हिंगोली जिल्ह्यातील पोलीस मनुष्यबळ वाढवून कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करावा.नव्याने पोलीस भरती प्रक्रिया राबवावी तसेच बदल्या व नियुक्त्यांमध्ये पारदर्शक व समान निकष लागू करावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
“अमोल गंगलवाड यांच्या आत्महत्येचे सत्य समोर आले पाहिजे; मात्र त्याचबरोबर भविष्यात कोणत्याही पोलीस बांधवाला मानसिक तणावामुळे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येऊ नये. पोलीस दलाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत,” असेही किरण घोंगडे यांनी स्पष्ट केले.