
09/10/2025
कॅम्पचा ऐतिहासिक क्षण!ब्रिटिश काळातील नाव हटवून बेळगाव कॅम्पमधील प्रसिद्ध हाय स्ट्रीट आता अधिकृतपणे
‘छत्रपती शिवाजी महाराज मार्ग’
बेळगाव कॅम्प परिसरातील प्रसिद्ध हाय स्ट्रीट (High Street) या रस्त्याचे आता अधिकृतपणे 'छत्रपती शिवाजी महाराज मार्ग' असे नामकरण करण्यात आले असून, या नव्या नावाचा फलक अधिकृतरीत्या बसविण्यात आला आहे.
हा निर्णय बेळगाव कॉटनमेंट बोर्डाने घेतला असून, ब्रिटिश काळातील अधिकाऱ्यांच्या नावांवर असलेले रस्ते व चौक भारतीय स्वातंत्र्यवीर, राष्ट्रीय नायक आणि इतिहासातील थोर व्यक्तींच्या नावाने ओळखले जावेत, या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यानुसार एकूण ३४ रस्त्यांच्या नामांतराची प्रक्रिया राबविण्यात आली.
हाय स्ट्रीट या रस्त्याचे छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे नामकरण करण्याच्या प्रस्तावाला बोर्डाच्या डिसेंबर २०२४ च्या बैठकीत अंतिम मंजुरी देण्यात आली होती. या बैठकीस अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयहदीप मुखर्जी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव, सदस्य सुधीर तुपेकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.