19/09/2025
जातनिहाय जनगणना : होतेय मोठ्या प्रमाणात जनजागृती
नमूद करा ....धर्म हिंदू, जात मराठा, पोटजात कुणबी आणि मातृभाषा मराठी : केलं जातंय आवाहन
बेळगाव : येत्या 22 तारखेपासून सुरू होणाऱ्या जातनिहाय जनगणनेसंदर्भात मराठा समाजातील नेते मंडळीकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मराठा समाजाचे युवा नेते किरण जाधव यांनी आज बेळगावमधील नामांकित अशा नवहिंद को ऑपरेटिव्ह सोसायटी या पतसंस्थेला आणि मराठा सहकारी बँकेला भेट देऊन तेथील चेअरमन आणि संचालकाला जातनिहाय जनगणना पत्रकात मराठा समाजाने कशाप्रकारे माहिती नोंद करावी याची माहिती दिली.
यावेळी मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी संचालकांसमवेत माहिती घेऊन बँकेच्या सभासद, ग्राहक आणि हितचिंतकांना आवाहान करून, मराठा समाजातील लोकांनी जातनिहाय जनगणना पत्रकात आपली माहिती योग्य प्रकारे नमूद करावी. धर्म हिंदू, जात मराठा, पोटजात कुणबी आणि भाषा मराठी असे नमूद करावे असे आवाहन त्यांनी केले.
बँकेच्या संचालिका रेणू किल्लेकर यांनीही याविषयी माहिती देत, मराठा समाजातील नागरिकांनी जातीनिहाय जनगणनेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर, मराठा समाजातील नेत्यांनी केलेल्या आवाहानुसार माहिती नमूद करावी असे सांगितले.
नवहिंद को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर यांनी, जातनिहाय जनगणनेवेळीधर्म हिंदू, जात मराठा आणि पोटजात कुणबी व मातृभाषा मराठी असे ठोसपणे नमूद करावे. जेणेकरून पुढील पिढीला याचा लाभ होईल असे म्हटले.
किरण जाधव हे विविध संघ संस्थांना भेटी देऊन तेथील पदाधिकारी तसेच संचालक मंडळांना जातनिहाय जनगणने दरम्यान भरावयाच्या माहितीविषयी मार्गदर्शन करीत आहेत.