03/10/2025
गुंजी माऊली देवी यात्रोत्सवाला प्रारंभ : पाच दिवस चालणार यात्रा
खानापूर : खानापूर तालुक्यासह बेळगाव, गोवा व महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान गुंजी येथील श्री माऊली देवी यात्रोत्सवाला आज सुरुवात झाली. सोमवार, दिनांक 6 ऑक्टोबर 2025 पर्यंत ही यात्रा चालणार आहे.
गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी पालखी उत्सवाने यात्रेला प्रारंभ झाला. 6 ऑक्टोबर रोजी यात्रेची सांगता होणार असून या दरम्यान विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार, 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता इंगळ्यांचा कार्यक्रम, ओटी भरणे, तुलाभार, नवस फेडणे इत्यादी धार्मिक विधी संपन्न झाले. दुपारी 12 वाजता श्री माऊली जनसेवा फाउंडेशन, गुंजी यांच्यातर्फे महाप्रसाद कार्यक्रम झाला. रात्री 8 वा. शेजारती व प्रसाद
आणि रात्री 10 वा. सोशल फाउंडेशन पुरस्कृत श्री चव्हाटा नाट्य मंडळाचा ‘गारवा डाळिंबीचा’ हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
शनिवार, 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वा. धार्मिक विधी (इंगळ्यांचा कार्यक्रम, ओटी भरणे, तुलाभार, नवस फेडणे)
दुपारी 12 वा. संकल्प फाउंडेशन, गुंजी यांच्यातर्फे महाप्रसाद,रात्री 8 वा.: शेजारती व प्रसाद तर रात्री 10 वा. सांस्कृतिक कला युवामंच पुरस्कृत जल्लोष ऑर्केस्ट्रा, कोल्हापूर यांचा भव्य संगीत कार्यक्रम होणार आहे.
रविवार दिनांक 5 ऑक्टोबर व सोमवार, 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वा. धार्मिक विधी होणार आहेत.
सोमवार दिनांक सकाळी 11 वा. गाऱ्हाणे होऊन यात्रोत्सवाची सांगता केली जाणार आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात उत्साहाचे वातावरण आहे.
भाविकांनी मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होऊन देवीचे दर्शन घ्यावे तसेच आयोजित धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळाकडून करण्यात आले आहे.