28/10/2025
दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला रवाना
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे शिष्टमंडळ प्रदेश अध्यक्ष यांच्या भेटीला मुंबईला रवाना झाले आहे. माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्ष प्रवेशाला रोखण्यासाठी सोलापूरचे शिष्टमंडळ प्रदेश अध्यक्ष यांच्या भेटीला मुंबईला रवाना झाले आहे. हे शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन आपल्या भावना प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना कळविणार आहेत.
दहा सदस्यांचे हे शिष्टमंडळ असून शिष्टमंडळामध्ये दक्षिण, उत्तर, शहर चे दोन मंडल अध्यक्ष डॉक्टर शिवराज सरतापे, हनुमंत कुलकर्णी,विशाल गायकवाड, प्रशांत कडते, यतीन शहा यांचा सामावेश आहे. दुपारी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे प्रदेश कार्यालयात येणार आहेत, यावेळी हे शिष्टमंडळ त्यांना भेटून आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहेत.
माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे पक्षांतर्गत वातावरण ढवळून निघाले आहे. अलीकडेच भाजप कार्यकर्त्यांकडून या विरोधात निषेध नोंदविला गेल्याने, स्थानिक पातळीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या संभाव्य प्रवेशामुळे दक्षिणेतील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले असून, पक्ष संघटनेतील भावनिक वातावरण चिघळताना दिसत आहे.
कार्यकर्त्यांचा ठाम मुद्दा असा की, भाजप वाढविण्यासाठी अनेक
वर्षे कष्ट करणाऱ्या, ग्रामीण पातळीवर संघर्ष करणाऱ्या सच्च्या कार्यकर्त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे, बाहेरून येणाऱ्या नेत्यांना थेट प्रवेश देणे योग्य ठरणार नाही. "पक्षासाठी खांद्याला खांदा लावून मेहनत केलेल्या कार्यकर्त्यांच्या त्यागाचा सन्मान केला
जावा," अशी मागणी आंदोलनावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती.
दरम्यान, जिल्हा आणि तालुका पातळीवरील काही घटकांकडून पालकमंर्त्यांना सोबत घेऊन राजकीय हालचाली करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा देखील सुरू आहे. या पाश्वभूमीवर, आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या भूमिकेवर कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.
यासंदर्भात आमदार सुभाष देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्टपणे सांगितले. दक्षिण
सोलापूर संघटनेला आज जी ताकद आहे ती इथेच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेमुळेच. कोणताही निर्णय घेताना त्यांच्या भावना, सन्मान आणि परिश्रम यांचा आदर राखला जाईल."
दक्षिण सोलापूरात काही काळापासून बाजार समिती निवडणुकीनंतरचे राजकीय मतभेद आणि नाराजी पृष्ठभागावर आहेत. अशावेळी नव्या प्रवेशाच्या चर्चेमुळे कार्यकर्त्यांच्या भावना पुन्हा ढवळून निघाल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना, सुभाष बापूंच्या प्रतिमेवरील विश्वास आणि पक्षश्रेष्ठींचा अंतिम निर्णय झ या तिन्ही गोष्टींवर दक्षिणेतील भाजपची पुढील दिशा ठरणार आहे. या घडामोडींवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत झाले.
यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मध्यस्थीने दिलीप माने यांचा प्रवेश होणार की नाही. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदरच लवकरच स्पष्ट होणार आहे, अशी माहिती देण्यात येत आहे.