03/11/2025
डॉ. संपदा मुंडे कुटुंबीयांची खा. सुप्रिया सुळे यांच्याकडून भेट
आरोपींना शिक्षेसाठी प्रयत्न करणार – सुळे
तालुक्यातील डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन खा. सुप्रिया सुळे यांनी त्यांना सांत्वन दिले व आधार दिला. तसेच या प्रकरणातील दोषींना शिक्षेसाठी प्रयत्न करणार असल्याचेही आश्वासन दिले.
कडडगाव (ता. वडवणी) येथे सोमवारी (दि. ३) खा. सुळे यांनी मुंडे कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या घटनेचा निषेध करत सांगितले की, “संपदा मुंडे आत्महत्या नव्हे, तर हा गंभीर प्रकार असून न्याय मिळेपर्यंत आपण शांत बसणार नाही.”
डॉ. संपदा मुंडे या सातारा जिल्ह्यातील फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी मागील आठवड्यात आत्महत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
या वेळी खा. सुळे यांच्यासोबत खा. बजरंग सोनवणे, माजी आमदार संदीप क्षीरसागर, महेबूब शेख आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.