08/09/2024
नाल्या काढा ताई
*प्रेगनंट म्हशीचे नीता अंधारेना पत्र*
क्रॉसलाईन
*दैनिक मराठवाडा* पत्र 9613331111
टीप - तळाला आहे
प्रती
नीता अंधारे
मुख्यकार्यकारी अधिकारी बीड नगर परिषद
पत्ता माहीत नाही
संपर्क - फोन उचलत नाहीत
*नीता ताई सप्रेम नमस्कार , एक स्त्री म्हणून मला तुमचा अभिमान*, मानवाने प्राणी मात्रावर नेहमी जीव लावला आहे , आम्ही देखील तुमच्या लेकरा बाळाना दूध दिले आहे . म्हणून माणूस काय आणि आम्ही जनावरे काय आपण सगळे देवाचे जीव , गाईला माता समजता आनंद आहे नीताताई मला किमान बहीण तरी समजून माझे आज ऐकून घ्या . झाले असे की तीन दिवसांपूर्वी माझा मालक मला घरी घेऊन जात असताना गांधी नगर मध्ये नाली दिसलीच नाही , का तर नगर परिषदेने लाइट लावल्या नाहीत बर ताई काय सांगू , वरुण नाली समजली नाही मी अशी अंधारात पडली बाई , मला बाहेर निघताच येईना . माझा मालक शाहनवाज कुरेशी मोमीनपुरा येथे राहणारा आता तो 70 किलोचा मी दोनशे किलोची मला बाहेर काढणार कसा , भलते बघे जमा झाले बाई , कुणी शेपटी धर कुणी शिंगाला धरून ओढ मात्र तुमच्या म्हणजे नगर परिषदेच्या नाल्या बेंदाडाने तुडुंब भरलेल्या , नीताताई असे का नाल्या का बर काढत नाही , कुणी सांगितले का नाल्या काढू नका म्हणून , बाई काय सांगू माझ्या तोंडात नाकात घाण गेली , नुसती गर्दी मला काही खरे दिसेना , तेवढ्यात तो लोकपत्रकार कुठल्या कार्यक्रमाला निघालेला ताफा घेऊन , कुणीतरी म्हटले तावरे साहेब म्हैस पडली , मला वाटले कोण हा तावरे मात्र बाई तो निघाला हुशार त्याने मागवला दोरखंड मग सुफियान मनियर ने माझ्या पोटा खालून दोर टाकला मात्र उजव्या बाजूने दोर घ्यायचा कसा , त्या तावरे ने स्वतला नालीवर झोकून दिले आणि अर्धा लटकून त्याने नालीत हात टाकला आणि घालचा दोर घेतला , त्यात मी गाबन तुमच्या भाषेत गरोधर , मग काय अली प्रदीप मैनूभाई फयाज बाबा यांनी दोर ताणला व माझे पाय वरती आले आणि मी पुटकून वरती आले . वाचलेच मी , नीताताई तुम्ही काय मी काय आपण दोघी स्त्री गाईला आई मानता मला बहीण म्हणून तरी उपकार करा . आणि हो मी ज्या नालीत पडले ती नाली काढावी म्हणून खासदार सोनवणे यांनी पत्र पाठवले होते म्हणे . हे बघा नीता ताई आपल्याला काय करायचे राजकारण आपण नौकर माणसे , खासदार लोकानी निवडून दिलेला पत्र आलं तर तुम्ही नाली काढायला पाहिजे ना , आता म्हणाल तुला काय करायचे , काय करायचे लागले होते ना बाई मी मरायला. आम्ही तुम्हाला दूध देनार आणि तुम्ही आम्हाला नालीत टाकणार , तुम्ही करा राजकारण आणि घ्या आमचे जीव , गई भईस पानी मे ते हेच का ? निवडणूका नाही काही नाही , कुणी विचारायला नाही , सगळ्या सह्या म्हणे अर्थ पूर्ण वाटेने होतात , काय पगार कमी पडतो कुणास ठाऊक . फक्त मी म्हैस म्हणून माझ्या सोबत हा व्यवहार , मी हलक्या जातीत येते ना , जर मी गाय असते तर कशी काळजी घेतली असती , ती काय मी काय दोघी दूधच देतो ना ? पण मला कसे वागवता , जनावरात देखील आता राजकारण आणले आहे , गाय माझीच मावस बहीण ती झाली देव असेल देखील मात्र मी म्हैस झाली त्यात माझ काय पाप . नीता ताई तुम्हाला मी थोरल्या बहिणीच्या रूपात पाहते , आता तरी लहान बहीण नालीत पडून मरेल असे वागू नका . भागवत तावरे तरी सर्वांना पुरणार आहे का , नाल्या रस्ते या मूलभूत गरजा आहेत तेवढ्या तरी पुऱ्या करा , आता माणसाना जनावरासारखे वागवणार असाल तर जणावराना माणसाच्या भूमिकेत यावे लागले आहे . आपण अधिकारी आहोत सर्व नेते पक्ष तुम्हाला समान हवेत , तो माझा विषय नाही मात्र याचे त्याचे ऐकून या भागात अमुक धर्माचे लोक आहेत तिकडे विकास नको , म्हणजे हा गैरसमज ठरावा , तुम्ही काय कायम बीडला नसाल मात्र तुमच्या मागे लोकानी नाव घेतले पाहिजे की ताईच होत्या बर , लई वाईट बोलतात . ताई साहेब फोन का उचलत नसता कारण किमान आमचे हंबर्डे तरी नपला ऐकायला जाईल व फुटला तर पान्हा फुटेल . असो खुप बोलले एका म्हशीने बोलावे ते किती , तरीही बरांच वेळ घेतला , आज म्हशीला वेळ दिला धन्यवाद
*तुमचीच लहानी बहीण*
काळी म्हैस
टीप - पत्र अनावृत असून नगर परिषद बीड प्रशासकीय तुंबनवर व्यंग आहे