10/03/2025
पुणे : ‘सिंहगड रोडचा एकच भाऊ निरज ढवळे ए डी भाई’ म्हणत कोयते नाचवत माजवली दहशत ! लघुशंका करताना हटकल्याने पतीपत्नीवर वार करणार्यांचा आणखी एक प्रताप
पुणे : लघुशंका करताना हटकल्याने पतीपत्नीवर कोयत्याने वार करुन त्यांच्या खुनाचा प्रयत्न करणार्या तिघांनी त्या अगोदर सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी येथील राजीव गांधी वसाहतीत कोयते नाचत दहशत माजविल्याचे समोर आले आहे.
मोहन मारुती गोरे (वय २०, रा. साईनगर, हिंगणे), करण रामचंद्र बर्गे (वय १९, रा. हिंगणे), साहिल राजू पठाण (वय १९, रा. साईनगर, हिंगणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत सुरज रमेश लोखंडे (वय ३६, रा. राजीव गांधी वसाहत, विठ्ठलवाडी, सिंहगड रोड) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईगडे यांनी सांगितले की,विठ्ठलवाडीमध्ये कोयते उगारुन दहशत माजविणार्या या आरोपींनी लघुशंका करताना हटकल्याने पतीपत्नींवर कोयत्याने वार करुन त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता. सध्या त्यांना शस्त्र बाळगून दहशत माजविल्याप्रकरणात अटक केली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात नंतर अटक करण्यात येईल.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र उमेश मनोहर दाखले, रवि शिवाजी शिंदे व रवि नाना शिंदे हे शुक्रवारी रात्री पावणे आठ वाजता गप्पा मारत थांबले होते. त्यांच्याकडे एक कुरियरवाला आला होता. त्याला त्यांनी दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्याचवेळी दोन दुचाकीवरुन पाच जण आले. त्यातील एकाने हातामधील कोयता फिर्यादी यांना मारण्यासाठी उगारला. तुझा जीवच घेतो आता़, तेव्हा त्यांच्यातील एक जण म्हणाला, हा नाही तो, असे म्हणून उमेश दाखले याच्यावर कोयता उगारला. त्याचवेळी त्यांच्यातील एक जण पुन्हा मोठ्याने ओरडला, तो पण नाही हा, यामधील कोणीही नाही, असे म्हणाला. हे पाहून त्यांच्याकडे आलेला कुरियरवाला दुचाकी टाकून पळून गेला. त्यानंतर ते म्हणाले की, ‘‘सिंहगड रोडचा एकच भाऊ निरज ढवळे ए डी भाई’’ असे म्हणत ते मोठ्याने आरडा ओरडा करत त्यांच्या हातातील कोयते गोल फिरवत जमिनीवर घासत दहशत माजवत निघून गेले.
त्यानंतर त्यांनी धायरी येथे लघुशंका करत असताना अटकाव केल्याने पतीपत्नीवर कोयत्याने वार करुन त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. दहशत माजविणार्या या टोळक्याला सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिसांनी पकडले. फिर्यादी यांनी त्यांना ओळखल्यानंतर शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्यांना अटक केली आहे. तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. हे तिघेही सराईत गुंड असून त्यांच्यावर या अगोदर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे तपास करीत आहेत.
(Pune, Sinhgad Road, Vithalwadi, Latest News)