13/12/2025
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण हे शहर मुंबई गोवा महामार्गावर मुंबई आणि गोव्याच्या जवळपास मध्यभागी वसलेले आहे. वशिष्ठी नदीच्या काठावर वसलेले हे शहर कोकणातील एक मोठी आणि महत्त्वाची बाजारपेठ आहे. मुंबई किंवा कराड वरून चिपळूण शहरात येताना डाॅ. आंबेडकर चौक हे चिपळूण शहराचे प्रवेशद्वार लागते. या नाक्यावरून कराड रोड ने गावाच्या दिशेने अंदाजे २०० मीटर पुढे आले की उजव्या हाताला एक कोकणातील घरासारखे दिसणारे हॉटेल आहे. हेच चिपळुणातील प्रसिद्ध *परांजपे हॉटेल.*
परांजपे हाॅटेल साधारणपणे १९४२ च्या दरम्यान आप्पा म्हणजे कै. शांताराम नारायण परांजपेनी सुरू केले. तेंव्हा हाॅटेल समोर सागवानाची भली मोठी २ झाडे होती. अनेक किलोमीटर परिसरात एवढं मोठं झाड नव्हते. त्यामुळे परांजपे हाॅटेल ला परांजपें पेक्षा _सायातलं हाॅटेल_ म्हणूनच जास्त ओळख होती. कुठे चहा प्यायला जायचं तर सायातलं हाॅटेल. आजही जुनी जेष्ठ लोकं आठवण काढत असतात. त्यावेळी उद्योग धंद्यासाठी परीस्थिती बिकट होती. व्यवसाय वाढण्याच्या दृष्टीने लोकसंख्या पण मोजकीच होती. परीस्थिती सगळ्यांचीच तशी बेताची. हाॅटेल मध्ये जाऊन खायचं म्हणजे तसं घाबरूनच लोकं खायची. कारण घरून तशी परवानगी नसायची.
पण हळूहळू लोकं हाॅटेल मध्ये यायला लागली. त्यावेळी चिवडा १ आणा, चहा १ आणा, शेंगदाणा लाडू २ पैसे, कांदा भजी १ आणा एवढेच दर आणि एवढेच पदार्थ होते. तेंव्हा लाईट नव्हती, एसटी नव्हती. बैलगाडीचा वापर जास्त होता. धामणंद दसपटी चे लोक बैलगाडीने येत असत. त्यांचं प्रेमाचे हक्काचे ठिकाण म्हणजे सायातलं परांजपे हाॅटेल. चहा-पाणी, बैलांना पाणी-पेंढा व थोडा आराम करायला लोक इथे थांबत. तेंव्हा आडगावातून बैलगाडीने लोकं यायची. बैलांना इतकी सवय झाली होती की सायातलं हाॅटेल आलं की बैल तिथे थांबायचे. बैलगाडी मालक अनेकदा झोपलेले असायचे. पण बैल थांबणारच. हाॅटेल च्या मागे ४/५ पुरूष पाणी असलेली जुनी विहीर आहे. तिथे भाकरी-चटणी खाऊन लोक पुढे जायचे. तेंव्हा चहा तयार नसायचा, पाहीजे तेवढाच बनवला जायचा. तेंव्हाचा दिवसभराचा धंदा म्हणजे १५/२०/२५ रूपये ! सुरुवातीच्या काळात आप्पांच्या हाॅटेल व्यवसायात पत्नी पुष्पा वहिनी, सर्व पदार्थ घरी बनवून मोठं योगदान देत होत्या. सर्व पदार्थ चुलीवर बनवले जायचे. आजही पुष्कळसे पदार्थ हाॅटेल मध्ये चुलीवर बनवले जातात. आप्पांनी कधी कुणाला पैसे नाहीत म्हणून चहा पाण्यापासून अडवले नाही. आप्पांनी ह्या व्यवसायात भरपूर कष्टाने, मेहनतीने आणि सचोटीने आपलं स्थान निर्माण केले.
परांजपे हाॅटेल चालू झाल्यावर आप्पांचे सर्व जाती-धर्मातील मित्र जोडले गेले. अनेक मनमिळाऊ - आपुलकी ची माणसं आप्पाना आपल्या आयुष्यात सावलीसारखी लाभली. आप्पांच्या कारकिर्दीत हाॅटेल मध्ये सर्व नोकरांनी उत्कृष्ट सेवा दिली. आजपर्यंत हाॅटेल ला अनेक कलाकारांनी, आमदार, मंत्री महोदय, मान्यवरांनी भेट दिली आहे व आजही अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर मिसळ, चिवडा ची चव घेण्यासाठी वारंवार येत असतात. अभ्यंकर रंगमंदिर, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात कार्यक्रमाला आलेले, येणारे साधारण सर्वच कलाकार ... [ लक्ष्मीकांत बेर्डे, डाॅ. काशीनाथ घाणेकर, मोहन गोखले, भक्ती बर्वे, किशोर कदम, अरूण नलावडे, संजय मोने असे अनेक … ] परांजपे हाॅटेल ची चव घेतल्याशिवाय भेट दिल्याशिवाय पुढे गेले नाहीत, पुढे जात नाहीत !
हे हॉटेल सकाळी ५ वाजता उघडायचे. आजही हा शिरस्ता कायम आहे. बाकीची हॉटेल सकाळी ८ वाजता उघडायची त्यामुळे परांजपे हॉटेल हा या श्रमजीवी लोकांचा मोठा आधार होता. गावातील रिक्षावाले, गावातील सर्व श्रेणीतील लोक मग ते नोकरदार असोत की व्यापारी, सरकारी अधिकारी असोत की डॉक्टर किंवा वकील, तरुण विद्यार्थी असोत की रोजंदारी वर काम करणारा कामगार सर्वांच्या पसंतीस उतरलेले हे हॉटेल चिपळूणच्या खाद्य संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे.
एखादे बैठे घर असावे अशी वाटणारी वास्तू ! त्यामध्ये मागच्या पडवीत भटार खाना, मधल्या भागात एका बाजूला खाद्य पदार्थ साठवायची जागा, काउंटर तर दुसऱ्या भागात, ग्राहकांसाठी ४ टेबलं आणि बाके. पुढील पडवीत आणखी ४ टेबल आणि बाके. असे हे छोटेखानी स्वरूप.
परांजपे यांचा शेव-चिवडा खूपच प्रसिद्ध ! या चिवड्याची चव ही अगदी वेगळी, इतकी की मुंबई पुण्यात राहणाऱ्या मूळच्या चिपळूणकर माणसाला आजही हा चिवडा घेऊन जावासा वाटतो. तांबूस लाल रंगाचा दिसणारा चिवडा, त्यावर भावनागरी प्रकारची मध्यम आकाराची शेव आणि बरोबरीला कांद्याचा काप असा हा शेव चिवडा सुरुवातीपासून आजपर्यंत वर्तमान पत्राच्या कागदावर दिला जातो. येथील दुसरा प्रसिद्ध पदार्थ म्हणजे उसळ-पाव किंवा मिक्ष्चर पाव. हिरव्या वाटण्या ची उसळ, हवी असल्यास त्यात बटाट्याची भाजी आणि त्याबरोबर पाव. सोबतीला कांदा आणि मागाल तेव्हढा रस्सा ! खरे खवय्ये या उसळी बरोबर २-३ पाव घेऊन खातात. नंतर १ शेव-चिवडा घेऊन त्या उसळी मधे मिसळतात. त्यावर रस्सा ओतायला सांगून हे मिश्रण थोडा वेळ तसेच राहू देतात. एकदा का हे मिश्रण मुरले की मग खरी त्या उसळीची लज्जत दसपटीने वाढते. त्याची चव आणि सर दुसऱ्या कोणत्याच पदार्थाला येणे शक्य नाही. सोबतीला बटाटा-वडा आणि कांदा भजी देखील मिळतात. आजही चाकरमानी आपल्या चिपळूण भेटीत एक सकाळ तरी या अपूर्व सोहळ्यासाठी नक्की राखून ठेवतात. जुन्या नव्या मित्रांना भेटायचे असेल तर _आप्पांकडे नाश्त्याला जाऊया_ हा सर्वोत्तम पर्याय. पोटपूजा आणि गप्पाष्टक यासाठी यासारखी दुसरी योग्य जागा नाही.
हॉटेल चे मालक श्री. निवास परांजपे सांगतात की आज आमच्या हॉटेल ला ८० वर्षे पूर्ण झाली. सुरुवातीच्या काळात प्लेग, आता करोना, आर्थिक मंदी आणि या वर्षीचा महापूर अशी अनेक आव्हाने समोर उभी राहिली. पण उत्तम दर्जा, जिभेवर रेंगाळणारी अवीट चव, रास्त दर, स्वच्छ्ता आणि आपुलकी ह्या परांजपे हॉटेल च्या वैशिष्ट्यांनी आमच्या ग्राहकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले. त्यांच्या बद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. कोकणी माणूस हा जन्मजात खवय्या ! त्याच्या दृष्टीने हॉटेल च्या इंटीरियर पेक्षा तेथील पदार्थांची चव महत्त्वाची ! म्हणूनच आजही हॉटेल च्या मूळ रूपात काळानुसार फारसा बदल न करताही हे हॉटेल आजही ग्राहकांना पुन्हा-पुन्हा आपल्याकडे खेचून घेण्यात यशस्वी ठरले आहे.
येथे कोकणातील विशेष असे इतर पदार्थ जसे की कुळीथ पीठ, आंबा वडी, आंबा / फणस पोळी, आमसुले इत्यादी पदार्थ देखील तुम्हाला मिळू शकतील. यापुढे कधी जर चिपळूण वरून रस्त्या मार्गे जाणे होणार असेल, तर परांजपे हॉटेल येथे थांबून थोडासा विसावा आणि येथील खाद्यपदार्थांचा आनंद नक्की घ्या !
पोस्ट साभार ✍️ विनोद देवधर - डोंबिवली_