10/09/2025
चिपळूणमध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन.
महाराष्ट्र शासनाने मांडलेल्या तथाकथित जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात चिपळूण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे महाविकास आघाडी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांकडून शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली व निषेध व्यक्त करण्यात आला.
महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे क्षेत्र अध्यक्ष बाळा कदम, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर व काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाग यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. यानंतर चिपळूण उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आघाडीने सादर केलेल्या निवेदनात जनसुरक्षा विधेयकाला “जनविरोधी, घटनाविरोधी आणि हुकूमशाही प्रवृत्ती वाढवणारे” संबोधत त्याला तीव्र विरोध दर्शविण्यात आला. या विधेयकामुळे शासनाला अमर्याद अधिकार प्राप्त होऊन कोणत्याही नागरिकावर शंका उपस्थित करून अटक, चौकशी, नजरकैद करण्याचा अधिकार मिळतो. त्यामुळे भारतीय संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि न्याय मिळवण्याचा हक्क धोक्यात येतो, असा आरोप निवेदनात करण्यात आला.
लोकशाहीची गळचेपी आम्ही सहन करणार नाही. हे विधेयक मागे घेतले नाही तर आंदोलनाचा ज्वालामुखी उभा राहील”, असा इशारा महाविकास आघाडीने दिला.
यावेळी उपस्थित नेत्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. मुराद अडरेकर यांनी निवेदन वाचून दाखवले तर बाळा कदम व लियाकत शाह यांनी शासनाच्या हुकूमशाहीविरोधात तीव्र भूमिका मांडली. या आंदोलनातून महाविकास आघाडीची चिपळूणमध्ये एकजूट ठळकपणे दिसून आली.
आंदोलनात प्रमुख उपस्थिती
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख बळीराम गुजर, तालुका संघटक, राजू देवळेकर, उपशहर प्रमुख संतोष पवार, सचिन उर्फ भैया कदम, महिला उपजिल्हा संघटिका धनश्री शिंदे, महिला शहर संघटिका वैशाली शिंदे, विभाग प्रमुख सचिन शेट्ये, संजय गोताड, बापू चिपळूणकर, मनोज पांचाळ, उपविभाग प्रमुख फैय्याज शिरळकर, अमोल टाकळे, शिवसैनिक गणेश खेतले, तालुका सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे आदी.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) शहराध्यक्ष रतन पवार, महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोथवडेकर, महिला शहराध्यक्ष डॉ. रेहमत जबले, युवक तालुकाध्यक्ष रोहन नलावडे, राष्ट्रीय सचिव एम. बंदूकवाले, अर्बन बँक संचालक सतीशअप्पा खेडेकर, कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश ताम्हणकर, सोशल मीडिया अध्यक्ष आसिफ मुकादम, कादिर मुकादम, छाया खातू, हसीना राजीवटे, अनिता पवार, राधिका तटकरे आदी.
काँग्रेस पक्ष जिल्हा समन्वयक सुरेश कातकर, तालुकाध्यक्ष लियाकत शाह, महिला तालुकाध्यक्ष निर्मलाताई जाधव, युवक जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह, ओबीसी जिल्हाध्यक्ष महादेव चव्हाण, उपाध्यक्ष संजय जाधव, महिला शहराध्यक्षा विना जावकर, माजी नगरसेविका सफा गोठे, सेवादल जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार,सेवा दल तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, सल्लागार दादा आखाडे, रफिक मोडक, यशवंत फके, कैसर देसाई सुरेश राऊत लियाकत शेख आदी.
या आंदोलनामुळे चिपळूणमध्ये महाविकास आघाडीचा संघर्षमय व लोकशाही रक्षणासाठीचा निर्धार अधोरेखित झाला.