22/08/2026
दापोलीत ८०८ अन्न विक्रेत्यांना FoSTaC प्रशिक्षण
दापोली, २२ ऑगस्ट २०२६ : दापोली शहरातील स्ट्रीट फूड विक्रेते तसेच छोट्या हॉटेल व्यावसायिकांसाठी FoSTaC (Food Safety Training and Certification) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आज यशस्वी उद्घाटन करण्यात आले. अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि सुरक्षित अन्न हाताळणीबाबत विक्रेत्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे FDA मंत्री मा. ना. श्री. योगेश कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी अन्न विक्रेत्यांना मार्गदर्शन करताना अन्न व्यवसायामध्ये स्वच्छता, अन्न सुरक्षा मानके आणि सुरक्षित अन्न हाताळणीचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच प्रशिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानाचा आपल्या व्यवसायात प्रभावीपणे वापर करण्याचे आवाहन त्यांनी विक्रेत्यांना केले.
कार्यक्रमास डॉ. सचिन जाधव, सहआयुक्त, FDA महाराष्ट्र; श्री. शशिकांत यादव, सहाय्यक आयुक्त, FDA; श्री. उन्मेष राजे, पंचायत समिती, दापोली; श्री. संजय भंडारी, Nestlé India; श्री. गुरुनाथ सावंत, NASVI Food Safety Trainer; श्री. संकेत कोनेरी तसेच श्रीमती भाग्यश्री परदेशी, Food Safety Officer यांची उपस्थिती होती.
प्रशिक्षण सत्रामध्ये FoSTaC प्रशिक्षक श्री. गुरुनाथ सावंत यांनी अन्न विक्रेत्यांना अन्न स्वच्छता, सुरक्षित अन्न हाताळणी, वैयक्तिक स्वच्छता, व्यवसायाच्या परिसराची स्वच्छता तसेच अन्न सुरक्षा मानकांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणामध्ये दापोली शहरातील एकूण ८०८ अन्न विक्रेते व खाद्य व्यवसायिक सहभागी झाले. सहभागी व्यावसायिकांना सुरक्षित आणि स्वच्छ पद्धतीने अन्न व्यवसाय करण्यासाठी आवश्यक माहिती व मार्गदर्शन मिळाले.
नोंदणीसाठी नियोजन समितीचे विशेष सहकार्य
या प्रशिक्षणाच्या नियोजनासाठी सचिन तोडणकर, मंगेश मोरे, दिनेश नाईक आणि बाळासाहेब नकाते यांनी विशेष मेहनत घेतली. दापोली शहरातील जास्तीत जास्त अन्न व्यवसायिकांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी त्यांनी व्यावसायिकांची नोंदणी करून घेण्यापासून ते प्रशिक्षणासाठी आवश्यक नियोजनापर्यंत महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
व्यवसायिकांना प्रशिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी आधीच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात आली, त्यामुळे मोठ्या संख्येने व्यावसायिकांना या उपक्रमात सहभागी होता आले.
Nestlé India कडून मोफत किचन किट
या प्रशिक्षणामध्ये सहभागी अन्न व्यवसायिकांना Nestlé India कंपनीच्या वतीने मोफत किचन किट देण्यात आले. या किटमध्ये अन्न व्यवसायात स्वच्छता आणि सुरक्षितता राखण्यासाठी उपयुक्त साहित्य, त्यामध्ये किचन कॅप आदी वस्तूंचा समावेश होता.
दापोली शहरातील स्ट्रीट फूड विक्रेते आणि छोट्या खाद्य व्यवसायांमध्ये सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. या उपक्रमामुळे अन्न व्यवसायिकांमध्ये अन्न सुरक्षेबाबत अधिक जागरूकता निर्माण होऊन नागरिकांना सुरक्षित व आरोग्यदायी अन्न उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
#दापोली #अन्नसुरक्षा #अन्नविक्रेते #अन्नव्यवसायिक #दापोलीबातम्या #रत्नागिरी #कोकण #स्वच्छताअभियान #सुरक्षितअन्न #लोकलन्यूज