21/01/2023
धुळ्यात धम्म दिक्षा सोहळ्याचे आयोजन..! हजारो च्या संख्येने धर्मांतर होणार
देश -विदेशातून भन्ते आणि धम्म प्रसारक उपस्थित होणार
धुळे :-अलीकडील काळात सांप्रदायिकता वाढीस लागली आहे . जातीय द्वेषातून दलित , मुस्लिम , मागासवर्गीय , बहुजन जातींवर अन्याय , अत्याचार होण्याच्या घटना घडत आहेत . खैरलांजीपासून तर अलीकडील मेहेरगाव प्रकरणासारख्या कित्येक घटनांमध्ये दलितांवर अन्याय , अत्याचार झाल्याने धर्मांतर गरजेची आहे असे ह्या पत्रकार परिषद मध्ये सांगण्यात आले
अजिंठा आणि मेडिटेशन संस्था , धुळेच्या वतीने एक मोठे क्रांतिकारी पाऊल उचलून मनामनातील अस्वस्थेला बाट मोकळी करून देण्यासाठी धुळे शहरात भव्यदिव्य असा बौद्ध धम्म दीक्षा सोहळा ' आयोजित करण्यात येत आहे . हा सोहळा दि . ७ मे २०२३ रोजी होणार असून सुमारे २० ते २५ हजार दीक्षार्थी या सोहळ्यात बौद्ध धम्माची दीक्षा घेऊ शकतील अशा प्रकारचे नियोजन केले जात आहे . शहरी आणि ग्रामीण पातळीवर यासाठी मोठे टीमवर्क केले जाणार आहे . बुद्धविचार आणि बौद्ध धमाचे स्वरूप वैश्विक आहे . अवघ्या विश्वातील अनेक देशांनी विश्वकल्याणाचा विचार घेत बौद्ध धम्माचा मार्ग अनुसरला आहे . आज संपूर्ण विश्वाने बौद्ध धम्माचे महत्व आणि गरज ओळखली आहे . म्हणून या दीक्षा सोहळ्यासाठी आम्ही कोणतीही बंधने न लावता माणूस म्हणून जगण्याची ज्याची इच्छा आहे अशा सर्वांसाठी दीक्षा सोहळा खुला ठेवणार आहोत . कोणत्याही धर्मातील व्यक्ती या सोहळ्यात बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपला नवजीवनप्रवास सुरु करू शकेल . या दीक्षा सोहळ्यासाठी देशविदेशातील बौद्ध भिक्कू ( भन्ते ) यांना निमंत्रित करून त्यांच्या हस्ते अनुयायांना दीक्षा दिली जाणार आहे . तसेच उत्तर महाराष्ट्रातील विविध बुद्ध बिहार समित्या सर्व बहुजनवादी संस्था व संघटना यांना देखील आमंत्रित केले जाणार आहे . दीक्षा सोहळ्याचे सुनियोजित आयोजन करता यावे याकरिता लवकरच नावनोंदणी अभियान सुरु केले जाईल . ज्या अनुयायांना धम्मदीक्षा घ्यावयाची आहे व सदर सोहळ्यास आपल्या परीने मदत करावयाची आहे . या दीक्षा सोहळ्याची वेळोवेळी प्रसारमाध्यमांद्वारे जनतेपर्यंत माहिती पोहचवली जाईल . असे , आयोजक आनंद लोंढे , किरण गायकवाड , शंकर खरात , प्रा . डॉ . नागसेन बागुल यांनी पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले . तसेच या सोहळ्यासाठी आबा अमृतसागर , अॅड . भामरे व अनेक सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेणार आहे.