21/08/2026
*हिंगणघाटमध्ये वाहतूक शिस्त — ही कारवाई सातत्याने सुरू राहावी.*
दि. १५ ऑगस्ट रोजी हिंगणघाट शहरात घडलेल्या दुर्दैवी अपघातात तीन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत वेदनादायक आणि मन हेलावून टाकणारी आहे. या घटनेनंतर शासन व प्रशासनाने पुढचे पाऊल टाकण्यात सुरुवात केली आणि अल्पवयीन वाहनचालक, परवाना नसलेले चालक तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली.
या कारवाईचे अनेक नागरिकांनी स्वागत केले आहे. मात्र, ही कारवाई केवळ एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर काही दिवस किंवा काही महिने होऊन थांबू नये, अशी अपेक्षा हिंगणघाटच्या जनतेची आहे.
१८ वर्षांखालील मुलांना शक्य असेल तेव्हा क्लास, ट्यूशन किंवा इतर दैनंदिन कामांसाठी सायकलचा वापर करण्यास पालकांनी प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय लहान वयातच लागेल. सायकल चालविल्यामुळे नियमित व्यायाम होऊन शारीरिक तंदुरुस्तीही वाढण्यास मदत होईल आणि पालकांवरील पेट्रोलचा आर्थिक भारही काही प्रमाणात कमी होईल.
तसेच, १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच आवश्यक परवाना घेऊन मोटार वाहन चालविण्याची सवय आणि जबाबदारीची जाणीव मुलांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे.
शिस्त आणि नियम आवश्यक आहेत; परंतु एखादी घटना घडल्यानंतर अचानक कठोर कारवाई सुरू करून काही काळाने ती थांबवणे हा कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही. नियमांची अंमलबजावणी सातत्याने झाली आणि नागरिकांना त्याची सवय लागली, तरच वाहतूक शिस्त निर्माण होईल.
म्हणून प्रशासनाने ही मोहीम केवळ काही दिवसांपुरती मर्यादित न ठेवता सातत्याने सुरू ठेवावी. पालकांनीही आपल्या मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन अल्पवयीन मुलांच्या हातात मोटार वाहन देणे टाळावे.
आजची शिस्त उद्याचा अपघात टाळू शकते.
नियम पाळूया, सुरक्षितता जपूया आणि हिंगणघाटला अधिक शिस्तबद्ध शहर बनवूया!
सायकलला प्रोत्साहन • वाहतूक नियमांचे पालन • अल्पवयीनांच्या सुरक्षिततेला प्राधान्य