30/07/2025
"तू येण्याआधीच तुला एक पत्र लिहावसं वाटतंय…" – नागराज मंजुळे यांची अंतर्मनाला भिडणारी कविता 💔📝
तुझ्या येण्या अगोदर एक पत्र ….
छत्रपति शिवाजी पुलापर्यंतच ,तुझी फोर्व्हीलर येऊ शकेल
खाली झोपडपट्टीत अजूनही
एक पाउलवाटच नाक धरून उकिरड्यातून वाट काढत खाली येते.
पुलावरून पाहशील तेव्हा महानगर पालिकेच्या सार्वजनिक शौच्यालयाच्या भोवती
विटक्या पत्र्यांची मान पाटीत रुतलेली खुजी घरे,
मोकळ्या आगपेट्यांच्या ढिगाऱ्या सारखी दिसतील.
तुला मन आणि तोल सावरत खाली यावा लागेल
खाली येशील तेव्हा चीराक्णारे रेकॉर्ड, दारूच्या गुत्यावरील कोलमडणारे संवाद
छक्के पंजे बादशाह बेगम चे रोजचेच विवाद
चार दोन शिव्या हि तुझ्या कानी पडतील कदाचित शर्मू नकोस.
फाटक्या कपड्यातील काही छोटी मुलं ,तुला कुतूहलानं पाहत असतील.
त्या वाट हरवलेल्या मुलांनाच, माझ्या घराची वाट विचार.
तुझ्या अत्तराच्या सुगंधानं चाळ दरवळेल , त्या मुलांच्या मागून तू ज्या वाटेने येशील
कदाचित त्या वाटेवर मागे चाळ हि गोळा होईल . बिथरू नकोस
जेव्हा तू मोठी गटार ओलांडून येशील ,
तेव्हा स्वप्नपूर्ती बिल्डर च्या भल्या मोठ्या थोरल्या होर्डिंग च्या लोखंडी पायाच्या आधारानं
माझ घर उभारलेला दिसेल, माझ्या दहा बाय दहा च्या घरात येशील तेव्हा
भाबड्या आईचं गाब्बळ स्वागत, बनियन टोवेलातला मी ,
आमची कण्हत धुपत पेटणारी चूल, काळा कुळकुळीत चहा
आमचा all in one घर
हे सारं तुला कीळसवन वाटल्याची खून तुझ्या डोळ्यात पाहून
मी स्वतःची घृणा करण्यास विवश होईन.
तुझ माझ्यावर असीम प्रेम आहे, तुझे dad मला नवाकोरं भविष्य विकत घेऊन देतील हे ठीक आहे.
पण मी माझी घृणा करीन इतपत मेहेरबानी करू नकोस माझ्यावर
माझ्या गरीब खाण्यात येऊ नकोस शक्यतो.
तू रंगविलेली स्वप्न इथल्या भूमीत अंकुरणार नाहीत .
आणि मला बोन्साई होणा मान्य नाही.
तू तुझी स्वप्न विझं घेऊन जा
एक नवीन सुपीक जमीन शोध
माझ्या या वांझोट्या भूमीला कधी तरी दिवस जातीलच
इथे हि फुले फुलतील स्वप्न साकारतील
पण तोवर मला माझ्या स्वप्नांचा खतपाणी करून मला स्वतःलाच गाडून घायला हव
माझ्या या चुरगळलेल्या माणसांसाठी.
#सैराट #नागराज #मंजुळे #कविता