19/07/2025
अॅड. वर्षा देशपांडे आणि 'लेक लाडकी अभियान'च्या याच अविरत संघर्षाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. त्यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या 'युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवार्ड २०२५'ने सन्मानित करण्यात आले आहे. ११ जुलै या जागतिक लोकसंख्या दिनी काल न्यूयॉर्क इथे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
वर्षा देशपांडे यांचा या पुरस्कारापर्यंतचा प्रवास अतिशय दीर्घ आहे. घरात आई काँग्रेस सेवा दलातील, तर वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा मानणारे. घरातच दोन परस्परविरोधी विचारांचा वारसा असल्याने कोणते विचार समतावादी, कोणते विषमतावादी याची जाणीव होऊ लागली. जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन सुरू होतं. अनेक तरुण-तरुणी तिथे ओढले जात होते. वेगवेगळ्या समतावादी, पुरोगामी चळवळी जोर धरत होत्या. स्त्रीवादी चळवळही याच काळात आकार घेत होती. मुलगी नकोशी असणाऱ्या समाजात सूनही तितकीच नकोशी असते, तिच्याकडून मनासारखा हुंडा आल्याशिवाय तिला सासरी नांदू दिलं जात नाही. त्यामुळे हुंड्याचा प्रश्न तीव्र बनला होता. मुलींच्या शाळागळतीचा प्रश्न तीव्र होता. याच काळात स्त्रीमुक्ती संघटनेच्या ज्योती म्हापसेकर यांनी 'मुलगी झाली हो' हे नाटक लिहिलं, त्याचे गावोगाव प्रयोग होऊ लागले. या नाटकामध्ये वर्षा देशपांडे ही तरुण मुलगी काम करू लागली. मुळातली सजगता स्त्रीवादी विचारांमुळे अधिक तीव्र झाली. लोकांमध्ये स्त्रियांच्या हक्काविषयी जाणीवजागृती करणाऱ्या या नाटकाचे गावोगाव जाऊन प्रयोग करणं, हे एक सामाजिक कामच होतं. शोषित-वंचित स्त्रियांच्या प्रश्नांसाठी पूर्ण वेळ कार्य करण्याचा निर्णय वर्षा यांनी घेतला. १९९० मध्ये 'दलित महिला विकास मंडळा'ची स्थापना केली. दलित महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवतानाच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जाऊ लागले. बालविवाहाचा प्रश्न असू देत, ऊसतोड महिलांचा प्रश्न असू देत, अल्पसंख्यांकांवर होणारी हिंसा असू देत, प्रत्येक ठिकाणी दलित महिला विकास मंडळ निषेधाचा आवाज बनून उभे राहू लागले. निषेधाच्या आवाजाच्या बरोबरीने प्रत्यक्ष कृती होऊ लागली.