13/10/2025
पाऊस थांबून आठवडा उलटला तरी रस्ते दुरुस्तीला अद्याप मुहूर्त नाही; खड्ड्यांसोबत धुळीने नागरिक प्रचंड हैराण
कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांचा केडीएमसी प्रशासनाविरोधात तीव्र संताप
कल्याण, दि. १३ ऑक्टोबर :
गणपती, नवरात्रोत्सव पार पडून आता दिवाळी अगदी काही दिवसांवर आलेली आहे. पण कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यांवर खड्डे मात्र ठाण मांडून बसले आहेत. पाऊस थांबून आठवडा उलटला असतानाही केडीएमसीकडून दुरुस्तीची कामे सुरू नसल्याने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तर आता पाऊस थांबल्याने खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात झाली असून दिवाळीपर्यंत कल्याण डोंबिवलीतील रस्ते सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न असल्याची माहिती केडीएमसी शहर अभियंता अनिता परदेशी यांनी दिली आहे.
शहरातील काही प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. लहान लहान खड्ड्यांनी अक्षरशः अक्राळ विक्राळ रूप धारण केले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दोनचाकी वाहनांचे तर तोल जाणे, अपघात होणे, धुळ उडणे या घटना आता रोजच्या झाल्या आहेत.
पावसाळा यंदा लवकर सुरू झाला आणि बराच काळ टिकला. त्यामुळे रस्त्यांची स्थिती अधिकच बिकट झाली. मात्र, आता पाऊस थांबल्यानंतरही केडीएमसी प्रशासनाकडून रस्ते दुरुस्तीबाबत कोणतीही कार्यवाही दिसत नसल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. “कर आम्ही वेळेवर भरतो, मग रस्त्यांची दुरुस्ती का केली जात नाही ? आमचा कर थकला तर पालिका लगेच कारवाईचा बडगा उगारते मग आम्ही कर भरूनही चांगले रस्ते न देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार ? असे संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
दरम्यान, खड्ड्यांमुळे अनेकाना पाठ आणि मणक्याचे आजार सुरू झाले असून खड्ड्यांतून उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे आजारही वाढले आहेत. अनेक भागात सकाळ-संध्याकाळ उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना खोकला, सर्दी, ॲलर्जी यांसारख्या समस्या भेडसावत आहेत. विशेषतः शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. दोन दोन तीन तीन महिने उलटूनही अनेकांचा खोकला जात नसल्याच्या तक्रारीही येत आहेत.
*दिवाळी सुरू होण्यापूर्वी रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्नशील - शहर अभियंता अनिता परदेशी*
आता पाऊस थांबलेला असल्याने कल्याण डोंबिवलीतील रस्ते दुरुस्ती सुरू झाली आहे. शहरातील रस्त्यांवर डांबरीकारणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून दिवाळीच्या आधी रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रात्रीच्या वेळेत डांबरीकरणाचे काम सुरू आहे.