03/03/2024
'हरिशचंद्रगडावर अडकलेल्या पर्यटकांना जीवनदान देणाऱ्या देवदुताचा जगण्यासाठी हृदयस्पर्शी संघर्ष...😭
परमेश्वर कधी कुणाची कशी परीक्षा घेईल सांगता येत नाही. कुणाच्या आयुष्यात कधी किती संकटे येतील किंवा निर्माण होतील सांगणं तर फारच कठीण आहे. आज अशाच संकटात तो सापडलायं. कधीकाळी हरिश्चंद्रगडावर अडकलेल्या पर्यटकांना रात्री अपरात्री जीवनदान देणारा हा देवदूतच आज जगण्यासाठी धडपडतोय. घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करत त्यातून आता कुठेतरी यशाच्या मार्गावर तो चालू लागला होता. गिर्यारोहण क्षेत्रात तो आता चांगलाच पारंगत होऊ लागला होता. गाईडच्या माध्यमातून तो दोन पैसे कमवून थकलेल्या आई- बाबांची भूक भागवू लागला होता व कुटुंबाला हातभार लावू लागला होता. परंतु काळाच्या मनात काही वेगळेच शिजत होते. शरीराच्या आतुन काहीतरी वेगळ्याच हालचाली घडतं होत्या. दोन घास पोटासाठी मिळावेत म्हणून शरीराच्या विकाराकडे तो दुर्लक्ष करू लागला होता. पुढ्यात काही भयंकर वाढून ठेवलंय हा विचार पण त्याने केला नव्हता. उपचारासाठी त्याने मुंबई गाठली खरी पण उपचाराचे ओझं पेलणार तर कसें? वृध्द माता पिता कुठून आणणार पैसे? पैसे मागावे तर कुणाकडे याच विचारांनी तो पुरता खचला. गेली सहा महिने तो याच विचारांच्या ओझ्याखाली पुरता दबून गेला. मित्र भेटीला गेले की त्याला उपचारांचा सल्ला द्यायचे खरे; पण उपचारासाठी पैसाच नाही हे सांगायला त्याने संकोच केला. अनेक वेदना सहन करत तो गेली कित्येक दिवस अनेक यातना घेऊन जगतोय. एक महिनाभरापूर्वी तो आजारी असल्याबाबतची बातमी कानावर आली आणि ती ऐकून मी अक्षरशः हादरून गेलो. कारणही तसेच होते, हा तरुण उपचार घेण्यासाठी तयारच नव्हता. त्याला अनेक वेळा उपचार घेण्यासाठी मित्रांनी विनवण्या केल्या परंतु तो नाहीच म्हणत होता. सह्याद्रीच्या कुशीतच मला विसावा घ्यावासा वाटतो असे उत्तर तो देत होता. दोन वर्षांपूर्वी त्याची आणि माझी भेट रात्री हरिश्चंद्रगडावर झाली त्या भेटीचे कारणही रेस्क्युच होते. प्रतिक तळेकर नावाचा मुलगा तीन दिवस हरिश्चंद्रगडावर धुक्यात भटकत होता. त्याला गडावरून खाली उतरण्याचा मार्गच सापडत नव्हता. शेवटी तीसऱ्या दिवशी तो रात्री आम्हाला सापडला होता याचं श्रेय पण जगण्यासाठी धडपडणाऱ्या या देवदूतासच दिले पाहिजे.
कारण हा देवदूत आणि त्याचा मित्र जुन्नर दरवाजाने प्रतीकला शोधायला हरिश्चंद्रगडावर गेले होते. माझी टीम टोलारखिंडी मार्गे शोध घेत होती तर बेलपाड्यातुन नळीच्या वाटेने कमळू पोकळा व त्यांचे बंधू दोघेच अंधारात नळीच्या वाटेने वर येत होते. हरिश्चंद्रगडाच्या बालेकिल्ल्याच्या दक्षिणेस या देवदूतासच प्रतिक भेटला व आमचा व त्यांचा संपर्क तेथेच जवळ घडून आला; तिच माझी आणि या देवदूताची प्रथम भेट होती. त्यानंतर गेल्या वर्षी पावसाळ्यात हा देवदूत पुन्हा एकदा समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. हरिश्चंद्रगडावर एका तरूणाचा मृत्यू झाला होता. त्या मृताच्यासोबत चार जणांसह एक बारा वर्षांचं पोरगं जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत होतं. त्या संकटात सापडलेल्यांना संकटमोचक बनून शोधून काढायचं काम व त्यांना सुखरूप खाली आणण्याचं काम याच देवदूताने अर्थात जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर गावचे भूमीपुत्र बाळू चहादू रेंगडे यानेच केले होते. अशा अनेक रेस्क्युंमध्ये संकटमोचक बनून बाळू रेंगडे अनेकांच्या मदतीला धावून गेला.
महिनाभरापूर्वी मी सकाळ सन्मान पुरस्कारासाठी मुंबईला गेलो होतो. जाता जाता मुंबईमध्ये मी स्तंभलेखक संजय नलावडे यांच्या घरी भेट देण्यासाठी गेलो होतो. तिथे बाळूचा विषय निघाला आणि बाळू गंभीर आजारी असल्याचे मला समजलं. आकुर्डी येथील ट्रेकर संग्राम कुलकर्णीसरांनी सुरूवातीला बाळूला मदत केल्याचेही नलावडेसरांनी सांगितले. सर.. काहीही झालं तरी बाळूला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण सर्वोतोपरी मदतीसाठी पुढाकार घेऊयात असा आमचा निर्धार झाला. पुरस्कार स्वीकारला खरा; पण बाळू काही डोक्यातून बाहेर पडेनाच, ज्याने कुटुंबाचा व स्वतःच्या जिवाचा विचार न करता अनेकांना जीवनदान दिले तोच आज संकटात आहे. रात्रीचा प्रवास करून सकाळी जुन्नरला पोहचलो. बाळूची भेट घेऊन त्याला कोणत्याही परिस्थितीत उपचारासाठी तयार करायचेच हा निर्धार केला होता. सकाळी बाळूच्या मोबाईलवर कॉल केला आणि पलिकडून महिलेचा आवाज कानी पडला, 'हॅलो...बाळूकडे द्या त्याच्याशी बोलायचे आहे' म्हटले तर महिलेचा आवाज खोल गेला, 'बाळूची पत्नी बोलतेय, आम्ही त्यांना घेऊन मुंबईला जात आहे, त्यांची तब्येत जास्तच खराब होत चाललीयं व ते मला जगायचंय म्हणतात' असे ते शब्द होते. क्षणांत कुणी उकळलेले तेल कानात ओतावे व ज्या वेदना व्हाव्यात त्याहीपेक्षा भयंकर वेदना ह्रदयात निर्माण झाल्या. काही क्षण सुन्न झाल्यासारखे झाले. आता कुठे आहात? विचारले तर मूरबाड सोडले म्हणून सांगितले. काळजी करू नका म्हणून सांगितले व मोबाईल कॉल कट केला.
लागलीच स्तंभलेखक संजय नलावडे सरांना फोन केला व बाळू उपचारासाठी मुंबईत येतोय सांगितले. बाळू उपचार घेण्यासाठी तयार झाल्याचे ऐकून त्यांनाही खूप आनंद झाला, ते पण तयारीला लागले. गेली महिनाभर बाळूच्या कुटुंबासोबत मदतीला नलावडे सरांनी अंजना राणे मॅडमच्या सहकार्याने खूप धावपळ केली. मोफत सुविधा मिळवून देण्यासाठी जीवाचं रान त्यांनी केले. विविध शारिरीक चाचण्या घेण्यासाठी प्रयत्न केले. राहण्यासाठी व उपचारासाठी धावपळ केली. यादरम्यान नलावडे सरांची व माझी सल्लामसलत फोनद्वारे चालूच होती. आर्थिक मदत तर आपण आव्हानाच्या माध्यमातून जमा करू असे ठरलेच होतं. चाचण्या, रिपोर्ट आल्यानंतर पुढे उपचारांची दिशा ठरणार होती. काही कामानिमित्त नलावडे सर दोन दिवस गावाला आले होते आणि मागे बाळूचे रिपोर्ट हातात आले होते. 'Malignant tumor मुळे बाळूची स्थिती फारच नाजूक असून आता फार उशीर झालाय,' असे डॉक्टरांनी सांगितले होते. पहा जमले तर येथेच जसा शक्य आहे तसा उपचार घ्या असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यांना काय माहित म्हाताऱ्या आई-बापांच हा आधारच येथे आडवा झालायं. कोठून पैसे खर्च करतील या काळजाच्या तुकड्यासाठी? बाळूला सत्य समजलं होतं. बायकोला रडत रडतच तो सांगत होता, 'चला आपला गावच बरा हाय; जे काय व्हायचं ते आता गावाकडच्या दऱ्याखोऱ्यांच्या समक्षच होऊ दे, माळरानावरील मांडवात एक टेन्ट लाऊन दे, तेच माझ्यासाठी सह्याद्रीच्या कुशीतील रूग्णालय असेल.' आज सकाळी नलावडेसरांना फोन केला तेव्हा समजले की बाळूला घेऊन घरचे खिरेश्वरकडे निघालेत. पैसा नाही कसे उपचार घेणार बाळू? न उलगडणारे कोडे आहे. सह्याद्रीची माती किती दिवस या बाळूला आपल्या सोबत ठेवतेयं माहीत नाही? येणाऱ्या काळात म्हातारे आई - बाप कोणता दगड काळजावर ठेऊन या दुःखाला समोर जाणार आहेत?
मित्रांनो हात जोडून एकच विनंती असेल की, आपण त्याचं दुःख जरी दूर करू शकलो नाही तरी कमीत कमी आर्थिक हातभार लावून बाळूने दिलेल्या जीवनदानाची जाण म्हणून या कुटुंबाला आधार देऊ. अर्थात; जर आपली इच्छा असेल तर आणि तरच... पुढील बॅंक खाता क्रमांकावर...
श्री. बाळु चहादू रेंगडे
बॅंक ऑफ महाराष्ट्र
खाता क्रमांक - 60300320091
IFSC code MAHB0001116
गुगल पे नंबर 9370996422
✍️ रमेश खरमाळे, माजी सैनिक
जुन्नर