26/09/2025
नेमळेत दिवसाढवळ्या बंद घर फोडून ८ लाखांचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास
सावंतवाडी : नेमळे कुंभारवाडी येथे दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्यांनी एक बंद घर फोडून सुमारे आठ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ३५ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी घराच्या मागील बाजूची खिडकीची काच फोडून घरात प्रवेश केला. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
नेमळे कुंभारवाडी येथील मोहनदास खराडे हे शुक्रवारी सकाळी सहा वाजता आपले घर बंद करून कामानिमित्त पणजी येथे गेले होते. खराडे यांच्या अनुपस्थितीत चोरट्यांनी संधी साधली. त्यांनी घराच्या मागील दरवाज्याच्या बाजूची खिडकीची काच फोडली आणि आतून दरवाज्याची कडी उघडून घरात प्रवेश केला.
घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी बेडरूमचा दरवाजा उचकटून काढला. कपाटाचे लॉक तोडून आतमध्ये ठेवलेले ११ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि ३५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण सुमारे ८ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
दुपारी तीन वाजता मोहनदास खराडे घरी परतले असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती सावंतवाडी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला.
चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी परिसरात चोरट्यांचा शोध घेतला, मात्र त्यांना यश आले नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक खंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मंगेश शिंगाडे अधिक तपास करत आहेत. या मोठ्या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.